टाकणखार : (सवागी, बोरॅक्स). खनिज. स्फटिक एकनताक्ष, प्रचिनाकार. पाटन (100) स्पष्ट [⟶ स्फटिकविज्ञान]. संपुंजित व पटलांच्या रूपातही हा आढळतो. भंजन शंखाभ. काहीसा ठिसूळ. कठिनता २–२·५. वि.गु. १·७. चमक काचेसारखी, दुधी काचेप्रमाणे पारभासी. रंगहीन किंवा पांढरा. चव गोडसर. रा. सं. Na₂B4O7·10H2O. बंद नळीत तापविल्यास यातून पाणी बाहेर पडते. सरोवरातील लवणयुक्त पाण्याच्या बाष्पीभवनाने टाकणखार तयार होतो व जिप्सम, केर्नाइट, कोलमनाइट वगैरे खनिजांच्या जोडीने आढळतो. टंकण या संस्कृत शब्दावरून टाकणखार, तर चमकणे अर्थाच्या बराक या अरबी शब्दावरून बोरॅक्स हे इंग्रजी नाव पडले आहे.
ठाकूर, अ. ना.
इतिहास : सु. चार हजार वर्षांपूर्वी बॅबिलोनियन लोक सोनारकामात वापरण्याकरिता टाकणखार हिमालयापलीकडील प्रदेशातून (तिबेट) आणवीत. प्राचीन ईजिप्शियन याचा उपयोग शवे टिकविण्याकरिता (ममी) करीत. चिनी आणि अरबही उद्योगधंद्यात टाकणखार वापरीत असत. सुश्रुतसंहिसा या वैद्यकीय ग्रंथात याचा उल्लेख आहे.
यूरोप खंडाला याचा प्रथम परिचय मार्को पोलो यांनी तेराव्या शतकात करून दिला.
पूर्वी टाकणखाराचा पुरवठा मुख्यतः तिबेटमधून होत असे. काश्मीरमधील पुगा खोऱ्यामध्ये याचे साठे आहेत. त्यापासूनही काही उत्पादन होत असे. अशुद्ध टाकणखार शुद्ध करून निर्यात करण्याचा व्यावसाय भारतात पूर्वी होता. आधुनिक काळात अमेरिकेची संयुक्त संस्थाने प्रामुख्याने जागतिक पुरवठा करतात.
खनिज साठे : पूर्व काश्मीरातील रुप्शू जिल्ह्यापासून ईशान्य तिबेटमधील हुंदेश येथपर्यंतच्या भागात टाकणखार खनिजाचे साठे आहेत. पुगा खोऱ्यात त्याचप्रमाणे रूडोकपासून मानस सरोवरापर्यंतच्या भागातही त्याचे अस्तित्व आहे. राजस्थानमधील सांबर सरोवराच्या पाण्यात ०·५ टक्के टाकणखार आहे. काठेवाडात लिमडी नजीकच्या भागांतील मातीत टाकणखार आढळतो.
इटलीमधील काही ⇨उन्हाळ्यांच्या पाण्यापासून प्रत्यक्ष टाकणखार नव्हे पण बोरिक अम्ल मिळते. त्यापासून टाकणखार काही प्रमाणात बनवितात.
दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना, चिली, पेरू त्याचप्रमाणे कॅनडा, चीन, जर्मनी, सिरिया, तुर्कस्तान, रशिया इ. देशांत टाकणखार किंवा तो बनविता येण्यासारखा खनिजांचे लहान मोठे साठे आहेत व त्यांपासून वेळोवेळी थोडेफार उत्पादनही झाले आहे. तथापि विस्तार, खनिजाची प्रत व वाहतुकीची अनुकूलता या दृष्टींनी महत्त्वाचे आधुनिक साठे म्हणजे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील मोहावी वाळवंटातील क्रामेर जिल्ह्यातील साठे व सर्ल्स सरोवरातील लवणजल हे होत.
