झाऊ : (झाव, काडशेरणी सं. झावुक इं. टॅमॅरिस्क लॅ. टॅमॅरिक्स एरिकॉइडस कुल-टॅमॅरिकेसी). कोकण, दख्खन, गुजरात, कारवार या प्रदेशांतील नद्यांच्या पात्रांत हे लहान क्षुप (झुडूप) सामान्यपणे आढळते. याची साल काळसर व चिरा पडलेली असून याची गुलाबी व लहान फुले सुंदर दिसतात. त्यांत दहा केसरदले असून त्यांच्या बियांवरच्या केसाळ झुबक्यांचा दांडा लांब असतो. [⟶ फूल]. इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨टॅमॅरिकेसी कुलात वर्णिल्याप्रमाणे. झाऊच्या टॅमॅरिक्स वंशातील कित्येक जाती बागेत शोभेकरिता लावतात. नवीन लागवड बी व कलमे लावून करतात.
टॅमॅरिक्स वंशातील आणखी काही जातींना (टॅ.गॅलिका, टॅ.ट्रूपी, टॅ. डायोइका ) झाऊ हेच नाव लावतात. तसेच ‘लाल झाऊ’ हे नाव दोन जातींना (टॅ. आर्टिक्युलेटा टॅ. डायोइका ) दिलेले आढळते. यांपैकी काही जाती सिंधमध्ये व काही उ.भारतात सापडतात यांच्या फुलांत पाच केसरदले असतात. कीटकदंशामुळे फुलांत किंवा फांद्यांवर बनणाऱ्या गाठींत (छोटी मुई, बडी मुई) टॅनीन हे द्रव्य भरपूर असल्याने त्याचा उपयोग कातडी कमाविण्यास व रंगविण्यास करतात. यांचे लाकूड किरकोळ वस्तूस व जळण्यास उपयुक्त असते. गाठींतील द्रव्य ⇨मायफळाप्रमाणे औषधी असते. सालीतून पाझरणारा शर्करायुक्त पदार्थ (मॅन्ना) औषधी [सारक, कफोत्सारक (कफ पाडून टाकणारा) व मल-शुद्धीकारक] असतो. टॅमॅरिक्स डायोइका ही सु. दोन मी. उंचीची जाती भारतात सर्वत्र रुक्ष ठिकाणी आढळते. लहान, अनेक व एकलिंगी गुलाबी फुलांच्या शोभेकरिता ही बागेत लावतात. फुले जूनच्या सुमारास मंजऱ्यांवर येतात. झाडांपासून पिवळट व कडवट गोड डिंक मिळतो. फांद्यांचा उपयोग टोपल्या व झाडण्या (केरसुण्या) यांकरिता करतात.
संदर्भ : Gindal, S. L. Flowering Shrubs of India, New Delhi, 1970.
देशपांडे, सुधाकर