टे : स्कॉटलंडमधील सर्वांत जास्त, १९३ किमी. लांबीची नदी. ही बेन लूई पर्वतात उगम पावून फिलन व डॉखर्ट या प्रवाहांनी स्कॉटलंडमधील सर्वांत मोठ्या टे सरोवरात येते. त्यातून बाहेर पडल्यावर तिला लाइअन, अर्न, टमल इ. उपनद्या मिळतात. टे ६,२१६ चौ. किमी. प्रदेशाचे जलवाहन करते व पर्थ येथील फर्थ ऑफ टे खाडीने उत्तर समुद्रास मिळते. खाडीवर डंडी हे तागाच्या कापडाचे व इतर अनेक उद्योगांचे प्रसिद्ध बंदर आहे. खाडीवर रेल्वेचा व सडकेचा पूल आहे. टे सुरुवातीस अत्यंत नयनरम्य प्रदेशातून आणि नंतर अत्यंत समृद्ध खोऱ्यातून वाहते. नदीत व सरोवरात सॅमन मासे मिळतात.
यार्दी, ह. व्यं.