टेंबुर्णी : (टेंभुरणी, तिंबविणी हिं. काला तेंडू, गाब क. तुमरी, तुमकी मर सं. तिंदुक गु. टिंबरू इं. रायबर एबनी, वाइल्ड मँगोस्तीन लॅ. डायोस्पिरॉस एंब्रियॉप्टेरिस, डा. पेरेग्रीना, डा. मलबॅरिका कुल-एबेनेसी.) हा सु. नऊ ते दहा मी. उंच, शाखायुक्त व सदापर्णी वृक्ष असून भारतात सर्वत्र आढळतो. उत्तर कारवार आणि कोकण येथील समुद्र किनारे, घाटातील दाट जंगले व नदी किनारे येथे विशेषेकरून, शिवाय सयाम आणि मलाया या देशांतही तो सापडतो. याची साल करडी किंवा फिकट काळी आणि गुळगुळीत असते व तिचे मोठे तुकडे सोलून जातात. पाने लहान देठाची, चिवट, साधी, गुळगुळीत, चकचकीत, एकाआड एक व भिन्न आकारांची असतात. मार्चमध्ये लहान, सुवाहिक, पांढरी, एकलिंगी, चतुर्भागी फुले येतात. पुं-पुष्पे तीन ते सहाच्या झुबक्यांनी व स्त्री-पुष्पे एकेकटी येतात. त्यांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨एबेनेसी अथवा टेंबुर्णी कुलात वर्णिल्याप्रमाणे. मृदुफळ गोलसर, पिकल्यावर तांबूस पिवळे, सूक्ष्म लवदार, चार ते पाच सेंमी. व्यासाचे असते. पाच ते आठ मूत्रपिंडाकृती बिया चिकट मगजात (गरात) आढळतात.
टेंबुर्णीचे लाकूड करडे व मध्यम कठीण असून त्याला चांगली झिलई आणता येते इमारतींकरिता व चांगल्या बांधकामास उपयुक्त असते. फळ व खोडाची साल स्तंभक (आतड्याचे आकुंचन करणारी) असते. कच्चा फळाचा रस जखमेवर लागलीच लावतात. साल आमांश आणि पाळीच्या तापावर देतात. फळांचा फांट (थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क) घसा खवखवण्यावर व तोंड आल्यास गुळण्या करण्यास चांगला बियांचे तेल अतिसार व आमांश यांवर देतात. फळात पंधरा टक्के व सालीत बारा टक्के टॅनीन असते. फळांचा ईथरने काढलेला अर्क सूक्ष्मजंतुनाशक असतो. फळांचा चिकट गर पुस्तकबांधणीस उपयुक्त. कोवळी पाने व फळे जनावरांना खाऊ घालतात, तर काही लोक स्वतः खातात ते फळ तुरट, थंड व वातहारक असते. कच्च्या फळांचा उपयोग कातडी कमाविण्यास आणि कोळ्यांची जाळी, कापड, इमारती लाकूड, बांबूच्या टोपल्या इ. रंगविण्यासाठी करतात. पाने विडीकरिता उपयुक्त. तेंडू व टेंबुर्णी या जातींचे अनेक उपयोग सारखेच आहेत.
जमदाडे, ज. वि.
“