झँबिया : दक्षिण-मध्य आफ्रिकेतील एक स्वतंत्र प्रजासत्ताक. क्षेत्रफळ ७,५२,६१४ चौ. किमी., लोकसंख्या ४५,१५,००० (१९७१). विस्तार ८° १५’ द. ते १८° ७’ द. आणि २२° पू. ते ३३° ४३’ पू. यांदरम्यान आहे. याच्या पूर्वेला मालावी, आग्नेयीस मोझँबीक, दक्षिणेला ऱ्होडेशिया, बोट्स्वाना व नामिबिया (नैर्ऋत्य आफ्रिका), पश्चिमेला अंगोला व उत्तरेला झाईरे हे देश आहेत. झाईरेची पेडिकल ही पट्टी मध्येच घुसल्यामुळे झँबियाच्या नैर्ऋत्य व ईशान्य भूभागांदरम्यान अवघ्या १८० किमी. रुंदीचा प्रदेश आहे. लूसाका (लोकसंख्या ३,८१,०००) ही राजधानी आहे. झँबिया हे एक भूवेष्टित राष्ट्र असल्यामुळे संपन्न असूनही त्याला बाह्य जगाशी संबंध ठेवण्यासाठी शेजारील राष्ट्रांवर सर्वस्वी अवलंबून रहावे लागते. गोऱ्या लोकांच्या अधिपत्याखाली ऱ्होडेशियातून आतापर्यंतचा जवळचा मार्ग असला, तरी झँबियाचे ऱ्होडेशियाशी संबंध दुरावल्यामुळे पर्यायी वाहतूक मार्ग निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत. याचसाठी टांझानियातील दारेसलाम या बंदराला जोडणाऱ्या ‘टॅन-झॅम’ रेल्वेचा प्रकल्प दोन्ही देशांनी १९७० मध्ये हाती घेऊन पूर्ण करीत आणला आहे. अंगोलातून जाणाऱ्या मार्गावर तेथील अलीकडील घटनांचा परिणाम झाला आहे.
भूवर्णन : झँबिया हा स्थिर आफ्रिकन पठाराचा भाग असल्यामुळे त्याचे तळखडक अतिशय जुने असून ते स्फटिकयुक्त ग्रॅनाइट, नीस, शिस्ट इ. अग्निजन्य व रूपांतरित प्रकारचे आहेत. या तळखडकांवर काही ठिकाणी विशेषतः उत्तर सीमेवर पिंडाश्म, वालुकाश्म इत्यादींचे थर आहेत. काफूए नदी खोऱ्यात २६० कोटी वर्षांपूर्वीचे खडक सापडतात. ५५ ते ६२ कोटी वर्षांपूर्वीच्या कटांगा गाळथरात आजपर्यंतची महत्त्वाची खनिजे मिळालेली आहेत. पश्चिमेकडील कालाहारीच्या वाळूखाली आणि ल्वांग्वा व झँबीझी खोऱ्यात २० ते ३० कोटी वर्षांपूर्वीचे ‘कास’ खडक आहेत.
झँबियाचा बहुतेक प्रदेश ९०० ते १,५०० मी. उंचीचे पठार आहे. ईशान्य भागातील मूचिंगा पर्वतराजी २,१००मी. उंच आहे. राष्ट्राचा बराचसा भाग झँबीझीच्या खोऱ्यात असून उत्तरेकडील भाग काँगोच्या पाणलोट क्षेत्रात येतो. हा उत्तर भाग खोलगट असून त्यात बेंग्वेलू सरोवर आहे. त्याला चांबेशी नदी मिळते. सरोवराच्या दक्षिणेकडील व आग्नेयीकडील भाग जगातील एका मोठ्या (१०,३६० चौ. किमी.) दलदलीचा असून येथील पाणी लूआपूला नदीने झँबिया-झाईरे सीमेवरील ग्वेरू सरोवरात जाते व त्यातून काँगोचा लुबुआ हा शीर्षप्रवाह निघतो. म्वेरूप्रमाणे टांगानिका सरोवरही खचदरीत साठलेले असून त्याचे दक्षिण टोक झँबिया-टांझानिया सीमेवर आहे. त्याला मिळणाऱ्या कालांबो नदीचा २२१ मी. उंचीचा धबधबा झँबियात सर्वांत उंच आहे. झँबीझी नदी झँबिया व ऱ्होडेशिया यांच्या सीमेवरून जाते. पठाराचा भाग सलग नसून त्यात झँबीझी, काफूए व ल्वांग्वा व त्यांच्या उपनद्या यांनी दऱ्या कोरून काढल्या आहेत. ल्वांग्वाचे खोरे ही ५६० किमी.ची एक मोठी खचदरीच आहे. ती झँबीझीला मिळते, तेथे देशातील सर्वांत कमी ३६० मी. उंचीचा प्रदेश आहे. म्वेरू सरोवराच्या पूर्वेची म्वेरू दलदल, बेंग्वेलू सरोवराभोवतीचा प्रदेश आणि चांबेशी व काफूए नद्यांची पूरमैदाने तसेच बरॉत्स मैदान हे विस्तृत सपाट प्रदेश आहेत. झँबीझी नदीवरच जगप्रसिद्ध व्हिक्टोरिया धबधबा आणि करिबा हे आफ्रिकेतील सर्वांत मोठे मनुष्यनिर्मित सरोवर आहे. तेथील वीजउत्पादन व मासेमारी महत्त्वाची आहे. मोठ्या नद्यांना वर्षभर पाणी असते, तर लहान नद्या पावसाळ्यानंतर काही दिवसांनी कोरड्या पडतात.
