झेन पंथ : जपानमधील एक धर्मपंथ. बौद्धांच्या महायान पंथातील चीन-जपानमध्ये विकसित झालेला हा एक पंथ आहे. संस्कृत ‘ध्यान’व पाली ‘ज्झान’या शब्दाचे चिनी भाषेत लिप्यंतर करताना जी लिपिचिन्हेवापरली जातात, त्यांच्या जपानी ‘झेन्ना’या उच्चाराचे ‘झेन’ हे संक्षिप्त रूप आहे. समाधी, मनन किंवा चिंतन हा त्याचा मूलभूत अर्थ असून विश्व व मानवी जीवन यांचे सत्यस्वरूप जाणण्यासाठी विचार केंद्रित करण्याचे ते अनुष्ठान होय.
ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणून प्राचीन काळापासून ध्यानसमाधीची कल्पना भारतात अस्तित्वात होती. नंतर ती ब्राह्मणी व जैन तत्त्वज्ञानाने स्वीकारली असली, तरी तिला शास्त्रशुद्ध पायावर उभी करण्याचे कार्य मात्र शाक्यमुनीने म्हणजे गौतम बुद्धाने संस्थापिलेल्या बौद्ध विचारसरणीने केले. परिमित व सापेक्ष मानवप्राणीही अपरिमित व केवल पद प्राप्त करू शकतो आणि त्यासाठी अशा प्रकारचे धार्मिक ध्यान हा आदर्श मार्ग होय, या सत्याचे दर्शन शाक्यमुनीला त्याच्या बोधिवृक्षाखालील समाधिसाधनेतील स्वानुभवाने झाले. कालौघात शाक्यमुनीने शोधून काढलेल्या उचित अशा झेन अभिवृत्तीचा उपयोग व्यक्तीच्या सर्वसाधारण, दैनंदिन जीवनात केला जावा यासाठी प्रयत्नशील बनलेली एक चळवळ जन्मास आली. त्याच वेळी हेही मान्य करण्यात आले, की नुसत्या ध्यानसाधनेने आध्यात्मिक जागृती न होऊ शकणारे काही जण आहेत आणि म्हणून सर्व प्राणिमात्रांना तारक ठरावे, यासाठी शाक्यमुनीने सुधारित व सापेक्ष अशा स्वरूपात सत्य शिकविले. ही शिकवण बौद्ध सिद्धांतावरील सूत्रे, उपदेश आणि प्रबंध यांमध्ये ग्रंथित झालेली आहे.
चीनमधील विकास : चिनी आख्यायिकेप्रमाणे बोधिधर्माने सहाव्या शतकात ध्यान पंथाला सुरुवात केली. बोधिधर्माने ९ वर्षे एका भिंतीकडे तोंड करून तपश्चर्या केली व त्यात त्याचे पाय सुकून झिजून गेले. याची खूण म्हणून जपानमध्ये बिनपायाच्या ‘दारूमा’ (धर्म) बाहुल्या अजूनही दिसतात. ऐतिहासिक पुराव्यानुसार झेन वा ध्यान पंथ चीनमध्ये थांग् राजवटीच्या सुरुवातीला आला आणि त्यावर चिनी ताओ (दाव्) पंथाचा इतका विलक्षण प्रभाव पडला, की त्यात बौद्ध धर्माचा काही अंशच शिल्लक राहिला. लंकावतारसूत्रात वर्णन केलेला झेनचा प्रकार चीनमध्ये आदर्श मानला गेला. चालणे, उभे राहणे, बसणे आणि पहुडणे अशा चार मुख्य प्रकारच्या व्यवहारांत विभागलेल्या, आपल्या दैनंदिन जीवनातील क्रिया ह्या झेनची रूपे असतात किंवा असावयास हव्यात, ही या प्रकारच्या झेनमागची मुख्य कल्पना होय. बोधिधर्माच्या कल्पना पायाभूत मानून त्याच्या अनुयायांनी अशा प्रकारच्या ध्यानसाधनेवर सर्वाधिक भर देणाऱ्यांचा एक गट स्थापन केला. एक धर्मपंथ म्हणून झेनची अशा प्रकारे सुरुवात झाली. बोधिधर्मापासून सुरुवात करता, या पंथाचा ‘सहावा कुलपिता’ म्हणून संबोधिता येईल अशा ह्वै-नींग्च्या काळापर्यंत सदर पंथाची मुळे चिनी समाजात खोलवर रुजली होती. एक मनातून दुसऱ्या मनात प्रज्ञेच्या होणाऱ्या प्रत्यक्ष संचारावरील भर, लिखित शिकवणुकीचा त्याग, धर्मग्रंथांमध्ये उपदेशिलेल्या सत्यापेक्षा निराळे असे गूढ सत्य असल्याबद्दलचा आग्रह व स्वतःच्या खऱ्या स्वरूपाच्या जाणिवेतून निर्वाणप्राप्ती होते, या गोष्टींवरील विश्वास ह्या त्याच्या सिद्धांताच्या मुख्य रूपरेखाही स्पष्ट झाल्या होत्या.
