टाकसाळ : शासनाने बनावट नाण्यांच्या उत्पादनास प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने कायद्यान्वये प्रस्थापित केलेला, ठराविक घटक, वजन, आकार व इतर गुणधर्म असलेली नाणी पाडण्याचा कारखाना.
इतिहास : जगातील पहिली टाकसाळ ख्रि. पू. सातव्या शतकाच्या सुरुवातीस लिडियाच्या जायजीझ राजाने स्थापिली. त्यानंतर ग्रीसमध्येही चांदीची नाणी पाडण्याची टाकसाळ निघाली. तेथून नाणी पाडण्याची कला इटली, आसपासचे देश व इराण या देशांत पसरली. रोमनांची ख्रि. पू. चौथ्या शतकात नाणी पाडण्यास प्रारंभ केला व त्यांनीच आधुनिक टाकसाळीचा पाया घातल्याचे मानतात. चीनमध्येसुद्धा नाणी पाडण्यास सुरुवात ख्रि. पू. सातव्या शतकातच स्वतंत्रपणे झाली होती. ब्रिटनवर रोमनांचा ताबा असताना तिसऱ्या शतकात तीन टाकसाळी उघडण्यात आल्या, परंतु त्या लवकरच बंद पडल्या. सहाव्या शतकात नवीन टाकसाळी सुरू होऊन त्यांची संख्या नॉर्मन स्वारीच्या वेळी ७० हून अधिक होती. तेराव्या शतकात फ्रान्समध्ये ५० हून अधिक टाकसाळी होत्या. सोळाव्या शतकात मेक्सिको व द. अमेरिका स्पेनच्या ताब्यात आल्यावर तेथेही टाकसाळी निघाल्या. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील पहिली टाकसाळ १७९२ मध्ये फिलाडेल्फिया येथे सुरू झाली.
भारतात नाण्यांचा वापर केव्हा सुरू झाला ते निश्चितपणे सांगता येत नाही परंतु वेदकाळात धातूंच्या नाण्यांचा वापर असावा, असे पुराव्यावरून आढळते. मनु व पाणिनी यांना नाण्यांच्या उपयोगाची कल्पना होती. ख्रि. पू. ३२६ च्या शिकंदरच्या भारतावरील स्वारीच्या वेळी आंभीने त्याला तक्षशिला येथे चांदीची नाणी भेट म्हणून देण्यात आल्याचा उल्लेख आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या कारकीर्दीत नाणी पाडण्याचे काम एका स्वतंत्र खात्याकडे असे. नंतरच्या गुप्त, चालुक्य, राष्ट्रकूट इ. वंशांतील राजांनी स्वतःची सोने, चांदी आणि तांबे यांची नाणी प्रचारात आणली होती. अकबराच्या काळात नाण्यांचा प्रसार वाढला व २४ टाकसाळी सुरू झाल्या. शिवकालीन मराठी राज्यांची स्वतःची नाणी असत. पेशव्यांची पुण्यात एक टाकसाळ होती. तसेच भोसल्यांच्या कटक (ओरिसा) व नागपूरला, गायकवाडांची बडोद्यास, शिंद्यांची ग्वाल्हेर व उज्जैन येथे आणि होळकरांची इंदूरला अशा मराठ्यांच्या टाकसाळी होत्या. ब्रिटिशांनी पहिली टाकसाळ १६४० साली मद्रासला, दुसरी १६७१ मध्ये मुंबईत आणि तिसरी १७५९ मध्ये कलकत्ता येथे स्थापिली. इतर ठिकाणीही त्यांनी साहाय्यक टाकसाळी काढल्या होत्या. १८१५ मध्ये मुंबई व कलकत्ता येथे दोन मोठ्या टाकसाळी सुरू झाल्यावर इतर सर्व बंद करण्यात आल्या. सध्या केंद्र सरकारने फक्त मुंबई, कलकत्ता (अलीपूर) आणि हैदराबाद या ठिकाणीच टाकसाळी चालू ठेवल्या आहेत.