मृदा : पठारावर वाळूमिश्रित मृदा आहेत त्या अम्लधर्मी, अल्पखतमातीच्या व खाली लाल, लोहयुक्त व अपक्षालिन लॅटेराइटचे थर असलेल्या, म्हणून शेतीस फारशा उपयुक्त नाहीत. सरोवरप्रदेशातील व नदीखोऱ्याच्या तळभागातील गाळथरांच्या मृदा सुपीक आहेत.
हवामान : झँबियाचे हवामान उंचीमुळे सौम्य झाले आहे. मात्र सागरदूरत्वामुळे ते विषमही आहे. मे ते ऑगस्ट हिवाळा असतो. दक्षिणेकडून व आग्नेयीकडून थंड वारे येतात. क्वचित पावसाची हलकी सर येते. मध्य ऑगस्ट ते ऑक्टोबरअखेर उन्हाळा असतो. हिवाळा कोरडा असून या काळात दिवसाचे तपमान ३१°से. पर्यंत चढते, तर ते रात्री २१°से. इतके खाली उतरते. उन्हाळ्याच्या आरंभीचा भाग कोरडा असल्यामुळे दिवसाचे तपमान ३६° से. पर्यंत चढते. ऑक्टोबरच्या उत्तरार्धात समुद्रावरील गार वारे येऊ लागतात. नोव्हेंबरच्या सुरुवातीस पुष्कळदा वादळे होतात. वायव्येकडे गडगडाटी वादळेही होतात. नोव्हेंबर ते एप्रिल पावसाळा असतो. त्या वेळी तपमान उतरते. पावसाचे प्रमाण दक्षिण भागात ७१ सेंमी. असून उत्तर भागात ते १४७ सेंमी. च्यावर जाते. एप्रिल व मेमध्ये हवा बदलते. एप्रिलमध्ये दिवसा तपमान चढते आणि रात्री उतरते परंतु मेमध्ये दिवसा व रात्रीही ते उतरते. जास्तीत जास्त तपमान ल्वांग्वा खोऱ्यात ३७५ मी. उंचीवर ४४° से. व कमीत कमी नैर्ऋत्येस सेशेके येथे ९५१ मी. उंचीवर –७° से. इतके आढळले आहे. एकंदरीत हवामान सूदानीसॅव्हाना प्रकारचे आहे.
वनस्पती व प्राणी : देशातील बहुतेक भाग गवताळ असून त्यात लहानलहान झाडे व झुडपे विखुरलेली आढळतात. गवत बारमाही सु. १·५ ते २ मी. उंच असते. बाभळीच्या जातीची, काटेरी आणि गोरखचिंचेची जाड, पाणी साठवणाऱ्या खोडांची झाडे आढळतात. टांगानिका सरोवराजवळच्या भागात विरळ अरण्ये आहेत. नैर्ऋत्येच्या बरॉत्स भागात ऱ्होडेशियन सागाची अरण्ये आढळतात. जंगलापासून इमारती लाकूड, खाणींसाठी लागणारे लाकूड, कोळसा, चारा, पूरक अन्न व इतर उपयोगी पदार्थ मिळतात. दक्षिण भागात लिव्हिंग्स्टनच्या पश्चिमेकडील प्रदेशात साग व मॉहॉगनी यांसारख्या झाडांपासून टणक इमारती लाकूड मिळते. झँबीझी व ल्वांग्वा यांच्या खोऱ्यात सखल भागात मोपेनची झाडे व वर्षायू गवत आढळते. बेंग्वेलू भागात मिळणाऱ्या मुक्का झाडाचे लाकूड फर्निचरला उपयुक्त असते.
