टॅसिटस, कॉर्नीलिअस : (इ. स. ५५ ? – १२०?). प्राचीन काळातील प्रसिद्ध रोमन इतिहासकार. त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. तथापि तो धाकट्या प्लिनीचा मित्र होता आणि त्याने ज्यूलियस अग्रिकोलाच्या मुलीबरोबर लग्न केले होते, अशी माहिती मिळते. ह्याच्याच ग्रंथातील काही उल्लेखांवरून जे थोडेसे तपशील हाती लागतात, त्यांवरून त्याने रोमच्या शासनात काही महत्त्वाच्या अधिकारपदांवर काम केले होते असे दिसते. रोमन साम्राज्यांतर्गत आशियाई विभागाचा तो प्रमुख प्रांताधिकारीही झाला होता. डायलॉगस हे त्याचे पहिले पुस्तक. यानंतर त्याने अग्रिकोला या आपल्या सासऱ्याचे चरित्र लिहिले. हिस्टरीज, ॲनल्झ आणि जर्मनिया हे त्याचे प्रसिद्ध ग्रंथ. ह्यांपैकी पहिल्या दोहोंत रोमन साम्राज्यसत्तेचा इतिहास असून तिसऱ्यात जर्मनी व जर्मन लोक यांची काहीशी ऐतिहासिक व बरीचशी सामाजिक आणि सांस्कृतिक स्वरूपाची माहिती आढळते. टॅसिटसच्या लेखनातील तपशील पुष्कळच विश्वासार्ह आहेत, असे आढळून आले आहे. रोमन सम्राटांच्या स्वैर कृतींवर त्याने जळजळीत टीका केल्या आहेत. त्याचे लेखन भेदक, चिकित्सक व अतिशय परिणामकारक असे असले, तरी पक्षपात व पूर्वग्रह यांपासून तो अलिप्त नाही. तथापि बरीचशी शास्त्रशुद्ध अशी पद्धती व आकर्षक शैली यांमुळे इतिहासलेखनपद्धतीच्या प्रांतातील त्याचे स्थान अढळ आहे. त्याचे समग्र लेखन इंग्रजीत अनुवादिले गेले आहे.
संदर्भ : Syme, Ronald, Tacitus, 2 Vols., Oxford , 1958.
आठवले, सदाशिव.