आज झेनचे जे स्वरूप आपण पाहतो ते वर उल्लेखिलेल्या पद्धतीने घडलेला त्याचा विकास आणि चीनमधील परंपरागत बौद्ध धर्माशी त्याचा आलेला वाढता संपर्क यांमुळे सुंग घराण्याच्या काळापर्यंत निश्चित झाले होते. पवित्र बौद्ध स्थानांची चीनमध्ये झालेली उभारणी आणि प्रत्येक मंदिरात एका मुख्य मूर्तीची पूजा तसेच चिनी बौद्ध धर्मपंथांतील इतर कित्येक तत्त्वांचा समावेश क्रमाक्रमाने त्यात करण्यात आला होता. याशिवाय, झेन ‘गुंग्-आन्’ वा ‘को-आन्’ नावाचे एक अतर्क्य (तर्क-असंबद्ध) कोडे ध्यानसाधनेचे साहित्य आणि ज्ञानप्राप्तीचे साधन म्हणून निर्माण करण्यात आले आणि या पंथांच्या पद्धतीतील ते एक वैशिष्ट्य बनले. ध्यानसाधनेसाठीच विषय आणि साधकाच्या झेनबद्दलच्या ज्ञानाच्या कसोट्या म्हणून दिलेले को-आन्, ह्या भूतकाळातील झेन गुरूंच्या अनुभूतीच्या पद्धतिबद्ध रचना होत. कालांतराने, सदर को-आन् झेन पद्धतीच्या आध्यात्मिक अनुष्ठानाचा केंद्रबिंदू बनले. शंभर को-आन्चा संग्रह असलेला बि-एन्-लु वा हेकिगान्-रोकु हा या विषयावरील सर्वांत अधिक प्रातिनिधिक ग्रंथ मानला जातो. सुंग घराण्याच्या शेवटच्या कालखंडातील चिनी विद्वान युआन्-वू ख-च्यीन म्हणजे जपानी एंगो-कोकुगोन् (१०६३–११३५) याने सुंग-बाय्-ज या ग्रंथावर केलेले हे भाष्य आहे. हा झेन पंथाचा परिचयात्मक असा सर्वोत्तम ग्रंथ मानला जाऊ लागला व आज पावेतो त्याने ‘झेन पंथातील धार्मिक अनुष्ठानाचा मार्गदर्शक तारा’ म्हणून आपले स्थान टिकविले आहे. एंगो-कोकुगोन्च्या शिष्यपरंपरेत अनेक समर्थ अनुयायी तयार झाले आणि त्यामुळे लीन्-च्यी वा रिंझाई पंथाचा प्रसार चीनभर होऊन सुंगकाळात चिनी झेन पंथाचे सुवर्णयुग अवतरले.
जपानमधील विकास : एइझाई (११४१–१२१५) या भिक्षूने रिंझाई परंपरेतील झेन पंथ बाराव्या शतकात जपानमध्ये आणला. तेथे राजकुळ व सामुराई गोत्रे यांच्या संरक्षणाने त्याचा एवढा प्रसार झाला, की पुढे हा पंथ जपानी बौद्ध विचारसरणीची मुख्य धारा बनला. पंधराव्या शतकात या पंथाची तीनशे सरकारी (अधिकृत) व हजारो इतर मंदिरे जपानवर पसरलेली होती आणि सामुराइ समाजाच्या जीवनावर व संस्कृतीवर त्याचा खूपच प्रभाव पडला होता.