झँबियाच्या गवताळ व जंगलभागात नानविध प्राणी आहेत. सर्व साधारणपणे हत्ती हा सार्वत्रिक आढळणारा प्राणी आहे. नद्यांमध्ये धिप्पाड हिप्पो आढळतात. गेंडा, झेब्रा, जिराफ, रेडा, हरिण, बॅबून, माकडे, बुशबेबी यांसारखे तृणभक्षक प्राणी व सिंह, चित्ता, बिबळ्या, तरस, रानटी कुत्रा, गेनेट, रॅटेल, कोल्हा यांसारखे मांसभक्षक प्राणी आढळतात. सु. ७०० जातींचे पक्षी, नद्यासरोवरांतून अनेक प्रकारचे मासे, सुसरी, कासवे, साप, सरडे, विषारी, बिनविषारी साप आणि शेकडो प्रकारचे कीटक आहेत. त्से त्से माशी प्राण्यांना व माणसांना त्रासदायक आहे. फिश ईगल हा झँबियाच्या राष्ट्रचिन्हावरील पक्षी मोठ्या जलाशयांजवळ सर्वत्र आढळतो. एके काळी नानाविध जंगली प्राण्यांनी गजबजलेल्या भागातील प्राणिजीवन निष्काळजीपणे व अविरत केलेल्या शिकारीमुळे फारच कमी झाले म्हणून अभयारण्ये निर्माण करावी लागली आहेत. काही दुर्मिळ प्राणी काफूएसारख्या अभयारण्यात आणि राष्ट्रीय उद्यानातच सापडतात. शिकारीवरील बंधने कडक होत आहेत. नानाविध प्राण्यांनी संपन्न जंगले पर्यटन उद्योगाच्या दृष्टीने महत्त्वाची असून त्यापासून चांगले उत्पन्न मिळू शकेल, हे लक्षात घेतले जात आहे.
इतिहास : झँबियाचा प्रदेश एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत बाह्य जगाला फारसा माहीत नव्हता. दहा हजार वर्षांपूर्वी येथे निअँडर्थल माणूस राहत असावा, असे येथे १९२० मध्ये सापडलेल्या कवटी व सांगडा यांवरून दिसून येते, बुशमेनांच्या वस्तीचे अवशेष आढळतात. त्यांना बांटूंनी दक्षिणेकडे पिटाळून लावले. पंधराव्या शतकात बांटू टोळीवाले काँगो-झँबीझी जलविभाजकाजवळ तांबे काढीत असत. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास अरब गुलाम व्यापारी येथून तांबेही नेत असत. पोर्तुगीजांनी या प्रदेशातून पूर्व-पश्चिम किनारे जोडणारा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला होता. एन्गोनी लोकांनी ईशान्य भागात व कोलोलोंनी बरॉत्स प्रदेशात वस्ती केली. येथील लोक निर्वाह शेती, धातूकाम, विणकाम, मातीची भांडी करणे इ. व्यवसाय करीत असावेत. झांझिबारकडील अरब व पोर्तुगीज लोक येथील एन्गोनी, बेंबा, अंगोलातील एम्याम्बारी इत्यादींच्या मदतीने येथील लोकांस गुलाम म्हणून घेऊन जातच होते.
हा भाग प्रथम एकोणिसाव्या शतकात डॉ. डेव्हिड लिव्हिंग्स्टनच्या प्रयत्नांमुळे उजेडात आला. १८४१ मध्ये दक्षिण आफ्रिकेत वैद्यकीय मिशनरी म्हणून आल्यानंतर १८५० च्या सुमारास लिव्हिंग्स्टन झँबीझीच्या वरच्या भागात येऊन पोहोचला. १८५५ मध्ये त्याला जगप्रसिद्ध व्हिक्टोरिया धबधब्याचा शोध लागला. झँबीझी खोऱ्याचे व पूर्वेकडील पठाराचे समन्वेषण केल्यानंतर बेंग्वेलू सरोवर प्रदेशातील चीतांबा या गावी १८७३ मध्ये तो मरण पावला. १८८६ मध्ये कोइलार्ड हा मिशनरी बरॉत्स प्रदेशात स्थायिक झाला होता.
हा भाग ब्रिटिशांच्या राजकीय व व्यापारी अधिपत्याखाली आणण्याची मोलाची कामगिरी सेसिल जॉन ऱ्होड्स या कर्तबगार ब्रिटिश तरुणाने बजावली. पोर्तुगीजांच्या विरोधाला न जुमानता त्याने ब्रिटिश साउथ आफ्रिका कंपनी स्थापन करून खाणकामाचे हक्क स्थानिक राजसत्तेकडून मिळविले. १८९१ च्या सुमारास न्यासालँड ब्रिटिशांचे संरक्षित राज्य बनले व दक्षिण आणि उत्तर ऱ्होडेशियांचा प्रदेश ऱ्होड्सच्या कंपनीच्या ताब्यात आला. पूर्वी झँबीझी नदीवरून या भागाला झँबीझिया हे नाव पडले होते. १८९५ साली ऱ्होड्सच्या नावावरून या प्रदेशांचे उत्तर व दक्षिण ऱ्होडेशिया असे नामकरण झाले. उ. ऱ्होडेशियाचा पुढील काळातील विकास काहीसा संथ व द. ऱ्होडेशियाच्या मानाने काहीसा निराळ्या पद्धतीने झाला. १९११ पर्यंत नैर्ऋत्य व ईशान्य विभाग एकत्र आणले गेले नव्हते व १९२४ पर्यंत या भागाचे शासन ब्रिटिश साउथ आफ्रिका कंपनीकडे होते.
