झापरॉझे : रशियाच्या युक्रेनियन प्रजासत्ताकाच्या झापरॉझे विभागाची राजधानी. लोकसंख्या ७,२९,००० (१९७४ अंदाज). हे नेप्रोपट्रॉफ्‌स्कच्या दक्षिणेस ७२ किमी. नीपर नदीवर असून नीपर जलविद्युत् केंद्र झाल्यापासून येथे मोठा धातुकर्म उद्योग उदयास आला. लोखंड व पोलाद, लोहमिश्रधातू , टिटॅनियम आणि ॲल्युमिनियम शुद्धीकरण, रसायन उद्योग, अभियांत्रिकी व इतर अनेक उद्योग येथे आहेत. येथे शिक्षक प्रशिक्षण, औषधनिर्मिती, यंत्रनिर्मिती व इतर शिक्षणसंस्था असून हे वाहतुकीच्या मार्गांचे केंद्र आहे.

लिमये, दि. ह.