पुढे या पंथास उतरती कळा लागली परंतु सतराव्या शतकात, हाकुइन (१६८५–१७६८) याने अत्यंत सोपा, सुबोध व लोकप्रिय असा झेनचा प्रकार विनोदाची कलाबूत लावून उपदेशिल्यामुळे सर्वसाधारण लोकांना आचरण्यास व स्वीकारण्यास तो सोपा वाटला आणि त्यामुळे रिंझाई पंथीय झेनचे पुनरुज्जीवन होऊन त्याला समाजाच्या अगदी खालच्या थरातही अनुयायी लाभले. आज त्याचे चौदा उपपंथ असून ५ ते ६ हजार मंदिरे आहेत.
सद्यस्थिती व भवितव्य : जपानबाहेर आज ज्ञात असलेला झेन म्हणजे मुख्यतः हाकुइनचा पंथ होय परंतु ह्याशिवाय जपानी झेनचा ‘सोतो’ नावाचा आणखी एक पंथ असून तो रिंझाई पंथाहून बराच बलवत्तर आहे.
दोगेन (१२००–५३) या भिक्षूने सोतो झेन पंथ जपानमध्ये आणला. चीनमध्ये जाऊन त्याने झेनचा अभ्यास केला होता. शाक्यमुनीच्या काळापासून पिढ्यान्पिढ्या चालत आलेला खरा झेन पंथ आपणच पुरस्कृत केला अशी दोगेनची श्रद्धा होती. त्याने को-आन्चा त्याग केला असे नव्हे पण नुसत्या झेन-प्रश्नोत्तर उपकरणाच्या उपयोगाने मानवाला अत्युच्च अवस्था प्राप्त घेता येणार नाही, अशी त्याची भावना होती. झा-झेन अनुष्ठानाच्या श्रेष्ठत्वावर भर देऊन, ‘कार्यसाधक’ पण वस्तुतः असंबद्ध अशा लोकप्रिय पूजासंस्काराला त्याने फाटा दिला. या सर्व गोष्टींमागे, धर्माच्या शुद्धतेवर भर देणे आणि शाक्यमुनीच्या मूळ झेनचा म्हणजे ध्यानमार्गाचा पुनश्च मागोवा घेणे, हा त्याचा हेतू होता. भिक्षू वा उपासक स्त्री किंवा पुरुष या सर्वांना आध्यामिक ज्ञान प्राप्त करून घेण्याचा झा-झेन हा अतिसुलभ मार्ग होय, अशी शिकवण त्याने दिली. यायोगे त्याने इतर कोणाहीपेक्षा सर्वसाधारण बहुजनाच्या उद्धाराचा मार्गच उपदेशिला. ह्या धर्मप्रकाराचे सर्वोत्तम प्रकटीकरण दोगेन शोबो गेन्झोमध्ये आढळते. तत्त्वज्ञानात्मक खोली, मानवतेबद्दलचा आदर, कष्टमय धार्मिक अनुष्ठाने आणि निश्चित व उत्तुंग दृष्टिकोन या गुणांनी सालंकृत असा हा धर्मप्रकार, पूर्व आणि पश्चिम यांमधील विचार-आचारांच्या देवाणघेवाणीत भविष्काळात निःसंशयपणे महत्त्वपूर्ण अशी कामगिरी बजावील.
जपानी दृष्टिकोन, संस्कृती आणि जीवनमार्ग यांमध्ये झेनचा प्रभाव आज खोलवर रुजलेला आढळतो. उदा., वास्तुकला, उद्यानरचना, चहापान विधी, पुष्परचना, जपानी कुंपण व्यवस्था व जूदो या क्षेत्रांत त्याचे प्रत्यंतर मिळते. मानसशास्त्र, वैद्यक, संगीत, चित्रकला, तत्त्वज्ञान आणि क्रीडा या विषयांच्या क्षेत्रांतील पौर्वात्य विचाराचे वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण म्हणून अलीकडच्या काळात झेनचा मोठ्या गांभीर्यने अभ्यास केला जात आहे.
संदर्भ : 1. Dumoulin, Heinrich Trans. Peachey, Paul, A. History of Zen Buddhism, London, 1963.
2. Humphreys, Christmas, Zen, a Way of Life, London, 1962.
3. Suzuki, D. T. Essays in Zen Buddhism, 3 Vols., London, 1927–34.
4. Suzuki, D. T. Studies in the Lankavatara Sutra, London, 1930.
5. Watts, A. W. The Way of Zen, New York, 1957.
इमाएदा, आइशिन (इं.) रूपवते, दा. ता. (म.)
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..