शासनव्यवस्था १९२४ मध्ये ब्रिटिश सरकारकडे आली. मात्र कंपनीचे खनिज उत्पादनाचे व लोहमार्गावरील हक्क अबाधित राखले गेले. १९५३ मध्ये न्यासालँड, द. व उ. ऱ्होडेशिया यांचे एक संघराज्य बनले त्यातून डिसेंबर १९६३ मध्ये न्यासालँड स्वतंत्र मालावी म्हणून बाहेर पडले आणि १९६४ मध्ये दहा महिने अंतर्गत राज्यकारभार केल्यावर उ. ऱ्होडेशिया ऑक्टोबर १९६४ मध्ये केनेथ कौंडा यांच्या नेतृत्वाखाली झँबिया नावाने ब्रिटिश राष्ट्रकुलातील स्वतंत्र प्रजासत्ताक बनले. स्वातंत्र्योत्तर काळातही आर्थिक सत्ता व खाणी यांच्यावर परकियांचे वर्चस्व होते परंतु अलीकडे परदेशी कंपन्या ताब्यात घेऊन झँबियाच्या लोकांचा प्रभाव वाढावा, अशा योजना आखल्या जात असून राष्ट्रीयीकरणातील कल वाढत आहे.
राज्यव्यवस्था : झँबिया प्रजासत्ताक आहे. तेथे प्रथम अनेक पक्षीय संसदीय राज्यपद्धती अस्तित्वात होती. डॉ. केनेथ कौंडा यांचा यूनिप-युनायटेड नॅशनल इंडिपेंडन्स पार्टी हा पक्ष प्रथमपासूनच अधिकारावर होता. १९७२ मध्ये सर्व विरोधी पक्ष विसर्जित करण्यात आले व ऑगस्ट १९७३ पासून यूनिपची एकपक्षीय राजवट अंमलात आली. अध्यक्ष राज्याचा व सेनादलांचा प्रमुख असतो. तो सार्वत्रिक प्रौढ मतदानाने बेमुदत कालासाठी निवडला जातो. तो मुख्यमंत्री, सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, पक्षाचा सरकार्यवाह व इतर उच्च अधिकारी यांची नेमणूक करतो. अध्यक्षाच्या अनुपस्थितीत पक्षाचा सरकार्यवाह कारभार पाहतो. विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांतून अध्यक्ष आपले मंत्रिमंडळ नेमतो. पक्षाच्या मध्यवर्ती समितीपेक्षा मंत्रिमंडळ दुय्यम असते. या समितीचे २५ सदस्य दर ५ वर्षांनी वेगळ्या निवडणुकीने निवडले जातात. विधानसभेचे १२५ सदस्य व अध्यक्षांनी नेमलेले १० सदस्य असतात. प्रत्येक मतदारसंघासाठी स्थानिक पक्षनेत्यांच्या इलेक्टोरल कॉलेजने सुचविलेल्या व पक्षसमितीने मान्य केलेल्या तीन उमेदवारांतून एक निवडावयाचा असतो. टोळीप्रमुखांच्या २७ सदस्यांचे हाउस ऑफ चीफ्स असते. त्याने बिलांचा विचार करावयाचा परंतु ते अडवावयाचे नाही. कारभारासाठी झँबियाचे सेंट्रल, कॉपरबेल्ट, ईस्टर्न, लूआपूला, नॉर्दर्न, नॉर्थवेस्टर्न, सदर्न व वेस्टर्न असे आठ प्रांत केले असून त्यांचे एकूण ५३ जिल्हे आहेत. प्रत्येक प्रांतासाठी अध्यक्ष स्वतःस जबाबदार असलेला एक मंत्री नेमतो. प्रांतातील ज्येष्ठ शासकीय अधिकारी तेथील कायम कार्यवाह असतो. प्रत्येक जिल्ह्याला प्रांताच्या मंत्र्याला जबाबदार असलेला गव्हर्नर असतो. तो राजकीय व आर्थिक विकास पाहतो. जिल्ह्याचा ज्येष्ठ मुलकी अधिकारी जिल्हा कार्यवाह असतो. स्थानिक स्वराज्य व संस्कृती मंत्री स्थानिक स्वराज्याचे नियंत्रण करतो. लूसाका, कीटवे व एन्दोला यांस सिटी कौन्सिले आहेत. पाच म्युनिसिपल व चोवीस टाउनशिप कौन्सिले आहेत. मंत्री तीनपर्यंत जादा सदस्य नेमू शकतो. चौतीस ग्रामीण कौन्सिले आहेत. खाणनगरातील लोकांसाठी ८ व्यवस्थापक मंडळे आहेत. त्यांचे अधिकार मर्यादित असून त्यांचा खर्च खाणचालकांनी करावयाचा असतो. ही मंडळे शेजारच्या स्थानिक स्वराज्य संस्थांत विलीन करण्याचे धोरण आहे. शहरातील स्थानिक स्वराज्य अधिक संपन्न व समर्थ आहे.
