झोलिंगेन : प. जर्मनीच्या नॉर्थ ऱ्हाईन-वेस्टफेलिया प्रांतातील औद्योगिक शहर. लोकसंख्या १,७६,९०० (१९७१ अंदाज). हे व्हुपर नदीवर कोलोनच्या ईशान्येस ३२ किमी. आहे. १९२९ साली ओलिख्स, व्हाल्ट, ग्रेफ्राट आणि हशाइट ही गावे त्यात समाविष्ट करण्यात आली. मध्ययुगापासून उत्कृष्ट तलवारींसाठी हे प्रसिद्ध असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कटलरी केंद्र आहे. जगात कटलरीबाबत त्येअर (फ्रान्स) आणि शेफील्ड (इंग्लंड) च्या नंतर याचा क्रम लागतो. दुसऱ्या महायुद्धात याचे फार नुकसान झाले. शहराचा मध्यभाग रुंद रस्त्यांनी व उपवनांनी पुन्हा उभारला आहे. ग्रेफ्राट येथील वस्तुसंग्रहालयात कटलरीचा विकास कसकसा झाला त्याचे सुनिदर्शन केलेले आहे. येथे कटलरीबरोबरच हत्यारे, पोलादकाम, रासायनिक पदार्थ, विद्युत् उपकरणे, शस्त्रक्रिया उपकरणे, काच, अचूक यंत्रे, सायकली व त्यांचे भाग, मोटारींचे भाग, छत्र्यांचे सांगाडे, कापड, कृत्रिम धागे, साखर शुद्धीकरण, आसवन्या व ऊर्ध्वपातन भट्ट्या, लाकूडकाम, कातडीकाम इ. उद्योग आहेत. येथे बऱ्याच तांत्रिक शाळा आहेत.