टीक, लूटव्हीख : (३१ मे १७७३–२८ एप्रिल १८५३). एक चतुरस्र जर्मन साहित्यिक आणि समीक्षक. बर्लिन येथे जन्मला. हाल, गटिंगेन आणि एर्लांगेन विद्यापीठांतून शिक्षण घेतले (१७९२–९४). व्हिल्हेल्म व्हाकेनरोडर ह्या समवयस्क साहित्यिक मित्राबरोबर शेक्सपिअर, एलिझाबेथकालीन नाट्यकृती, मध्ययुगीन जर्मन साहित्य, वास्तुकला ह्यांसारख्या विषयांचा आस्थेवाईक अभ्यास केला. १७९४ मध्ये तो बर्लिनला परतल्यानंतर त्याने जे लेखन केले त्यात डी गेशिश्ट डेस हेर्न विलिअम लोव्हेल (३ खंड, १७९५–९६, इं. शी. द स्टोरी ऑफ मिस्टर विल्यम लव्हेल) ही पत्ररूप कादंबरी विशेष उल्लेखनीय आहे. एका हळव्या, बुद्धिमान तरुणाच्या नैतिक आत्मनाशाचे चित्रण करणारी ही कादंबरी म्हणजे जर्मनीतील स्वच्छंदतावादाच्या उदयाचे एक गमक ठरले. त्यानंतरच्या त्याच्या डेअर ब्लोंड एकबेर्ट ह्या कथेची मान्यवर स्वच्छंदतावादी समीक्षक श्लेगेल बंधू यांनी प्रशंसा केली. ही कथा म्हणजे विशुद्ध स्वच्छंदतावादी परीकथेचे एक लक्षणीय उदाहरण होय. निसर्ग आणि मानवी जीवन ह्यांच्या गूढ नातेसंबंध तीतून दाखविला आहे. जर्मन स्वच्छंदतावादी चळवळीच्या उत्तरकालात ग्रिम बंधूंनी निखळ लोकपरंपरेतून आलेल्या ज्या परीकथा संकलित केल्या, त्यांहून ह्या कथेचे स्वरूप भिन्न आहे. टॉमस कार्लाइलने ह्या कथेचा इंग्रजी अनुवाद केला आहे (१८२७). टीकने परीकथांवर आधारलेली काही नाटके लिहून बर्लिनमधील बुद्धिवादी वातावरणावर (एन्लाय्टन्मेंट) उपरोधपूर्ण टीका केली. डेअर गेस्टीफेल्ट काटर (इं. शी. पुस इन बूट्स) ही अशी एक नाट्यकृती होय. लेबेन उंडं टोड डेअर हायलिगेन गेनोव्हेवा (१७९९, इं. शी. लाइफ ॲड डेथ ऑफ द होली जेनोव्हेव्हा) आणि कायझर ऑक्टोव्हिअनस (१८०४) ही त्याने लिहिलेली निखळ स्वच्छंदतावादी पद्यनाटके.
ह्यांशिवाय टीकने परभाषेतील विविध साहित्यकृतींचे दर्जेदार अनुवाद केले. त्यांत काही एलिझाबेथकालीन नाट्यकृतींंचा आणि सरव्हँटीझ ह्या स्पॅनिश लेखकाच्या डॉन क्विक्झोट ह्या श्रेष्ठ कादंबरीचा सामावेश होतो.
सोळाव्या-सतराव्या शतकांतील जर्मन नाटकांच्या नव्या आवृत्या त्याने प्रसिद्ध केल्या, तसेच प्राचीन कवितेचे संकलन केले. शेक्सपिअरच्या वाङ्मयाचा त्याचा गाढ व्यासंग होता. शेक्सपिअरेस व्होरशूले ह्या नावाने त्याचे शेक्सपिअरवरील समीक्षात्मक लेखन प्रसिद्ध झाले (१८२३–२९). व्हिल्हेल्म व्हाकेनरोडर ह्याच्या हेर्त्सेन एअरगिसुंगेन आयनेस कुन्स्टलीबेंडेन क्लोस्टरब्रूडर्स (१७९७) ह्या स्वच्छंदतावादी कलासंकल्पनाविषयक छोट्या पुस्तकात टीक ह्यानेही काही लेख लिहिले आहेत. बर्लिन येथे तो निधन पावला.
संदर्भ : 1. Lussky, A. E. Tieck’s Approach to Romanticism, Leipzig, 1925.
2. Zeydel, E. H. Ludwig Tieck, The German Romanticist, 1935.
देव, प्रमोद