झुकॉव्हस्की, व्हस्यील्यई अंद्र्येयेव्ह्यिच : (२९ जनेवारी १७८३–७ एप्रिल १८५२). रशियन कवी. जन्म तूला प्रांतातील मिशेन्स्की ह्या गावी. मॉस्को विद्यापीठाच्या वसतिविद्यालयात त्याचे शिक्षण झाले. १८१२ मध्ये नेपोलियनविरुद्ध झालेल्या युद्धात त्याने भाग घेतला होता. पुढे १८२६ मध्ये झार पहिला निकोलस ह्याच्या पुत्राचा–दुसऱ्या अलेक्झांडरचा–शिक्षक म्हणून त्याची नेमणूक झाली. १८४१ पासून त्याचे वास्तव्य जर्मनीत होते.
झुकॉव्हस्कीच्या आरंभीच्या काव्यलेखनावर नव-अभिजाततावादाचा प्रभाव होता. त्याच काळात अठराव्या शतकातील विख्यात आंग्ल कवी टॉमस ग्रे ह्याच्या ‘ॲन एलिजी रिटन इन अ कंट्री चर्चयार्ड’ ह्या प्रसिद्ध विलापिकेचा ‘सेल्सकोए क्लादविश्चे’ (१८०२, इं. शी. व्हिलेज सेमिटरी) हा उत्कृष्ट अनुवाद त्याने केला होता. पुढे तो स्वच्छंदतावादाकडे वळला. रशियन स्वच्छंदतावादाच्या प्रणेत्यांपैकी तो एक होय.
झुकॉव्हस्कीच्या कवितांतून त्याच्या अंतस्थ भावजीवनाचे आणि उदास स्वप्नांचे दर्शन घडते. लोकसाहित्याची डूब असलेली सुंदर कथा-काव्ये त्याने लिहिली स्वच्छंदतावादी वळणाचे बॅलड रचिले. त्याच्या श्रेष्ठ कवितांत ‘तिओन एशकिन’ ह्या विलापिकेचा आणि ‘ल्यूदमीला’, ‘स्वेतलाना’ ह्यांसारख्या बॅलडरचनांचा अंतर्भाव होतो. उत्कट आत्मपरता, तंत्रप्रभुत्व आणि संपन्न शब्दकळा ही त्याच्या काव्यरचनेची आणखी काही लक्षणीय वैशिष्ट्ये. पुश्किन ह्या प्रतिभावंत स्वच्छंदतावादी कवीचा तो गुरू आणि पूर्वसूरी.
तो एक कुशल अनुवादकही होता. शिलर, गटे, स्कॉट, बायरन ह्यांसारख्या श्रेष्ठ साहित्यिकांच्या साहित्याकृतींचे दर्जेदार रशियन अनुवाद करून जर्मन व इंग्रजी साहित्यातील स्वच्छंदतावादी प्रवाहांचा त्याने रशियनांना परिचय करून दिला.
होमरचे ओडिसी हे महाकाव्य, तसेच संस्कृतातील नलदमयंतीची कथा त्याने रशियन भाषेत आणली. बाडेन-बाडेन येथे तो निधन पावला.
पांडे, म. प. (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..