ॲलांबेर, झां ल राँ द: (? नोव्हेंबर १७१७—२९ ऑक्टोबर १७८३). फ्रेंच गणितज्ञ व तत्त्ववेत्ता. यामिकी (प्रेरणांची वस्तूंवर होणारी क्रिया व त्यामुळे निर्माण होणारी गती यांचा अभ्यास करणारे शास्त्र) या विषयातील तसेच दीद्रो यांच्या एनसायक्लोपीडियामध्ये (सर्व विषयांतील ज्ञानासंबंधी अकारविल्हे माहिती देणाऱ्या साररूप ग्रंथामध्ये) केलेल्या कार्याकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म पॅरिस येथे झाला व तेथेच त्यांचे शिक्षण झाले.

प्रथमत: त्यांनी कायद्याचा अभ्यास केला व १७३८ मध्ये वकिलीची सनदही घेतली. तथापि त्यांनी प्रत्यक्ष वकिलीचा व्यवसाय केला नाही. त्यानंतर त्यांनी वैद्यकाच्या अभ्यासास सुरुवात केली तथापि वर्षभरातच तो सोडून त्यांनी गणिताच्या अभ्यासासच वाहून घेण्याचे ठरविले. १७४१ मध्ये त्यांची फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसवर निवड झाली. त्यापूर्वी त्यांनी ॲकॅडेमीला समाकलन गणित [→ अवकलन व समाकलन] (१७३९) व इतर गणितीय विषयांवरील निबंध सादर केले. गतिकीसंबंधी (पदार्थांच्या गतीसंबंधीच्या शास्त्रासंबंधी) १७४२ मध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात ‘ॲलांबेर तत्त्व’ या नावाने सध्या सुपरिचित असलेले तत्त्व मांडले व १७४४ मध्ये समतोल आणि द्रायूंची (द्रायू म्हणजे वायू आणि द्रव यांना मिळून देण्यात येणारी संज्ञा) गती यांसंबंधीचे प्रश्न सोडविण्यासाठी या तत्त्वाचा उपयोग केला. १७४७ मध्ये त्यांनी आंशिक अंतर कलनशास्त्राचा [→ सांत अंतर कलन] शोध लावला व तारांची कंपने आणि हवेतील आंदोलने यांच्या अभ्यासासाठी त्याचा उपयोग केला. एखादा घन पदार्थ एका द्रायूतून जास्त घनतेच्या दुसर्‍या द्रायूत तिर्यक दिशेने प्रवेश करीत असताना आढळून येणाऱ्या आविष्कारासंबंधी त्यांनी लिहिलेला प्रबंध मूलभूत स्वरूपाचा आहे. १७४६ व १७४८ मध्ये बर्लिन ॲकॅडेमीने त्यांचे समाकलनासंबंधी संशोधनकार्य प्रसिद्ध केले.

खगोलीय भौतिकीमध्येही त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. १७५४ मध्ये त्यांनी ⇨संपातचलनाचा प्रश्न सोडवून त्याची महत्ता मोजली, तसेच पृथ्वीच्या ⇨अक्षांदोलनासंबंधी स्पष्टीकरण मांडले. १७५४–५६ मध्ये त्यांनी ग्रहांच्या गतीतील विक्षोभासंबंधीचे विवरण पूर्णत्वास नेले.

दीद्रो यांच्या एनसायक्लोपीडियात ॲलांबेर यांनी विविध विज्ञानांतील प्रगती व त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध याविषयीची माहिती लिहिली (१७५१). या एनसायक्लोपीडियातील पहिल्या दोन खंडांत त्यांनी काही साहित्यविषयक लेखही लिहिले तथापि नंतरच्या खंडांत मात्र मुख्यत्वे गणितविषयक लेख लिहिले (१७५७ अखेर). विविध विज्ञानांची तत्त्वे व त्यांच्या पद्धती यांसंबंधी एक तत्त्वमीमांसात्मक ग्रंथ त्यांनी १७५९ मध्ये लिहिला व त्यात अनुभववादाचा (सर्व ज्ञान अनुभवातूनच निर्माण होते या सिद्धांताचा) पुरस्कार केला. संगीताच्या सैद्धांतिक व कलाविषयक अशा दोन्ही अंगांसंबंधी १७७९ मध्ये त्यांनी एक ग्रंथ प्रसिद्ध केला. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

भदे. व. ग.