हरीश-चंद्र : (११ ऑक्टोबर १९२३–१६ ऑक्टोबर १९८३). भारतीय गणितज्ञ. संपूर्ण नाव हरीश-चंद्र चंद्रकिशोर मेहरोत्रा.

हरीश-चंद्र

गणित-शास्त्राच्या वाटचालीत ⇨ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन यांच्यानंतर हरीश-चंद्र यांचेच नाव घेतले जाते. हरीश-चंद्र यांनी प्रथम भौतिकीत आपला भक्कम ठसा उमटविला आणि नंतर ते चांगले गणितज्ञ म्हणूनही प्रसिद्ध झाले.

हरीश-चंद्र यांचा जन्म कानपूर येथे झाला. त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था घरी शिक्षक नेमून करण्यात आली होती. तसेच संगीतशिक्षक व नृत्यशिक्षकही  त्यांना शिकवायला घरी येत. कानपूर येथील ख्राइस्ट चर्च हायस्कूलमध्ये चौदाव्या वर्षी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. कानपूर येथेच वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी इंटरमीजीएटचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात प्रवेश घेतला. केंब्रिज (इंग्लंड) येथील सुविख्यात भौतिकीविज्ञ ⇨ पॉल एड्रिएन मॉरिस डिरॅक यांचा विद्यापीठाच्या ग्रंथालयात असलेला प्रिन्सिपल्स ऑफ क्वाँटम मेकॅनिक्स हा ग्रंथ हरीश-चंद्र यांनी वाचला आणि सैद्धांतिक भौतिकीचा अभ्यास करण्याची स्फूर्ती त्यांना मिळाली. त्यांनी १९४१ मध्ये बी.एस्सी. व १९४३ मध्ये एम्.एस्सी या पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर १९४३–४५ या कालावधीत त्यांनी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे पदव्युत्तर संशोधन सदस्य म्हणून ⇨ होमी जहांगीरभाभा यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. या काळात भाभा व हरीश-चंद्र यांनी संयुक्तपणे डिरॅक यांच्या काही संशोधन काऱ्याचा विस्तार करून शोधनिबंध प्रसिद्ध केले. त्यावेळी हरीश-चंद्र यांचे स्वतःचे शोधनिबंधही प्रसिद्ध होत होतेच. अलाहाबाद विद्यापीठातील प्राध्यापक ⇨ सर कार्यमाणिक्कम श्रीनिवास कृष्णन आणि भाभा यांनी हरीश-चंद्रांचीशिफारस डिरॅक यांच्याकडे केल्याने ते केंब्रिजला गेले (१९४५–४७). ‘इनफिनाइट इर्रिड्यूसिबल रिप्रेझेंटेशन ऑफ द लॉरेन्ट्स ग्रूप’ या शीर्षकाचा प्रबंध लिहून त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची पीएच्.डी पदवी संपादन केली (१९४७).

केंब्रिजमध्ये असतानाच हरीश-चंद्र यांना भौतिकीपेक्षा गणितशास्त्राचे अधिक आकर्षण वाटू लागले. केंब्रिजमध्ये त्यांनी लिट्लवुड व हॉल यांची गणित विषयावरील व्याख्याने ऐकली. त्याच वेळी त्यांनी मव्होल्फगांग पाउली यांचे व्याख्यान ऐकले व पाउली यांच्या संशोधन कामातील चूक दाखवून दिली आणि त्यातून त्या दोघांची गाढ मैत्री झाली.

हरीश-चंद्र १९४७-४८ या वर्षासाठी डिरॅक यांचे सहायक म्हणून प्रिन्स्टन (अ. सं. सं.) येथे गेले. हरीश-चंद्र यांच्यावर तेथे कार्यरत असणारे व्हिल एमिल आर्टिन (१८९८–१९६२) व शेव्हाली यांचा खूप प्रभाव पडला आणि नंतर गणित विषयाला वाहून घ्यायचे त्यांनी ठरविले.

डिरॅक प्रिन्स्टनहून केंब्रिजला परत आले, तरी हरीश-चंद्र आणखी एक वर्ष प्रिन्स्टनलाच राहिले. अशा तर्‍हेने ते इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडी (प्रिन्स्टन) चे सदस्य म्हणून दोन वर्षे कार्यरत राहिले (१९४७–४९). त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठात जूअट फेलो म्हणून काम केले (१९४९-५०). तेथे ऑस्कर झारिस्की यांच्या कामातून त्यांना प्रेरणा मिळाली. हरिश-चंद्र यांनी कोलंबिया विद्यापीठ (न्यूयॉर्क शहर) येथे व्याख्याते (१९५०-५१), सहप्राध्यापक (१९५१–५३), साहाय्यक प्राध्यापक (१९५३–५९) व प्राध्यापक (१९५९–६३) म्हणून काम केले. याच काळात त्यांनी १९५५-५६ यावर्षी पॅरिसमध्ये इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडी या संस्थेचे सदस्य १९५७-५८ यावर्षी गुगेनहाइम फेलो आणि पुन्हा स्लोन फेलो (१९६१–६३) अशा विविध पदांवर काम केले. १९६३ मध्ये हरीश-चंद्र प्रिन्स्टन येथील इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडी या संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे १९६८ मध्ये त्यांची आय बी एम-फॉर नॉयमान या प्राध्यापकपदी नेमणूक झाली.

हरीश-चंद्र यांचे शोधनिबंध मुख्यतः ॲनल्स ऑफ मॅथेमॅटिक्स, अमेरिकन जर्नल ऑफ मॅथेमॅटिक्स, ट्रँझॅक्शन्स ऑफ द अमेरिकनमॅथेमॅटिकल सोसायटीॲक्ट मॅथेमॅटिका या नियतकालिकांतून प्रसिद्धझाले आहेत. तसेच त्यांना प्रतिष्ठेचे अनेक बहुमान प्राप्त झाले. त्यांत अमेरिकेची रॉयल सोसायटी (१९७३), इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस व इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी (१९७५) आणि नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९८१) यांच्या फेलोशिप इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीचे रामानुजन पदक ली-ग्रूप वरील संशोधनाबद्दल मिळालेले अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीचे कोल पारितोषिक (१९५४), दिल्ली (१९७३) व येल (१९८१) विद्यापीठांच्या मानद पदव्या इत्यादींचा समावेश आहे.

हरीश-चंद्र हे थिअरी ऑफ ग्रूप रिप्रेझेंटेशन या विषयातील अधिकारी तज्ञ समजले जातात. ली-ग्रूप थिअरी, ऑटोमॉर्फिक फंक्शन्स व अप्रत्यक्ष-पणे संख्या सिद्धांत या विषयांवर त्यांच्या संशोधनाचा चांगलाच प्रभाव असल्याचे दिसून येते.

हरिश-चंद्र यांचे हृदयविकाराच्या झटक्याने प्रिन्स्टन येथे निधन झाले.

टिकेकर, व. ग.