टेल्यूरियम : धातुरूप मूलद्रव्य. चिन्ह Te अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ५२ अणुभार १२७·६१ ⇨आवर्त सारणीच्या ६ अ गटात स्थान विद्युत् विन्यास (अणूतील इलेक्ट्रॉनांची मांडणी) २, ८, १८, १८, ६ स्थिर समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) आठ असून त्यांचे अणुभार १२१, १२२, १२३, १२४, १२५, १२६, १२८ व १३० असे आणि त्यांचे प्रतिशत वैपुल्य अनुक्रमे ०·०८, २·४६, ०·८७, ४·६१, ६·९९, १८·७१, ३१·७९ व ३४·४९ असे आहे स्फटिकरूप व चूर्णरूप (अनाकार) अशा दोन स्वरूपांत आढळते स्फटिकरूपाचा रंग चांदीसारखा शुभ्र, विद्युत् संवाहकता कमी, प्रकाशामुळे विद्युत् संवाहकता किंचित वाढते, करड्या सिलिनियम-बी शी समरुपी (भौतिक आणि रासायनिक गुणधर्म सारखे असलेले), या प्रकाराचा वितळबिंदू ४४·८° से., उकळबिंदू १,३९०° से. (सोनेरी वाफ), वि.गु. ६·२५, कठिनता २·५ (मोस मापक्रमानुसार), सामान्य तापमानास रेणुभार अद्याप अज्ञात, तापमान १,४००० ते १,८००० से.च्या दरम्यान त्याचे सूत्र Te2 असते आणि Te–Te हे अंतर २·६ Å (Å = अँगस्ट्राम = १०-८ सेंमी.) असून अनाकार टेल्यूरियमाचा रंग तपकिरी व वि. गु. ६·०१५ असते.
इतिहास : इ. स. १७८४ मध्ये एफ्. जे. म्यूलर फोन राइशस्टाइन यांनी श्वेत सुवर्ण अथवा करडे सुवर्ण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धातुकापासून (कच्च्या स्वरूपातील धातूपासून) ते निराळे केले व त्याला metallum problematicum अथवा aurum paradoxum असे नाव दिले. पुढे एम्. एच्. क्लापरोट यांनी ही धातू त्यापूर्वीच्या इतर धातूंपेक्षा निराळी आहे, असे ठरवून १७९८ साली तिला टेल्यूरियम असे नाव दिले. लॅटिनमध्ये टेलस (Tellus) म्हणजे माती. १८३२ मध्ये जे. जे. बर्झीलियस यांनी गंधक आणि सिलिनियम या दोन अधातूंशी तिचे साम्य असल्याचे दाखवून दिले. आवर्त सारणीमध्ये गंधक, सिलिनियम व टेल्यूरियम ही तिन्ही मूलद्रव्ये सहाव्या गटात एकाखाली एक आहेत.
उपस्थिती : ही धातू पृथ्वीच्या अग्निज खडकात सु. ८ X १०-९ टक्के प्रमाणात आढळते. मध्य यूरोप, कोलोरॅडो आणि बोलिव्हिया या भागांत मुक्त धातू म्हणून ती सापडते. जपानमध्ये गंधकाच्या साठ्यात सिलिनियमाबरोबर ती आढळते. संयुगावस्थेखेरीज ती क्वचितच आढळते. सामान्यतः तांबे, शिसे, चांदी, सोने, लोह किंवा बिस्मथ यांच्या टेल्यूराइडांच्या स्वरूपात ती सापडते. टेल्यूरियमाच्या काही धातुकांची नावे आणि सूत्रे : टेट्राडायमाइट Bi2Te2S, ॲलॅटाइट PbTe, हेस्साइट Ag2Te आणि कॅलॅव्हेराइट AuTe2. ही धातू प्रामुख्याने तांबे व शिसे यांच्या शुद्धीकरण कारखान्यातील अवपंकातून (गाळासारख्या द्रव्यातून) व टेल्यूराइड-सोन्याच्या धातुकावरील प्रक्रियेतील धूममार्गातील धूळीतून मिळवितात.
प्राप्ती : टेल्यूरियमाचे निष्कर्षण करताना धातुकाची (वा इतर टेल्यूरियमयुक्त द्रव्याची) नेहमीच्या पद्धतीने शुद्धी केल्यावर तप्त सल्फ्यूरिक वा हायड्रोक्लोरिक अम्लाबरोबर ते शिजवितात. या प्रक्रियेत टेल्यूराइट (TeO3 – -) तयार होते. त्यानंतर सल्फर डाय-ऑक्साइड वायूबरोबर विक्रिया केल्यास टेल्यूरियम मिळते.
H2TeO3 + H2O + 2 SO2 ⟶ Te + 2 H2SO4
विद्युत् विच्छेदन (विद्रावातून विद्युत् प्रवाह पाठवून घटक द्रव्ये अलग करण्याच्या) पद्धतीत सल्फ्यूरिक अथवा हायड्रोफ्ल्युओरिक अम्लात धातुकाचा विद्राव करून शिशाच्या ऋणाग्रावर टेल्यूरियमाचा थर विद्युत् विच्छेदनाने मिळविता येतो. बाजारात टेल्यूरियम हे कांबींच्या, तुकडे केलेले स्फटिकीय किंवा शुष्क अवक्षेपित (साक्याच्या स्वरूपातील) चूर्ण या स्वरूपांत मिळते.
