झॉर्दां, (मारी एनमां) कामीय : (५ जानेवारी १८३८–—२० जानेवारी १९२२). फ्रेंच गणितज्ञ. उच्च बीजगणितात त्यांनी विशेष महत्त्वाचे कार्य केले. जन्मस्थान लेआँ. त्यांचे शिक्षण एकोल पॉलिटेक्निकमध्ये झाले. १८८५ पर्यंत त्यांनी अभियंता म्हणून काम केले. या काळात त्यांनी जवळजवळ गणितातील विविध विषयांवरील १२० निबंध प्रसिद्ध केले. १८७८ पासून १९१२ पर्यंत त्यांनी एकोल पॉलिटेक्निक आणि कॉलेज द फ्रान्स या ठिकाणी अध्यापनाचे काम केले. १८८१ मध्ये त्यांना ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सभासद म्हणून निवडण्यात आले.

झॉर्दां यांनी गणितीय विश्लेषणांमध्ये काटेकोर सिद्धतेवर विशेष भर दिला. प्रतलीय किंवा बहुमितीय अवकाशातील संचाच्या बाहेरील मापाची संकल्पना त्यांनी मांडली. बंधित चलनाच्या फलनाची [⟶ फलन] संकल्पनाही त्यांचीच होती आणि ही संकल्पना त्यांनी त्यांच्याच नावाने ओळखण्यात येणाऱ्या वक्राकरिता उपयोगात आणली. ⇨ संस्थितिविज्ञानातील बंद वक्राने प्रतलाचे दोन भाग पडतात या प्रमेयाची गणितीय सिद्धता त्यांनीच प्रथम दिली. गट सिद्धांतात झॉर्दां यांनी बरेच संशोधन केले. त्यामधील रचना श्रेढीविषयीचे प्रमेय झॉर्दांहोल्डर या नावाने प्रसिद्ध आहे. १८७० साली झॉर्दां यांनी गट सिद्धांतातील आपले दहा वर्षातील संशोधन संकलित करून Traite des substitutions et des equations algebriques हा ग्रंथ प्रसिद्ध केला व तो गट सिद्धांतातील इतर संशोधकांना अतिशय मार्गदर्शक ठरला. या ग्रंथाबद्दल त्यांना पाँस्ले पारितोषिक मिळाले. बीजगणितातील झॉर्दां यांची अतिशय गाजलेली कामगिरी म्हणजे त्यांची  ‘सांतता प्रमेये’ ही होय.

झॉर्दां यांचे निबंध चार खंडांमध्ये Oeuvres de Camille Jordan  या नावाने आर्. गार्न्ये व जे. ड्यडोने यांनी १९६१–६४ मध्ये प्रसिद्ध केले. Traite des Substitutions et des equations algebriques (पॅरिस, १८७०, पुनर्मुद्रित १९५७) आणि Cours d’ Analyse de l’ Ecole Polytechnique ३ खंड (तिसरी आवृत्ती, १९०९–१५) हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांनी Journal de Mathamatiques या नियतकालिकाचे १८८५ पासून मृत्यूपावेतो संपादन केले. ते मिलान येथे निधन पावले.

वाड, श. स.