उत्पादन : क्रामेर खाणीत जमिनीखाली सु. ४० मी. पासून ३०० मी. पर्यंत टाकणखार खनिजाचा साठा आहे. या खनिजात टाकणखार व केर्नाइट Na2O·2B2O3·4H2O ही मुख्य लवणे आहेत. हे खनिज अंदाजे १० कोटी टन असावे. विवर पाडून खाणीतून इतर खनिजे वर काढतात त्याच पद्धतीने हे खनिज वर काढून यंत्राने त्याचे पीठ करतात. खाणीतील वेगवेगळ्या ठिकाणांहून काढलेली खनिजे त्यांतील B2O3 या संयुगाच्या प्रमाणानुसार मिसळून B2O3 चे विशिष्ट प्रमाण असलेले मिश्रण बनवितात व त्याचा जलविद्राव करतात. तो विशेष प्रकारच्या बाष्पावरण असलेल्या पात्रात घालून उकळेपर्यंत तापवितात. टाकणखार व लवणे विरघळतात व दगडमाती इ. अविद्राव्य (न विरघळणारे) पदार्थ तसेच राहतात. हलत्या चाळण्यांच्या योगाने ते काढून टाकले म्हणजे एक गढूळ विद्राव मिळतो. तो विशेष प्रकारच्या पात्रात घालून आटवून संहत करतात (विद्रावातील विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण वाढवितात). गढूळपणा देणारी द्रव्ये गाळाच्या रूपाने एकत्र होतात. ती गाळली म्हणजे नितळ विद्राव मिळतो. त्यापासून निर्वात-स्फटिकीकरण पात्रे वापरून अंशतः शुद्ध टाकणखार मिळवितात व तो काढून घेऊन व पुन्हा स्फटिकीकरण करून शुद्ध टाकणखार बनवितात.
सर्ल्स सरोवरातील साठ्याचा सु. ४५ टक्के भाग संतृप्त (विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण जास्तीत जास्त असलेल्या) लवण जलाच्या रूपांत आहे. घनरूप लवणाच्या अधूनमधून असणाऱ्या मोकळ्या जागेत तो भरलेला आहे. इष्ट त्या खोलीवरील लवणजल पंपाने काढून घेऊन टाकणखार प्राप्तीसाठी वापरतात. या जलात टाकणखाराशिवाय सोडियम क्लोराइड, सोडियम सल्फेट, सोडियम कार्बोनेट, पोटॅशियम क्लोराइड, व इतर काही लवणे असतात. ती वेगळी करण्याकरिता दोन पद्धती प्रचारात आहेत : (१) बाष्पीकरण पद्धत व (२) कार्बोनेशन पद्धत.
बाष्पीकरण पद्धतीत लवणजल विशेष तऱ्हेच्या बाष्पपात्रांत घेऊन त्यांचे नियंत्रित बाष्पीकरण करातात. त्यायोगे सोडियम क्लोराइड, सल्फेट व कार्बोनेट ही लवणे अविद्राव्य होऊन बाहेर पडतात आणि काढली जातात. नंतर राहिलेल्या विद्रावाचे आणखी बाष्पीकरण पोटॅशियम क्लोराइडचा संतृप्ति-बिंदू येईपर्यंत केले व विद्राव थंड केला म्हणजे पोटॅशियम क्लोराइड वेगळे होते आणि टाकणखाराचा अतितृप्त विद्राव मिळतो. तो थंड केला म्हणजे प्रथम अंशतः शुद्ध टाकणखार मिळतो. तो स्फटिकीकरणाने शुद्ध करतात.
कार्बोनेशन पद्धतीत कार्बन डाय-ऑक्साइड वायूचा उपयोग करून सोडियम कार्बोनेटाचे सोडियम बायकार्बोनेटामध्ये रूपांतर करतात. हा कमी विद्राव्य असल्यामुळे बाहेर पडतो. राहिलेल्या विद्रावापासून नंतर टाकणखार नेहमीप्रमाणे बनवितात.
