टायर–१ : सूर. लेबाननचे प्राचीन बंदर. लोकसंख्या सु. १५,००० (१९७०). हे बेरूतच्या नैर्ऋत्येस सु. २५० किमी. आहे. बंदर एका बेटावर व शहर मुख्य भूमीवर असून ते घेण्यासाठी त्यांना जोडणारा धक्का अलेक्झांडरने बांधविला. इ. स. पू. अकरावे ते सहावे शतक टायर फिनिशियाची राजधानी होते. ॲसिरियन व बॅबिलोनियन स्वाऱ्यांच्या यशस्वी प्रतिकारानंतर ते इराण, ईजिप्त, ग्रीस, रोम यांच्या सत्तेखाली तसेच मुसलमान व ख्रिस्ती क्रूसेडर्सच्या अंमलाखाली होते. १२९१ मध्ये मुस्लीम मामलुकांनी घेऊन ते उद्ध्वस्त केले. रोमन काळात रेशमी वस्त्रे व विशिष्ट जांभळा रंग यांसाठी टायर प्रसिद्ध होते.
लिमये, दि. ह.