झेव्हिअर, सेंट फ्रान्सिस : (७ एप्रिल १५०६―३ डिसेंबर १५५२). भारतात व जपानमध्ये ख्रिस्ती धर्मप्रसाराचे कार्य करणारा प्रख्यात स्पॅनिश जेझुइट मिशनरी. जन्म स्पेनमध्ये नव्हार येथे एका सरदार घराण्यात. पॅरिस विद्यापीठात तत्त्वज्ञान व धर्मशास्त्र ह्या विषयांचा अभ्यास करून १५३० मध्ये तो एम्. ए. झाला. पॅरिस विद्यापीठात असतानाच त्याचा इग्नेशिअस लॉयोला व प्येर फाव्ह्र यांच्याशी संबंध येऊन ह्या तिघांनी मिळून ‘सोसायटी ऑफ जीझस’ [→ जेझुइट] ही संस्था स्थापन केली. सेंट झेव्हिअरने १५४० पर्यंत या संस्थेचा चिटणीस म्हणून काम केले. नंतर पोर्तुगालचा राजा तिसरा जॉन याने त्याला पूर्वेकडील पोर्तुगीज वसाहतींत मिशनरी म्हणून पाठविले. प्रथम त्याने गोव्यात (१५४२–४५) आणि नंतर जपानमध्ये (१५४९–५१) ख्रिस्ती धर्मप्रसाराचे काम केले. भारतातील व जपानमधील हजारो लोकांना त्याने ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. नंतर चीनमध्ये मिशनरी कार्यासाठी जाण्याची त्याची उत्कट इच्छा होती. चीनमध्ये जाण्याच्या हेतूने ता चीनजवळील सॅन्सिअन (सध्याचे शांगा-च्वान) बेटावर आलाही परंतु त्याचे तेथेच आकस्मिकपणे निधन झाले. त्याचे शव तेथून सध्याच्या पणजीजवळील जुन्या गोवे शहरात आणण्यात आले आणि येथील बाँ जेझूस कॅथीड्रलमध्ये ते ठेवण्यात आले. तेथे त्याचे भव्य स्मारकही उभारण्यात आले. ठराविक कालांतराने त्याचे शव दर्शनासाठी खुले करण्यात येते. त्याच्या थडग्याबाबत अनेक चमत्कार व अद्भुत कथा लोकांत रूढ आहेत. ३ डिसेंबर रोजी त्याचा ‘फीस्ट डे’ तेथे मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.
आयनर, जे. डब्ल्यू. साळवी, प्रमिला
“