टाम, ईगॉऱ्‍य येव्हग्येन्येव्ह्यिच : (८ जुलै १८९५ – १२ एप्रिल १९७१). रशियन भौतिकीविज्ञ. चेरेनकॉव्ह प्रारण व अणुकेंद्रीय भौतिकी यांविषयीच्या कार्याकरिता प्रसिद्ध. चेरेनकॉव्ह प्रारणासंबंधीच्या कार्याबद्दल टाम यांना पी. ए. चेरेनकॉव्ह व आय्. एम्. फ्रँक यांच्याबरोबर १९५८ चे भौतिकीचे नोबेल पारितोषिक मिळाले.

त्यांचा जन्म व्ह्‌लॅडिव्हस्टॉक येथे झाला. मॉस्को विद्यापीठाची पदवी १९१८ मध्ये मिळवल्यानंतर त्यांनी १९१९–२२ या काळात निरनिराळ्या विद्यापीठांत व तांत्रिक संस्थांत भौतिकीचे अध्यापन केले. १९२४ मध्ये मॉस्को विद्यापीठात मार्गदर्शक म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि तेथेच ते १९२७ मध्ये प्राध्यापक व १९३० मध्ये सैद्धांतिक भौतिकी विभागाचे प्रमुख झाले. त्यांना १९३३ साली भौतिकी-गणितीय शास्त्राची डॉक्टरेट मिळाली व पुढील वर्षीच रशियाच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या ल्येब्येड्येव्ह फिजिकल इन्स्टिट्यूटचे प्रमुख झाले. 

प्रारंभी त्यांनी स्फटिक प्रकाशकी, प्रकाशाच्या प्रकीर्णनाबद्दलचा (विखुरण्याबद्दलचा) पुंज ( क्वांटम) सिद्धांत, सापेक्षता सिद्धांत व ⇨पुंज यामिकी या विषयांचा अभ्यास केला. मूलकण, अणुकेंद्रीय प्रेरणा व अणुकेंद्रीय संश्लेषणाचा सिद्धांत यांसंबंधी त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले. १९३४ मध्ये त्यांनी बीटा किरणांच्या  [⟶ किरणोत्सर्ग] उत्सर्जनाशी संबंधित अणुकेंद्रीय प्रेरणांविषयक सिद्धांत मांडले. हे सिद्धांत फारसे यशस्वी झाले नाहीत तरी पण त्यामधून पुढे विकसित झालेली टाम-डॅनकॉफ पद्धत सैद्धांतिक भौतिकीत फार उपयुक्त ठरली आहे. एखाद्या माध्यमातून त्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने इलेक्ट्रॉन जात असल्यास एक विशिष्ट प्रकारचे प्रारण उत्सर्जित होते, असा शोध चेरेनकॉव्ह यांनी लावला व हे प्रारण चेरेनकॉव्ह प्रारण या नावाने ओळखण्यात येते. १९३७ मध्ये टाम व फ्रँक यांनी या प्रारणाचा उद्‌भव व त्याचे निरनिराळे गुणधर्म यांचे स्पष्टीकरण करणारा गणितीय सिद्धांत मांडला. या सिद्धांतावरून वर्तविण्यात आलेले चेरेनकॉव्ह प्रारणाचे सर्व विशेष प्रायोगिक कसोट्यांना पूर्णपणे उतरले. या सिद्धांताचाच पुढे १९५० मध्ये चेरेनकॉव्ह गणित्र [⟶ कण अभिज्ञातक] हे मूलकण शोधणारे अत्यंत सूक्ष्मग्राही उपकरण तयार करण्यासाठी उपयोग झाला. टाम व फ्रँक यांनी मांडलेल्या सिद्धांताचा आता बराच विकास झालेला असून ⇨आयनद्रायू भौतिकीसारख्या क्षेत्रात तो उपयुक्त ठरलेला आहे. 

त्यांनी विश्वकिरणांतील (बाह्य अवकाशातून येणाऱ्‍या अतिशय भेदक किरणांतील) मूलकणांच्या वर्षावासंबंधीचा सिद्धांत व औष्णिक अणुकेंद्रीय प्रक्रियांचे नियंत्रण करण्याच्या पद्धती या विषयांतही महत्त्वाची कामगिरी केली आहे. रशियाच्या हायड्रोजन बाँब प्रकल्पात त्यांचा महत्त्वाचा भाग होता, असे म्हटले जाते.

रशियाच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून १९५३ मध्ये त्यांची निवड झाली. काही पोलिश, स्वीडिश व अमेरिकन शास्त्रीय संस्थांचेही ते सदस्य होते. त्यांनी रिलेटिव्हिस्टिक इंटरॲक्शन ऑफ एलिमेंटरी पार्टिकल्स (१९४५) व ऑन द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द न्यूट्रिनो (१९३४) हे ग्रंथ लिहिले आहेत. विद्युत् गतिकी या विषयावरील त्यांचे पाठ्यपुस्तक सुप्रसिद्ध असून त्याच्या अनेक आवृत्त्या निघालेल्या आहेत व अनेक भाषांत त्याचे अनुवादही झालेले आहेत. पग्वॉश कॉन्फरन्समध्ये रशियातर्फे त्यांनी अनेक वेळा भाग घेतला. अणुबाँबच्या प्रायोगिक स्फोटांवर आंतरराष्ट्रीय नियंत्रण घालण्यासाठी त्यांनी ‘ब्लॅक बॉक्स’ या उपकरणाचा उपयोग करावा, असे सुचविले होते. ते मॉस्को येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.