न्याय : कोर्ट ऑफ अपील, उच्च न्यायालय, दुय्यम न्यायालये, चार मॅजिस्ट्रेट कोर्टे व स्थानिक न्यायालये यांच्यातर्फे न्यायव्यवस्था होते. सरन्यायाधीशाशिवाय इतरांच्या नेमणुका ज्युडिशियल सर्व्हिस कमिशनच्या शिफारशीवरून होतात. न्यायशाखेचे स्वातंत्र्य अबाधित राखले जाते.
संरक्षण : तीन पायदळ बटालियन, एक चिलखती गाड्यापथक, दोन तोफखाना पथके मिळून ४,००० सैन्यदल व हवाईदल १,००० चे आहे. हवाईदलाचे शिक्षण व वाढ प्रथम ब्रिटिशांकडे होती. आता इटलीकडे आहे. झँबियन नॅशनल सर्व्हिसखाली १८ ते ३५ वयापर्यंत दोन वर्षे सैनिक सेवा आवश्यक असून ५४ व्या वर्षापर्यंत संरक्षण, सुव्यवस्था इत्यादींसाठी सेवेची जबाबदारी असते.
आर्थिक स्थिती : झँबियाची अर्थव्यवस्था बव्हंशी तांब्याच्या खाणींवर अवलंबून आहे. तांबे खनिजाचे साठे प्रचंड प्रमाणावर असून कमीतकमी ८८·२ कोटी टनांचे साठे सिद्ध झाले आहेत. खनिजामध्ये धातूचे प्रमाण ४·५% म्हणजे उच्च आढळते. एकूण निर्यातीमध्ये ताम्र खनिजाचा सिंहाचा वाटा आहे. जगात तांबे उत्पादनात अमेरिका, रशिया व चिली यांच्या खालोखाल झँबियाचा क्रमांक आहे. निर्यात व्यापारापासून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी सु. ९०% उत्पन्न ताम्र खनिजाच्या निर्यातीपासून मिळते. या खनिजाच्या खाणी प्रामुख्याने देशाच्या उत्तरेस कॉपरबेल्ट या झाईरेच्या शाबा विभागातील खाण प्रदेशाशी संलग्न भागात आढळतात. वीजपुरवठा करिबा येथील आफिकेतील सर्वांत मोठ्या जलविद्युत् केंद्रातून होतो. खाणकामामध्ये ५१% भांडवल सरकारी असून खाणींची मालकी सर्वस्वी सरकारकडेच आहे. झिम्को (झँबियन इंडस्ट्रियल अँड माइनिंग कॉर्पोरेशन) तर्फे आणि मिंडेको (माइनिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) आणि इंडेको (इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) द्वारा खाणी व उद्योग यांचे नियंत्रण आणि विकास केला जातो. १९७० पर्यंत एक खत कारखाना, एक कापड गिरणी, तांब्याच्या तारा वगैरेचा एक कारखाना, स्फोटक पदार्थांचा कारखाना, धान्यासाठी पोती बनविणे, तेल वस्तू नळ, टायर कारखाना, दोन आलिशान हॉटेले व दहा फियाट मोटार कारखाने हे प्रकल्प पुरे झाले आहेत. मात्र खाणकामात गोऱ्या लोकांचा प्रभाव अजूनही आढळतो. गोऱ्या लोकांची प्रमुख वस्ती या खाण भागातच आहे. एन्दोला, कीटवे आणि चिंगोला ही या विभागातील प्रमुख शहरे असून त्यांची वस्ती एक लाखाच्या आसपास आहे. जस्त, शिसे व व्हॅनेडियम यांच्या खाणी काबवे (ब्रोकनहिल) जवळ आहे. झँबीझी खोऱ्यात मांबा खाणीत कोळसा व लूसाकाजवळ आणि झाईरे सीमेजवळ लोखंड सापडले आहे. मँगॅनीज, कोबाल्ट, रुपे यांच्याही खाणी असून लूसाका व कॉपरबेल्टमधील चुनखडकापासून दगड, चुना, सिमेंट मिळतात. ॲमिथीस्ट व पाचू हे मौल्यवान खडेही अनुक्रमे झँबीझी खोऱ्यात व ल्वान्श्या येथे सापडतात. खाणी आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या असल्या, तरी त्यांत सु. ५५ हजार लोकांसच काम मिळते.