नाण्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या धातू : धातूंची नाणी टिकाऊ, सहज ओळखण्यासाठी व खात्रीलायक असली, तरच ती वापरात राहू शकतात. हे गुणधर्म सोने, चांदी, तांबे, निकेल यांसारख्या धातूंच्या नाण्यात असतात. भारतात व अन्यत्र उच्च किंमतीच्या नाण्यांसाठी सोने, साहाय्यक नाण्यांसाठी चांदी व कमी किंमतीच्या नाण्यांसाठी तांबे वापरीत असत. सोने किंवा चांदी यात १/१२ भाग तांबे मिसळून होणारी मिश्रधातू आणि तांब्यात अल्प प्रमाणात कथिल व जस्त मिसळून होणारी मिश्रधातू यांची नाणी पुरेशी टणक व न झिजणारी असतात. ब्रिटिश अमदानीच्या सुरुवातीस चालू झालेली ३० रुपयांची दुहेरी मोहोर आणि दहा व पाच रुपयांची ही सर्व सोन्याची नाणी १९०६ साली स्थगित करण्यात आली. पंधरा रुपयांचे सोन्याचे नाणे मुंबईच्या टाकसाळीत पाडण्यात आले, पण ते काम एक-दोन वर्षातच थांबविण्यात आले व त्यानंतर सोन्याची नाणी निघाली नाहीत. एक, अर्धा, पाव व एक-अष्टमांश अशी रुपयांची मालिका ११/१२ भाग शुद्ध प्रमाणित चांदीची बनविण्यात आली. एक-अष्टमांश रुपयाचे नाणे १९१७ मध्ये बंद करण्यात आले व त्याऐवजी तांबे-निकेल मिश्रधातूचे दोन आण्यांचे नाणे प्रचारात आले. १९१९ मध्ये अर्धा व पाव रुपयाची नाणीही याच मिश्रधातूची काढण्यात आली, परंतु ती लोकप्रिय न झाल्याने काही वर्षांनी ती पुन्हा चांदीची काढली जाऊ लागली. दुसऱ्या महायुद्धात एक रुपया, अर्धा व पाव रुपया ही नाणी फक्त ५०% चांदी असलेल्या मिश्रधातूची काढीत. १९४७ मध्ये वरील धातूऐवजी अस्सल निकेलाची नाणी आली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही काळ नाण्यांची वजने व धातू कायम राहिली. १९५० मध्ये त्यांच्या रचनेत बदल करण्यात येऊन एका बाजूवर राजमुद्रेऐवजी अशोकस्तंभ व दुसरीकडे वाघ छापाऐवजी धान्याच्या लोंब्यांचा छाप मारण्यात आला. १९५७ मध्ये दशमान पद्धती अंमलात आल्यानंतर रुपया, ५० पैसे व २५ पैसे ही नाणी शुद्ध निकेलापासून बनवून त्यांची वजने अनुक्रमे १०, ५ व २·५ ग्रॅ. ठेवण्यात आली आणि एका बाजूचा छापही गाळण्यात आला. १९०६ ते १९४२ या काळात तांबे-निकेल (७५% तांबे व २५% निकेल) ही मिश्रधातू अर्धा आणा, एक आणा, दोन आणे आणि आठ आणे या नाण्यांसाठी वेळोवेळी वापरण्यात आली परंतु १९४२ पासून तिच्याऐवजी निकेल-पितळ (७९% तांबे, २०% जस्त, १% निकेल) ही धातू वापरात आली. ही धातू लोकप्रिय न झाल्याने ह्या नाण्यासाठी १९४६ पासून पुन्हा तांबे-निकेल वापरण्यात आली. दशमान मालिकेत २, ५ व १० पैशांची नाणी तांबे-निकेलाचीच सुरू झाली. १९६५ मध्ये दोन पैशांचे नाणे व १९६७ मध्ये ५ पैशांचे नाणे तांबे-निकेलाऐवजी ॲल्युमिनियम-मॅग्नेशियम या टणक व झीजरोधक मिश्रधातूचे व १९६८ पासून १० पैशांचे नाणे ॲल्युमिनियम-ब्राँझ या मिश्रधातूपासून काढण्यात आले. सध्या एक, दोन, तीन आणि पाच पैशांची नाणी ॲल्युमिनियम-मॅग्नेशियमाचीच बनवितात.
