झारीया : नायजेरियाच्या नॉर्थ सेंट्रल राज्याच्या झारीया प्रांताची राजधानी. लोकसंख्या २,०५,९८१ (१९७२). येथे लोहमार्ग, सडका व विमानतळ असून कापूस, भुईमूग, तंबाखू, सुंठ इ. शेतमाल कापड-चोपड, कातडी, शेळ्यामेंढ्या, गुरेढोरे यांची विक्री प्रक्रिया व निर्यात होते. कापूस पिंजणे, कापड विणणे, रंगविणे, छपाई, कातडी कमावणे, तसेच रेल्वे दुरुस्ती, सिगारेटी व सौंदर्य प्रसाधन निर्मिती, सायकलीचे भाग जुळविणे, प्रकाशन इ. व्यवसाय चालतात. येथे विद्यापीठ आणि विविध शैक्षणिक व आरोग्यविषयक सोयी असून येथील ‘गास्किया’ संस्था भाषा, साहित्य, नाट्य इत्यादींचे कार्य करते. हे सांस्कृतिक केंद्र असून राजकीय दृष्ट्याही जागृत आहे.

लिमये, दि. ह.