शक्ती : १९७१ मध्ये झँबियात सु. ४४० कोटी किवॉ. तास वीज खपली. त्यापैकी सु. ७५% वीज करिबा धरणाच्या दक्षिण तीरावरील ७०५ मेवॉ. जलविद्युत् केंद्रापासून मिळाली. उत्तर तीरावर ६०० मेवॉ.चे केंद्र उभारण्यास जागतिक बँकेने कर्ज दिले आहे. १०० मेवॉ.ची दोन विद्युत्जनित्रे व्हिक्टोरिया धबधबा येथे असून काफूए योजनेतील १५० मेवॉ.ची चार जनित्रे १९७२ पासून सुरू झाली आहेत. एम्बाला, मान्सा, कसामा, मुलुंगुशी, लुन्सेम्फवा, व्हिक्टोरिया धबधबा लुसविशी व काफूए गॉर्ज येथे जलविद्युत् केंद्रे असून चिपाटा, माँगू, लूसाका, कॉपरबेल्ट येथील खाणी व ब्रोकनहिल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन येथे उष्णता-विद्युत् केंद्रे आहेत. बरीचशी डीझेलशक्ती केंद्रेही आहेत.
कृषी : यूरोपीय लोकांनी विकसित केलेला भाग बव्हंशी वाहतुकीची साधने उपलब्ध असलेल्या प्रदेशापुरता मर्यादित आहे. लोहमार्ग व रस्ते यांच्या दुतर्फा असलेली शेते ताब्यात घेऊन यूरोपियन लोकांनी त्यांचा पद्धतशीर विकास केला. मका हे मुख्य अन्नपीक आणि तंबाखू, कापूस व भुईमूग ही मुख्य नगदी पिके लावण्यास त्यांनी सुरुवात केली. नगदी पिकांची निर्यात एकूण निर्यातीच्या फक्त २% आहे.
लोहमार्गापासून दूर गोऱ्या लोकांची वस्ती उत्तरेकडे एम्बाला (ॲबरकॉर्न) येथे आणि पूर्वेकडे चिपाटा (फोर्ट जेमसन) येथेच फक्त आहे. या भागात मळे-शेतीवर भर असून तंबाखू व कापूस यांसारखी नगदी पिके प्रामुख्याने काढली जातात. एम्बालातून बाहेर पडण्यासाठी टांगानिका सरोवर आणि सेंट्रल टांझानियन लोहमार्ग यांचा आसरा घ्यावा लागतो. चिपाटामधून बाहेर जाण्यासाठी मालावीमधील ब्लँटायरपर्यंत मोटारीने व नंतर मोझँबीकमधील बेइरा बंदरापर्यंत लोहमार्गाने जावे लागते. यूरोपीय लोक निघून जाऊ लागल्यामुळे उत्पन्न झालेल्या समस्येला तोंड देण्यासाठी झँबियन लोकांना मळे-शेतीचे शिक्षण देऊन तरबेज करण्यात येत आहे.
गोऱ्या लोकांचा भाग सोडला तर ९८% स्थानिक लोकांनी व्यापलेल्या भागात शेती फारच मागासलेली आढळते. शेतीवर सु. ७०% लोकांचा निर्वाह होतो. मका, भरडधान्ये, कडधान्ये, जोंधळा, कसावा, रताळी, तारो, सुरण, ऊस, वाटाणा, भुईमूग, घेवडे, केळी, तांदूळ, शेंदाड व इतर फळे आणि भाज्या इ. पिकांचे उत्पादन करणाऱ्या निर्वाहशेतीवर भर असून शेती पद्धती जुन्याच आहेत. जंगल तोडून गवत, पालापाचोळा इ. जाळून तयार झालेल्या जमिनीत शेती करण्याचे जुने तंत्र अजूनही प्रचलित आहे. पिकांपासून मिळणाऱ्या उत्पन्नांशिवाय मासेमारी, शिकार व जंगलातून गोळा केलेले खाद्यपदार्थ इत्यादींचा पूरक अन्न म्हणून उपयोग होतो. नद्यांजवळील व काही गवती भागात पशुपालनाचा धंदा चालतो. दूध व मांस या दोन्ही गोष्टींसाठी गुरे पाळली जातात. १९७२ मध्ये १४,२४,९०० गुरे ८०,००० डुकरे २,००,००० मेंढ्या व शेळ्या १ दिवसाची कोंबडीची पिले ७२ लक्ष १२ कोटी अंडी जिवंत व कापून साफ केलेले मिळून ६० लक्ष पक्षी होते. सरोवरे, दलदली व काफूए नदी ही मासेमारीची मुख्य क्षेत्रे असून १९७१ मध्ये ३९,३०० मे. टन मासे पकडण्यात आले.
जंगल संपत्ती : जंगलातील मेण, मध यांसारखे पदार्थ गोळा करणे हादेखील महत्त्वाचा व्यवसाय आहे. देशाचा सु. ८⋅६% प्रदेश वनाच्छादित आहे. सु. १०,५०० हे. क्षेत्रात विदेशी वृक्षांची लागवड केलेली असून त्यांपैकी सु. ६०% उष्णकटिबंधीय पाइन, बाकीचे क्षेत्र निलगिरी व इतर कठीण काष्ठवृक्षांचे आहे. याचा उपयोग मुख्यतः खाणीविभागात होतो. १९७१ मध्ये ४९,३१,००० घ. मी. ओंडके व गोलटे आणि २३,००० घ. मी. कापीव लाकूड असे उत्पादन झाले.
