टॉमसन, इलिहू :(२९ मार्च १८५३–१३ मार्च १९३७). अमेरिकन संशोधन व विद्युत् अभियंते. प्रत्यावर्ती (उलट-सुलट दिशेने वाहणाऱ्या) प्रवाहावर चालणाऱ्या चलित्राचा (मोटरचा) विकास होण्यास टॉमसन यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले.

त्यांचा जन्म इंग्लंडमधील मँचेस्टर येथे झाला. १८५८ मध्ये ते आई-वडिलांबरोबर अमेरिकेस गेले. फिलाडेल्फिया येथे शिक्षण घेतल्यानंतर तेथील सेंट्रल हायस्कूलमध्ये ते रसायनशास्त्र आणि यामिकी (प्रेरणांची वस्तूंवर होणारी क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यांसंबंधीचे शास्त्र) या विषयांचे प्राध्यापक होते (१८७०–८०). १८८० मध्ये त्यांनी एडविन जे. ह्यूस्टन यांच्या सहकार्याने टॉमसन-ह्यूस्टन इलेक्ट्रिक कंपनी सुरू केली. पुढे १८९२ मध्ये एडिसन कंपनीत या कंपनीचे विलीनीकरण होऊन जनरल इलेक्ट्रिक कंपनीची स्थापना झाली. टॉमसन यांनी ७०० हून अधिक एकस्वे (पेटंटे) मिळविली व या कंपनीने या एकस्वांचा उपयोग करून घेतला. त्यांच्या शोधांमध्ये टॉमसन प्रज्योत (आर्क) दिवे, टॉमसन प्रज्योत वितळजोड (वेल्डिंग) पद्धती, जनित्र (यांत्रिक शक्तीचे विद्युत् शक्तीत रूपांतर करणारे यंत्र) व चलित्र यांच्याकरिता तीन वेटोळ्यांचे आर्मेचर, प्रवर्तन चलित्र (ज्यात प्राथमिक वेटोळ्यातील प्रवाहामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय स्रोताने दुय्यम वेटोळ्यात प्रवाह निर्माण होऊन त्याला परिभ्रमण गती मिळते असे चलित्र), एकदिश व प्रत्यावर्ती विद्युत् ऊर्जामापक (वॉट-तास मापक) इत्यादींचा समावेश होता. प्रत्यावर्ती प्रवाहाच्या अपसरण आविष्काराचा त्यांनी लावलेला शोध व त्यांचे या क्षेत्रातील कार्य यांमुळे प्रत्यावर्ती प्रवाह चलित्राच्या विकासाचा यशस्वी पाया घातला गेला. १८८० मध्ये त्यांनी पहिले उच्च कंप्रता (एका सेकंदात होणाऱ्या आवर्तनांची संख्या उच्च असलेले) जनित्र व नंतर थोड्याच काळात उच्च कंप्रता रोहित्र (विद्युत् दाब बदलण्याचे साधन) तयार केले.

अनेक विद्युत् विषयक संस्थांचे ते सदस्य होते आणि इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी व अमेरिका येथील कित्येक संस्थांनी त्यांचा गौरवपूर्वक सन्मान केला. १९२०–२२ या काळात ते मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष होते. त्यांनी अनेक शास्त्रीय आणि अभियांत्रिकी नियतकालिकांतून लेख लिहिले. ते स्वॉम्फस्कट (मॅसॅचूसेट्स) येथे मृत्यू पावले.

कानिटकर, बा. मो.