रासायनिक गुणधर्म : टेल्यूरियमाच्या ऑक्सिडीकरण अवस्था [⟶ ऑक्सिडीभवन] –२, +२, +४, +६ अशा आहेत. टेल्यूरियम हवेत जळताना निळी ज्योत दिसते आणि टेल्यूरियम डायऑक्साइड (TeO2) मिळते. टेल्यूरियमाची विक्रिया हॅलाइडांबरोबर होते पण गंधक अथवा सिलिनियम यांबरोबर मात्र होत नाही. या विक्रियांत इतर उत्पादनांबरोबरच दोन ऋणभारधारी (Te– –) टेल्यूराइड आयन (विद्युत भारित अणू) व चार धनभारधारी (Te4+) टेल्यूरियम ऋणायन (विद्युत विच्छेदनात ऋणाग्राकडे जाणारे आयन) तयार होतात. पहिल्याचे सिलिनाइडाशी व दुसऱ्याचे प्लॅटिनम (IV) शी साधर्म्य आहे. टेल्यूरिक अम्ल [Te(OH)6] आणि टेल्यूरेटे या संयुगांत टेल्यूरियमाची संयुजा (इतर अणूंशी वा अणूगटांशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) सहा (Te6+) आहे.
टेल्यूरियम विषारी असून शरीरात ही धातू गेली असल्यास उच्छ्वासाला लसणाचा वास येतो, तसेच कातडीवरही परिणाम होतो.
उपयोग : ॲल्युमिनियमाच्या मिश्रधातूंची तन्यता (तार काढता येण्याचा गुणधर्म), कथिलाच्या मिश्रधातूची कठिनता व ताणबल, अगंज (स्टेनलेस) पोलाद व तांबे यांची यंत्रणक्षमता (यंत्राची क्रिया होण्याची क्षमता) तसेच शिसे आणि मँगॅनीज-मॅग्नेशियम मिश्रधातूंची क्षरणरोधकता (झिजण्यास रोध करण्याची क्षमता) वाढविण्यासाठी अल्प प्रमाणात टेल्यूरियम मिसळण्यात येते. विद्युत् विलेपनात (विद्रावातून विद्युत् प्रवाह पाठवून विद्युत् अग्रावरील वस्तूवर विद्रावातील घटक द्रव्याचा लेप देण्याच्या क्रियेत) वस्तूंना चमक आणण्यासाठी विद्युत् विलेपन कुंडात टेल्यूरियमचा उपयोग करतात. खनिज तेलाच्या भंजनाकरिता उत्प्रेरकात (विक्रियेत भाग न घेता विक्रियेची गती वाढविण्यास अथवा ती कमी तापमानास घडण्यास मदत करणाऱ्या पदार्थात) मिसळण्यासाठी, काचधंद्यात काचेला रंग देण्यासाठी त्याचा उपयोग होतो. कार्बनी रंग उद्योगात व शिशाची शक्ती आणि क्षरणरोधकता वाढविण्यासाठी शिशात मिसळण्याकरिता टेल्यूरियमाचा उपयोग होतो.
संयुगे : हायड्रोजन टेल्युराइड (H2Te) हे टेल्यूरियमाचे एकमेव हायड्राइड ज्ञात आहे. हा रंगहीन वायू असून अतिशय तीव्र वासाचा आहे. ॲल्युमिनियम टेल्युराइड (Al2Te3), सोडियम टेल्युराइड (Na2Te) अशी धातूंची टेल्युराइडे बनतात. जड धातूंची टेल्यूराइडे सामान्यतः पाण्यात अविद्राव्य असतात. बिस्मथ टेल्यूराइड व लेड टेल्यूराइड ही अर्धसंवाहक (धातू व निरोधक यांच्या मधली विद्युत् संवाहकता असणारी) द्रव्ये असून तापविद्युत् प्रयुक्तींमध्ये (उष्णतेमुळे निर्माण होणाऱ्या विद्युत् प्रवाहाचा उपयोग करणाऱ्या प्रयुक्तींमध्ये) विद्युत् ऊर्जेचा उद्गम म्हणून किंवा थंड करण्यासाठी त्यांचा उपयोग करतात. टेल्यूरियमाची हॅलाइडांबरोबर विक्रिया होऊन टेल्यूरियम हॅलाइडे मिळतात. टेल्यूरियम हेक्झॅफ्ल्युओराइड (TeF6) हा रंगहीन वायू आहे, तर टेल्यूरियम टेट्राक्लोराइड (TeCl4) हा पांढरा स्फटिकी जलशोषी घन आहे. टेल्यूरियम टेट्राब्रोमाइड (TeBr4) हा नारिंगी घन पदार्थ असून तो ३८०° से. तापमानास वितळतो व ४२१° से. तापमानास उकळतो. टेल्यूरियम टेट्रा-आयोडाइड (TeI4) हे काळे घनरूप संयुग २५९° से. तापमानास वितळते.
टेल्यूरियमाची ऑक्साइडे, अम्ले, मिश्र संयुगे अशी अनेक प्रकारची संयुगे उपलब्ध आहेत. टेल्यूरिक एस्टरे आणि टेल्यूरोकीटोने यांसारखी कार्बनी संयुगे बनतात.
जमदाडे, ज. वि.