अर्थ : झँबियात १९६८ पासून दशमान पद्धतीचे चलन अंमलात आले आहे. क्वाचा (K) हे झँबियाचे चलन असून एका क्वाचाचे १०० एन्ग्वी होतात. १९७४ एप्रिलमध्ये १ ब्रि. पौंड स्टर्लिंग = १·५१६ क्वाचा व १ अमेरिका डॉलर = ६४·३ एन्ग्वी असा विनिमय दर होता म्हणजेच १०० K = ६५·९८ ब्रि. पौंड = १५५·५६ अ. डॉलर होते. १, २, ५, १० व २० एन्ग्वीची नाणी व ५० एन्ग्वी आणि १, २, ५, १०, २० क्वाचाच्या नोटा असतात. झँबियाच्या १९७३ च्या अर्थसंकल्पात चालू व भांडवली जमा K ३८,१३,०१,००० आणि चालू खर्च K ३५,६६,२३,००० व भांडवली खर्च K ११,३८,७१,००० होता. १९७१ अखेर सार्वजनिक कर्ज K ३७,२०,००,००० होते. १९७४ च्या अर्थसंकल्पात K ४९·९७ कोटी जमा व ४३·६ कोटी खर्च अपेक्षित होता.
परदेशी व्यापार : १९७२ आणि १९७३ मध्ये आयात अनुक्रमे K ४०,२४,११,००० व K ३४,०५,६१,००० आणि निर्यात अनुक्रमे K ५४,१५,६४,००० व K ७४,२४,१४,००० ची झाली. आयातीत यंत्रे व वाहने, पक्का माल, रसायने, संकीर्ण खनिज इंधने, वंगणे इ. अन्नपदार्थ, अखाद्य पदार्थ, खाद्य वनस्पतिज तेले व प्राणिज चरबी, पेये व तंबाखू इ. आणि निर्यातीत तांबे, जस्त, शिसे, कोबाल्ट, तंबाखू, इमारती लाकूड अशी वर्गवारी होती. काही पुनर्निर्यातही होते. १९७१ मध्ये आयात २४% ब्रिटन, १५% दक्षिण आफ्रिका, ११% अमेरिका, ७% जपान, ५% ऱ्होडेशिया, ५% इटली यांजकडून आणि निर्यात २१% जपान, १६% ब्रिटन, ११% इटली, ९% प. जर्मनी, ९% फ्रान्स, ७% चीन यांजकडे झाली. तीत ९१% तांबे आहे. तंबाखू, मका, भुईमूग, कापूस, गुरे, दूध यांच्या विक्रीसाठी चार मंडळे स्थापली असून व्यापारी धोरणाने मळेशेती व पशुपालन व्यवसाय करण्यासाठी स्थानिक लोकांना उत्तेजन देण्यात येत आहे. बँक ऑफ झँबिया ही प्रमुख बँक असून ३ परदेशी बँका आहेत. व्यापार, शेती, सहकारी इत्यादींसाठी वेगळ्या बँका आहेत. राज्य विमा निगमाकडे विम्याचे काम आहे.
कर : सरकारचे निम्म्याहून अधिक उत्पन्न खाणउद्योगावर अवलंबून आहे. कारण व्यापारी व औद्योगिक विकास बेताचा आणि सामान्य माणसाचे उत्पन्न फारच कमी आहे. फायद्यापैकी ५१% मिनरल टॅक्स वजा जाता कंपन्यांच्या पहिल्या २ लक्ष क्काचांवर ३८% व त्यानंतर ४५% कर आकारला जातो. वैयक्तिक उत्पन्नावरील कर १,०४०, क्काचांपेक्षा जास्त उत्पन्नावर ५ टक्के ते ६० टक्क्यांपर्यंत आहे. मद्य, तंबाखू, मोटारी इत्यादींवरील सीमाशुल्क वाढविण्यात आले असून चैनीच्या वस्तूंची आयात कमी करण्याचे धोरण आहे.
कामगार संघटना : एक उद्योग, एक संघटना हे धोरण असून १९६९ अखेर नोंदलेल्या १६ कामगार संघटना होत्या. खाणकामगारांच्या संघटनेचे ४५,००० सभासद असून बांधकाम व अभियांत्रिकी, व्यापार व उद्योग, सार्वजनिक सेवा, स्थानिक स्वराज्य संस्था, शेती व रेल्वे यांमधील कामगार व शिक्षक यांच्या संघटनांच्या सभासदसंख्या प्रत्येकी ६,००० ते १५,००० च्या दरम्यान आहेत. याहीपेक्षा इतर छोट्या संघटना आहेत.
