टॉम्स्क : रशियाच्या टॉम्स्क कारभार विभागाचे ठाणे. लोकसंख्या ३,८६,००० (१९७४). हे छोटे नदीबंदर टॉम नदीच्या उजव्या तीरावर, टॉम-ओब संगमापासून ४३ किमी.वरच्या बाजूस, नोव्होसिबिर्स्कच्या ईशान्येस २०० किमी., ट्रान्स-सायबीरियन रेल्वेच्या एका फाट्यावर असून सायबीरियातील मोठे औद्योगिक केंद्र आहे. येथे गोलक धारवा (बॉल बेअरिंग्ज), विजेची सामग्री, आगपेट्या, पेन्सिली, रंजके व रंगलेप, पादत्राणे, घरगुती सामान, विजेचे दिवे, रबराच्या वस्तू, आटा, विमानाची एंजिने, धातुसामान, सिगारेटी, मद्य, मांस, वनस्पती तेले इत्यादींचे कारखाने असून धान्य, गुरेढोरे, लोणी, मासे, लाकूड, कातडी वगैरेंचा मोठा व्यापार चालतो. १६०४ मध्ये नदीउतारांच्या संरक्षणार्थ बांधलेल्या किल्ल्याच्या निमित्ताने वसलेले हे गाव १८२४ मध्ये सोन्याच्या शोधामुळे भरभराटीस आले परंतु सोने संपल्यामुळे व ट्रान्स-सायबीरियन रेल्वे सु. ८६ किमी. दक्षिणेकडून गेल्यामुळे त्याचे महत्त्व कमी झाले. हा लोहमार्ग ओब नदी ओलांडतो तेथील नोव्होसिबिर्स्कने याला मागे टाकले. तथापि विद्यापीठ (१८८८), तंत्रनिकेतन व वैद्यक, वाहतूक, बांधकाम अभियांत्रिकी, शिक्षण-प्रशिक्षण, रसायन इ. विषयक विद्यालयांमुळे आणि ग्रंथालये, संग्रहालये, बगीचे इत्यादींमुळे याचे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र म्हणून महत्त्व वाढले.
लिमये, दि. ह.