भारत सरकारच्या टाकसाळीत बनविलेल्या प्रचलित नाण्यांची माहिती (१ जून १९६९). |
|||
संज्ञा (पैसे) |
रचना |
आकार |
मानकीयवजन(ग्रॅम) |
१०० |
शुद्ध निकेल |
गोलाकार |
१० |
५० |
शुद्ध निकेल |
गोलाकार |
५ |
२५ |
शुद्ध निकेल |
गोलाकार |
२·५ |
२० |
ॲल्युमिनियम-ब्राँझ |
गोलाकार |
४·५ |
१० |
तांबे-निकेल |
अष्ट-खवली |
५ |
१० |
ॲल्युमिनियम-ब्राँझ |
अष्ट-खवली |
४·२५ |
५ |
तांबे-निकेल |
चौकोनी (कोपरे गोलाकार) |
४ |
५ |
ॲल्युमिनियम-मॅग्नेशियम |
चौकोनी (कोपरे गोलाकार) |
१·५ |
३ |
ॲल्युमिनियम-मॅग्नेशियम |
षट्कोनी (कोपरे गोलाकार) |
१·२५ |
२ |
ॲल्युमिनियम-मॅग्नेशियम |
अष्ट-खवली |
१ |
१ |
ॲल्युमिनियम-मॅग्नेशियम |
चौकोनी (कोपरे गोलाकार) |
०·७५ |
नाणे पाडण्याची पद्धत : पूर्वीच्या काळी ओतकाम करून किंवा धातूचा तुकडा कोरलेल्या साच्यावर ठेवून त्यावर हातोडीने प्रहार करून नाणी पाडली जात. सध्याच्या नाणी पाडण्याच्या पद्धतीत खालील प्रक्रियांचा समावेश होतो : (१) अशुद्ध धातू शुद्ध करणे, (२) भट्टीत धातू वितळवून ते ओंडक्याच्या किंवा ठोकळ्याच्या आकारात ओतणे, (३) त्यांपासून पट्ट्या बनविणे, (४) पट्ट्यांचे तुकडे किंवा तबकड्या बनविणे, (५) हे तुकडे शुद्ध करून थंड करणे, (६) तुकड्यांचे काठ उंच करणे, (७) तुकड्यांचे वजन तपासून पाहणे व अयोग्य वजनाचे तुकडे वितळविणे, (८) विजेवर चालणाऱ्या दाबयंत्रात बसविलेल्या मुद्रांमध्ये हे तुकडे ठेवून त्यांवर छाप उठविणे, (९) नाण्यांची तपासणी करून ती वितरणासाठी पिशव्यांतून भरणे.
नाण्यांची तपासणी : टाकसाळींच्या उत्पादनात गुणवत्ता नियंत्रणाला फार महत्त्व आहे. त्यासाठी नाण्यांची तपासणी करण्याची व्यवस्था सर्व टाकसाळींमधून करावी लागत. उच्च किंमतीच्या धातूंची नाणी अतिशय काटेकोर पद्धतीने तपासावी लागत, परंतु प्रचलित नाण्यांसाठी अशा धातू वापरात नसल्यामुळे तपासणीचे काम काहीसे सोपे झाले आहे. टाकसाळीचा मुख्य पारखी दर दिवशी तयार होणाऱ्या नाण्यांमधून यदृच्छेने काही नाणी गोळा करून तपासतो व त्यायोगे त्यांचे वजन व परिशुद्ध रचना ठराविक मर्यादांत आहेत की नाहीत याची खात्री करून घेतो.
टाकसाळीची इतर कामे : नाणी पाडण्याखेरीज टाकसाळी खालील कामेही स्वीकारतात : (१) सोने व चांदी वितळविणे, शुद्ध करणे, ओतकाम करणे व पारख करणे (२) मानकीय वजने, मापे व लांबी मोजणाऱ्या पट्ट्या यांचे उत्पादन (३) मंत्रालये व सार्वजनिक संस्थांसाठी लागणारी पदके, बिल्ले इत्यादींचे उत्पादन (४) नाणकशास्त्रप्रवीणांना लागणारी विवक्षित नाणी पाडणे.
पहा : नाणी.
जोशी, वि. ज. (इं.) जोशी, म. वि. (म.) धोंगडे, ए. रा.
“