टिपेरा : बांगला देश आणि आसाम यांच्या दरम्यान असलेल्या त्रिपुरा राज्यातील डोंगराळ प्रदेशात राहणारी एक जमात. चितगाँग जिल्ह्यात यांची बरीच वस्ती आढळते. काही अभ्यासकांच्या मते हे पूर्वी मणिपूर भागात राहत होते पण ब्रह्मी लोकांनी हल्ला करून त्यांना तेथून हुसकावून लावले व त्या वेळी ते टिपेरा टेकड्यांवरील जंगलात आले. भारताच्या पूर्व भागात असणाऱ्या गारो, कुकी, कचारी वगैरे जमातींशी यांचे बरेचसे साम्य आढळते. कचारी जमातीमधील दोघा भावांपैकी धाकट्या भावाचे वंशज म्हणजेच टिपेरा असेही समजले जाते, तर काही तज्ञांच्या मते असंगनामक राजा हा त्यांचा मूळ पुरुष होय. त्यांचा पूर्वेतिहास निश्चित नाही, तसेच त्यांची निश्चित लोकसंख्या अद्यापि उपलब्ध झाली नाही.
बसका चेहरा, जाड ओठ, गहू वर्ण अशी मंगोलियन पद्धतीची त्यांची शारीरिक ठेवण असून यांपैकी काही गौरवर्णी आढळतात. तर काहीजण मणिपुरी लोकांसारखेही दिसतात.
ते जडप्राणवादी असले तरी शिव, दुर्गा, विष्णू, लक्ष्मी, सरस्वती, ब्रह्मा, गणेश इ. चौदा हिंदू देवतांना भजतात. देवतांच्या पूजेबरोबरच वृक्ष, झरे, नद्या, पर्वत इत्यादींची पूजा जमातीचा गुरू ओझा याच्याकडून केली जाते. बांबू जमिनीत पुरून त्याची पूजा करण्याची पद्धत अजूनही आढळते. त्यांच्यात पूर्वी मोठ्या प्रमाणावर नरबळी देण्याची प्रथा होती. धर्मराजाच्या वेळेपासून (महाभारत काल) या प्रथेला पायबंद घातला जाऊन पुढे दर तीन वर्षांनी एकदाच नरबळी देण्यात यावा असे ठरले पण ती प्रथा नष्ट झाली आहे. कोणत्याही धार्मिक कृत्याच्या वेळी बकरे व म्हैस मात्र अजूनही बळी दिले जातात.
बांबूची दाट जंगले असल्यामुळे लाकूड तोडून व जाळून झूम पद्धतीची शेती हे लोक करतात. ते मुख्यतः भात पिकवितात पण उदरनिर्वाह पुष्कळसा कंदमुळे व मांस यांवरच चालतो. गायीखेरीज इतर सर्व प्राण्यांचे मांस ते खातात.
जमातीच्या मुख्याला तजाई म्हणतात. त्याच्या सल्ल्याने पंचायतीचे काम चालते. मुलामुलींची लग्ने वयात आल्यानंतरच करतात. लग्नासाठी फक्त वडिलधाऱ्यांची संमती लागते. नवऱ्यास मुलीच्या बापाला देज द्यावे लागते. देज देण्याची ऐपत किंवा परिस्थिती नसल्यास नियोजित सासऱ्याच्या घरी एक ते तीन वर्षे काम करावे लागते. यांच्यात बहुपत्नीकत्वाला बंदी नसली, तरी ते कमी प्रमाणात आढळते. लग्नप्रसंगी स्त्रीपुरुष नृत्य करतात. अविवाहिताला समाजात प्रतिष्ठा नसते. यांची घरे चकमा लोकांच्या घरांसारखीच असतात. पोशाखाच्या बाबतीत यांनी अलीकडे बंगाली लोकांचे अनुकरण केलेले दिसते.
आप्त-स्वकीयांच्या मरणानंतर एक आठवडा सुतक पाळतात, त्या वेळी मांसभक्षण वर्ज्य असते. मृताला जाळण्याची पद्धत आहे.
संदर्भ :Dalton, E. T. Descriptive Ethnology of Bengal, Calcutta, 1960.
कीर्तने, सुमति