झेलेन्यस्की, टाडेऊश : (२१ डिसेंबर १८७४–४ जुलै १९४१.) पोलिश कवी आणि समीक्षक. ‘बॉय’ ह्या टोपणनावाने त्याने लेखन केले. त्याचा जन्म वॉर्सा येथे झाला. क्रेको आणि पॅरिस येथे त्याने वैद्यकाचा अभ्यास केला. तथापि १९०६ मध्ये वाङ्‌मयाकडे वळला. १९२२ मध्ये तो वॉर्सात स्थायिक झाला. फ्रेंच भाषेचा त्याने साक्षेपी अभ्यास केला होता आणि १९३९ मध्ये ल्वफ येथे फ्रेंच साहित्याचा प्राध्यापक म्हणून त्याची नियुक्ती झाली होती.

झेलेन्यस्कीने लिहिलेल्या उपरोधपर कविता Slowka (१९१३) ह्या नावने संगृहीत करण्यात आल्या आहेत. वाङ्‌मयीन आणि सामाजिक विषयांवर त्याने निर्भीड लेखन केले, तसेच एक समर्थ नाट्यसमीक्षक म्हणूनही लौकीक मिळविला. तथापि राब्लॅ, माँतेन, मोल्येर, बाल्झॅक, प्रूस्त ह्यांसारख्या श्रेष्ठ फ्रेंच साहित्यिकांच्या साहित्याकृतींचे दर्जेदार पोलिश अनुवाद करून पोलिश साहित्याची त्याने मोलाची सेवा केली. ल्वफ येथे जर्मनांनी त्याला ठार मारले.

कुलकर्णी, अ. र.