टेंप्लेट : (कोर). नवीन बनविलेल्या एखाद्या वस्तूवर पुष्कळ ठिकाणी भोके पाडावयाची असल्यास अगर इतर यांत्रिक क्रिया करावयाच्या असल्यास त्या वस्तूवर मूळ आरेखाप्रमाणेच सर्व मध्य आणि इतर महत्त्वाच्या रेषा आखाव्या लागतात. त्यांच्या संदर्भानेच बरोबर मापे घेऊन सर्व भोकांच्या जागा वगैरे निश्चितपणे खुणा करून दाखवायच्या असतात. अशा प्रकारे खुणा करण्यासाठी तज्ञ माणूस लागतो आणि त्यालाही असे काम करण्यास बराच वेळ लागतो. एकाच प्रकारच्या पुष्कळ वस्तू बनवावयाच्या असतील, तर प्रत्येक वस्तूवर पुनः पुन्हा खुणा करण्याची दगदग पडू नये म्हणून मूळ आरेखाप्रमाणेच एका पत्र्यावर सर्व रेषा कोरतात आणि भोके पाडणे वगैरे यांत्रिक क्रिया करतात. त्याप्रमाणेच त्या पत्र्यावर मूळ वस्तूची आकार रेषा काढून पत्रा रेषेवरून बरोबर कापून घेतात. या पत्र्याच्या साहाय्याने प्रत्येक नवीन भागावर खुणा करण्याचे काम कोणालाही सहज करता येते. पत्र्याच्या या मार्गणक तुकड्याला कोर (टेंप्लेट) म्हणतात. मूळ वस्तू फार मोठी असेल, तर एक मोठी कोर करून तीवरून काही भागांपुरतीच एक एक लहान कोर तयार करतात.
मोटारगाडीच्या टपासारखा मोठा भाग बनविताना निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या आकाराची गोलाई दिलेली असते. अशा वस्तूचे आठ–दहा भाग सोयीप्रमाणे करून प्रत्येक भाग वेगवेगळा बनवितात व नंतर एकत्र करून जोडतात. प्रत्येक भागाकरिता स्वतंत्र मुद्रा कराव्या लागतात व त्यांना मार्गणक म्हणून उपयोगी पडेल अशी कोर करावी लागते. कोर करण्याकरिता मूळ आरेखाचा उपयोग करता येतो, परंतु कित्येक ठिकाणी वस्तूची प्रतिकृती मातीचा किंवा प्लॅस्टरचा उपयोग करून मोठ्या टेबलावर मांडून ठेवतात आणि त्यावरून प्रत्येक लहान भागापुरतीच एक एक वेगळी कोर करतात.
धातूचे ओतकाम करण्याकरिता मातीत साचे करावे लागतात. साच्यातील नळासारखे गोल भाग बनवताना गोलाई अगदी बरोबर येण्याकरिता पातळ लाकडी पट्ट्यावर प्रथम मूळ मापाप्रमाणे गोलाई काढून आणि तो भाग कापून मार्गणक पट्ट्या तयार करतात. अशा मार्गणक पट्ट्या साच्यात माती भरीत असताना व तयार कामाची तपासणी करण्यासाठीही उपयोगी पडतात, उदा., लेथवर विशिष्ट आकाराच्या वस्तू एकसारख्या बनविण्यासाठी प्रतिकोरीचा (बहिर्गोलाच्या जागी अंतर्गोलाचा) चांगला उपयोग होतो.
ओतकामाकरिता जो फर्मा लागतो, तो बनवितानादेखील पुष्कळ अवघड भागांसाठी मार्गणक पट्ट्यांचा उपयोग करावा लागतो. अशा मार्गणक पट्ट्यांवर मापे मांडीत असताना, धातूंचा रस थंड झाल्यावर आकुंचन पावतो, ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते आणि त्याकरिता जरूरीप्रमाणे मापामध्ये माया ठेवावी लागते.
कोर बनविण्याकरिता एक विशेष प्रकारच्या पोलादाचा पातळ पत्रा बनविलेला वापरतात. तो लवचिक व मजबूत असतो आणि तो पाणी लागले तरी गंजत नाही आणि त्यावर कागदाप्रमाणेच चांगले आरेख काढता येतात. पत्र्यावर खुणा करण्याचे काम साधारणातः हातानेच करतात परंतु त्यावर छायाचित्रणाच्या पद्धतीने मूळ आरेख एकदमही छापता येतो. अशा छापण्याच्या पद्धतीने मोठ्या कोरी बनवणे सोईचे होते.
पहा : छिद्रपाट व धारक पकड.
वैद्य, ज. शि.