झाकॉब, फ्रांस्वा : (२० जून १९२०– ). फ्रेंच जीववैज्ञानिक. १९६५ चे वैद्यक व शरीरक्रियाविज्ञानाचे नोबेल पारितोषिक झाकॉब, झाक मॉनो व आंद्रे ल्वॉफ या तीन फ्रेंच जीववैज्ञानिकांना ⇨आनुवंशिकी  व  सूक्ष्मजीवविज्ञानातील संशोधनाबद्दल विभागून मिळाले.

झाकॉब यांचा जन्म नॅन्सी ( फ्रान्स ) येथे झाला. दुसऱ्या महायुद्धात सैन्यात सैन्यात नोकरी केल्यानंतर त्यांनी पॅरिस विद्यापीठातून १९४७ साली एम्.डी. आणि सॉरबोन विद्यापीठातून १९५४ साली डी.एस्‌सी. या पदव्या मिळविल्या. १९५० साली पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये सूक्ष्मजैव शरीरक्रियाविज्ञान विभागात त्यांची नेमणूक झाली. पुढे १९५६ साली ते तेथील प्रयोगशाळेचे प्रमुख व १९६० साली सूक्ष्मजैव आनुवंशिकी विभागाचे प्रमुख झाले. १९६४ पासून कॉलेज द फ्रान्समध्ये कोशिकीय (पेशींविषयक) आनुवंशिकीचे प्राध्यापक म्हणून ते काम करीत आहेत.

रिबोसोममधील [⟶ कोशिका] विशिष्ट प्रथिनाच्या संश्लेषणामध्ये (शरीरात तयार होण्याच्या क्रियेमध्ये) जे आरएनए [ रिबोन्यूक्लिइक अम्ल, ⟶ न्यूक्लिइक अम्ले] संदेशवाहकाचे काम करते त्याला ‘संदेशवाहक आरएनए’ अशी संज्ञा झाकॉब, मॉनो आणि आर्थर पार्डी यांनी दिली. संदेशवाहक आरएनएच्या संकल्पनेमुळे जननिक संकेताचे स्पष्टीकरण होण्यास मोठी मदत झाली. दोन जवळजवळ असणाऱ्या जनुकांच्या (एका पिढीतील आनुवंशिक लक्षणे पुढील पिढीत नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांतील म्हणजे गुणसूत्रातील आनुवंशिक लक्षणे निर्देशित करणाऱ्या एककांच्या, जीनांच्या) समुच्चयास त्यांनी ‘ओपेरॉन’ व त्यांचे नियंत्रण करणाऱ्या जनुकांना ‘ऑपरेटर’ या संज्ञा दिल्या. ओपेरॉन आणि ऑपरेटर जनुके यांमुळे सूक्ष्मजंतूंमधील एंझाइमांचे (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या प्रथिनयुक्त पदार्थांचे) संश्लेषण व लायसीन नावाचे ⇨प्रतिपिंड  निर्माण करणाऱ्या सूक्ष्मजंतूंतील परजीवी (दुसऱ्या जीवावर जगणाऱ्या) व्हायरसाच्या सुप्तावस्थेचे प्रवर्तन यांचे नियंत्रण कसे होते, याचे स्पष्टीकण मिळाले.

झाकॉब यांनी ई. एल्. वोलमान यांच्यासमवेत व्हायरसातील जनुकांचे दोन मुख्य गट शोधून काढले. त्यांतील एक गट जननिक सामग्रीच्या स्वयंप्रेरित पुनरुत्पादनाशी संबंधित आहे, तर दुसरा व्हायरसाच्या आवेष्टनातील आणि रोगकारक यंत्रणेतील प्रथिन रेणूंच्या निर्मितीशी संबंधित आहे. या दोघांनी सूक्ष्मजंतूंमधील व्हायरसजन्य नसलेल्या विशिष्ट जननिक मूलघटकांचा शोध लावला व त्यांस ‘ एपिसोम’ ही संज्ञा दिली. झाकॉब व वोलमान यांनी सूक्ष्मजंतूंच्या लैंगिक संयुग्मनासंबंधीही (प्रजोत्पादनासाठी एकत्र येण्याच्या क्रियेसंबंधीही) महत्त्वाचे संशोधन केले आहे.

शरीरक्रियाविज्ञानातील या त्यांच्या संशोधनाचा उपयोग अनुकूलन, प्रजोत्पादन व क्रमविकास (उत्क्रांती) या आविष्कारांच्या अभ्यासात होत आहे. जनुक व एंझाइम यांवरील त्यांच्या संशोधनामुळे वैद्यकविज्ञानात एक नवीनच अभ्यासाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. झाकॉब यांनी शोधलेल्या एपिसोम या सूक्ष्मजंतूंमधील मूलघटकांचा उपयोग कर्करोगाच्या संशोधनात होत आहे.

इ. स. १९६२ साली त्यांना पॅरिसमधील ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे चार्ल्‌स लिओपोल्ड मेयर पारितोषिक मिळाले. ते रॉयल डॅनिश ॲकॅडेमी ऑफ लेटर्स अँड सायन्सेस (१९६२), अमेरिकन सोसायटी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेस (१९६४), रॉयल सोसायटी (१९७३) वगैरे संस्थांचे सभासद आहेत. १९७१ साली त्यांचे La Logique du Vivant  हे पुस्तक प्रकाशित झाले.

जमदाडे, य. कों.