रासायनिक गुणधर्म : पाण्यात तसेच ग्लिसरिनामध्ये हा विद्राव्य असून जलविद्रावातून त्याचे एकनत-चित्याकृती [⟶ स्फटिकविज्ञान] स्फटिक मिळतात. त्याचा जलविद्राव सौम्य क्षारधर्मी (अम्लांशी विक्रिया झाल्यास लवणे देणारा) असतो. त्याचे pH मूल्य [⟶ पीएच मूल्य] सु. ९·२ असून संहती आणि तापमान यांच्या फरकाने ते फारसे बदलत नाही.
टाकणखाराला रासायनिक भाषेत सोडियम टेट्राबोरेट डेकाहायड्रेट असे म्हणतात. कोरड्या हवेत स्फटिकजल अंशतः निघून जाते आणि Na2B4O7·5H2O हे लवण बनते. उच्च तापमानास सर्व स्फटिकजल नाहीसे होऊन निर्जल टाकणखार बनतो. टाकणखार तापविल्यास प्रथम स्फटिकजलात विरघळतो व नंतर फुलतो. जास्त तापमानास त्याचा पारदर्शक द्रव बनतो. त्यामध्ये धातूंची ऑक्साइडे विरघळतात आणि धातुनुरूप वेगवेगळे रंग येतात. धातुविश्लेषणातील टाकणखार मणी (बोरॅक्स बीड) नामक कृतीत या गुणाचा उपयोग करण्यात येतो [⟶ रासायनिक विश्लेषण].
उपयोग : काच बनविण्याकरिता जो कच्चा माल वापरतात त्यात टाकणखाराचा समावेश केल्याने काचेचा प्रसरणांक कमी होतो. त्यामुळे अशी काच त्वरित थंड किंवा उष्ण केली, तरी फुटत नाही. पायरेक्स, हायसिल, बोरोसिल इ. काचप्रकार याची उदाहरणे आहेत. दुर्बिणी, कॅमेरे आणि चष्मे इ. प्रकाशीय उपयोगांकरिता लागणाऱ्या काचनिर्मितीतही टाकणखार लागतो.
चिनी मातीच्या भांड्यावर जे गुळगुळीत चकचकीत थर असतात त्याकरिता आणि लोखंडी पत्र्यावर असा लेप देऊन बनवितात त्या एनॅमलाच्या वस्तूंकरिता टाकणखार उपयोगी पडतो.
पितळी डाख लावण्याच्या आणि वितळजोड (वेल्डिंग) करण्याच्या कृतीत जोडावयाचे पृष्ठभाग स्वच्छ व्हावेत म्हणून वापरण्यात येणाऱ्या अभिवाह पदार्थात टाकणखार हा एक घटक असतो.
सोने शुद्ध करताना टाकणखार वापरतात. अशुद्धी निर्माण करणाऱ्या धातूंची ऑक्साइडे त्यात विरघळतात व एक द्रवरूप थर वेगळा होतो तो पृष्ठभागावर तरंगतो व सुलभतेने काढून टाकता येतो.
या मुख्य उपयोगांशिवाय साबण आणि आधुनिक निर्मलक द्रव्ये (डिटर्जंट्स), सौंदर्यप्रसाधने, केसीन व डेक्स्ट्रीन इत्यादींच्या खळी, गुळगुळीत कागद, अग्निरोधक लाकूड, कातडी कमावण्याच्या कृती, खते, औषधे वगैरेंमध्ये टाकणखार लागतो. बोरिक अम्ल, सोडियम टेट्राबोरेट, बोरॉन ट्रायफ्ल्युओराइड इ. बोरॉन संयुगनिर्मितीत टाकणखार लागतो.
भारतीय उत्पादन : भारतीय टाकणखार-खनिज साठे वाहतुकीची साधने नसलेल्या दुर्गम ठिकाणी आहेत. तेथील राजकीय परिस्थितीही अनुकूल नाही त्यामुळे याचा उत्पादन-व्यवसाय भारतात नाही. भारत आपली टाकणखाराची गरज आयातीने भागवितो. भारतात १९७४ साली ५७,६२,००० रु. किंमतीचा सु. ५,३४३ टन टाकणखार आयात करण्यात आला.
पहा : बोरॉन.
केळकर, गो. रा.
“