टायरोसीन : एक ॲरोमॅटिक गटाचे ⇨ॲमिनो अम्ल. रेणवीय सूत्र (पदार्थाच्या रेणूत असलेले अणुप्रकार व त्यांच्या संख्या दर्शविणारे सूत्र) C9H11NO3. आल्फा ॲमिनो बीटा पॅरा हायड्रोक्सिफिनिल प्रॉपिऑनिक अम्ल या नावानेही ते ओळखले जाते. रेणुभार १८१·१९. चीज, फायब्रीन व केसीन यांचे जलीय विच्छेदन करून (पाण्याच्या विक्रियेने रेणूचे तुकडे करून) फोन लीबिक यांनी १८४६ मध्ये टायरोसीन प्रथम वेगळे केले. केसीन, फायब्रीन, केस, रेशीम इत्यादींमधील प्रथिनांत ते साधारणपणे ११ प्रतिशत आढळते. इतर प्रथिनांतही ते थोड्याफार प्रमाणात असते. D–व L– टायरोसीन असे दोन प्रकाशीय समघटक (सारखे रेणवीय सूत्र असलेली पण निरनिराळे गुणधर्म व संघटन असेलली संयुगे) आहेत. त्यांपैकी L– समघटकाची चव कडवट असून वितळबिंदू २९५° से. असतो तर D– समघटक साखरेप्रमाणे गोड असून त्याचा वितळबिंदू ३१०°–३१४° से. असतो. जैव दृष्ट्या L– टायरोसीन हे ॲमिनो अम्ल महत्त्वाचे आहे. L– समघटकाची संरचना (रेणूमध्ये अणू एकमेकांना कसे जोडले आहेत हे दाखविणारी रचना) पुढीलप्रमाणे आहे.
२५° से. ला त्याचे भौतिक स्थिरांक पुढीलप्रमाणे आहेत :
pK1 (COOH): २·२० pK2 (NH+3) : ९·११ समविद्युत् भार बिंदू : ५·६६ प्रकाशीय वलन : [α]D (५ – सममूल्यी हायड्रोक्लोरिक अम्लात) : – १०·०° विद्राव्यता (ग्रॅम १००/मिलि. पाणी) : ०·०५.
वरील भौतिक स्थिरांकांच्या स्पष्टीकरणाकरिता ‘ॲमिनो अम्ले’ या नोंदीतील भौतिक गुणधर्म हा परिच्छेद पहावा.
आल्डिहाइड पद्धतीने थायोहायडंटाइन वापरून तसेच एम्. एस्. डन यांच्या पद्धतीने डायकीटोपायपरेझीन वापरून टायरोसिनाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करतात. टायरोसिनाच्या चिकित्सेसाठी झँथोप्रोटिक परीक्षा व मिलॉन यांची सुधारित परीक्षा पद्धत वापरतात.
जैव संश्लेषण : फिनिल ॲलॅनीन या ॲमिनो अम्लापासून हे शरीरात तयार होऊ शकते. म्हणून या ॲमिनो अम्लाचा अत्यावश्यक ॲमिनो अम्ल गटात समावेश केलेला नाही. L– टायरोसीन हे जर अन्नात भरपूर असेल, फिनिल ॲलॅनीन या आवश्यक ॲमिनो अम्लाची शरीरातील गरज कमी होते.
चयापचय : (शरीरात सतत घडणाऱ्या भौतिक व रासायनिक घडामोडी). टायरोसिनावर टायरोसीनेज या एंझाइमाची (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या पदार्थाची) क्रिया होऊन डायऑक्सिफिनिल ॲलॅनीन (DOPA, डोपा) बनते आणि त्यापासून त्वचेत मॅलॅनीन हे रंगद्रव्य बनते. थायरॉक्सिन, एपिनेफ्रिन व नॉरएपिनेफ्रिन ही हॉर्मोने शरीरात टायरोसिनापासून तयार होतात. टायरोसिनाच्या विघटनाचा शरीरातील मार्ग मुख्यतः पुढीलप्रमाणे आहे.
↓
होमोजेंटिसिक अम्ल
↓
↓ अनेक विक्रिया
↓
फ्युमॅरिक अम्ल व ॲसिटोॲसिटिक अम्ल
चयापचयातील जन्मजात दोषामुळे टायरोसिनाचा योग्य प्रकारे चयापचय होत नाही व त्यामुळे अल्कॅप्टोन्यूरिया, अल्कनिझम, टायरोसीनोसीस, फिनिल कीटोन्यूरिया इ. रोग आढळतात [⟶ चयापचय]. फ्ल्युरोटायरोसीन, पॅरा ॲमिनो फिनिल ॲलॅनीन, मेटा नायट्रो टायरोसीन ही संयुगे टायरोसिनाची प्रतिरोधके (परस्परविरोध करणारी संयुगे) आहेत.
रानडे, अ. चिं.
“