वाहतूक व दळणवळण : झँबियाचा निर्यात व्यापार पूर्वी ऱ्होडेशियातून व झाईरे, अंगोलातील लोबितो बंदरातून होत असे. त्यामुळे या देशात सु. १,२९७ किमी. लांबीचा व शेजारील राष्ट्रातील लोहमार्गाला जोडणारा असा एकच लोहमार्ग होता. मात्र १९६५ पासून ऱ्होडेशियाशी संबंध दुरावल्यामुळे झँबियाच्या निर्यात व्यापारावर विपरीत परिणाम झाला. माल बाहेर जाण्यासाठी मार्गच उरला नाही. यासाठी टाझारा किंवा टॅन-झॅम हा १,७६० किमी.चा दारेसलाम ते कापीरीएम्पोशी रेल्वे प्रकल्प झँबिया आणि टांझानिया यांनी चीनच्या मदतीने हाती घेतला.
देशातील रस्त्यांची लांबी जरी ३४,३६६ किमी. असली, तरी त्यांपैकी केवळ १,३५० किमी. लांबीचे रस्ते पक्क्या स्वरूपाचे आहेत. मोठे रस्ते एकूण ६,४६६ किमी. आहेत. १९७३ पासून ऱ्होडेशिया सीमा बंद झाली आहे. धबधबे, द्रुतवाह वगैरेंमुळे अंतर्गत जलमार्ग फारसे उपयोगी नाहीत. सेनांगा ते लिव्हिंग्स्टन वाहतूक काही झँबीझी नदीतून व काही सडकेने मिळून होते. लूसाका येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून एन्दोला व लिव्हिंग्स्टन येथेही हवाई अड्डे आहेत. झँबिया एअरवेज कॉर्पोरेशनची व्यवस्था १९७२ पर्यंत अलिटालिया कंपनीकडे होती. आफ्रिकी देशांशिवाय मॉरिशस, सायप्रस, इटली, ग्रेट ब्रिटन इत्यादींकडे विमाने जातात. १९६८ मध्ये एन्दोला ते दारेसलाम खनिज तेल वाहतुकीसाठी २० सेंमी.चा नळ टाकला आहे. लूसाका व कीटवे येथे ध्वनिप्रक्षेपण केंद्रे असून इंग्रजीतून व सात आफ्रिकी भाषांतून कार्यक्रम प्रसारित होतात. १९७३ मध्ये देशात २,६०,००० रेडिओ होते. डाक तार व दूरध्वनीची सोय देशातील व देशाबाहेरील महत्त्वाच्या ठिकाणांशी संपर्क साधण्यासाठी आहे. १९७१ मध्ये ५७,००० दूरध्वनी यंत्रे होती. कीटवे व लूसाका येथे दूरचित्रवाणी केंद्रे असून १९७३ मध्ये देशात २२,५०० दूरचित्रवाणी यंत्रे होती. एन्दोलामधून एक खासगी व लूसाकाहून एक शासकीय दैनिक प्रसिद्ध होते. खाणकंपन्या व शासन काही माहिती पत्रके प्रसिद्ध करतात. देशात नियतकालिके १७ आहेत
लोक व समाजजीवन : झँबियामधील सु. ९८% पेक्षा अधिक लोक आफ्रिकन निग्रो असून त्यांमध्ये ७० चे वर जमाती आढळतात. १९६९ मध्ये ९८·५% लोक आफ्रिकी, १·६% गोरे, ०·४% आशियाई व ०·१४% मिश्र वंशीय होते. भारतीयांची संख्या सु. ११,००० असून त्यांपैकी ७०% हिंदू (गुजराती) असून ३०% मुस्लिम आहेत. ते बहुतेक लूसाका, एन्दोला, लिव्हिंग्स्टन, काबवे, चिपाटा येथे असून दुकानदार किंवा मजूर आहेत. १९५४ नंतर भारतीयांच्या आगमनावर कडक नियंत्रण आले. बांटू ही प्रमुख बोली भाषा असून टोंगा, बेंबा, न्यांजा व लोझी या चार मुख्य भाषा आहेत. बांटू व इंग्रजी अधिकृत भाषा असून त्या बऱ्याच भागांत बोलल्या जातात.
देशाच्या बऱ्याच भागांत लोकजीवन अजूनही काहीसे मागासलेल्या अवस्थेत आहे. टोळीजीवन अजून पूर्णपणे संपुष्टात आलेले नाही. टोळीतील सर्व माणसे प्रमुखाच्या आज्ञेत राहतात व आपल्या झोपडीभोवती मका, इतर भरडधान्ये यांसारखी पिके काढून त्यांवर गुजराण करतात परंतु शहरांकडे लोकांचा ओढा वाढत असून ही प्रवृत्ती खाणींच्या प्रदेशात अधिक आढळून येते. शहरातील पुढारलेल्या जीवनाशी संबंध आल्यामुळे हळूहळू जुन्या चालीरीतींचा पगडा कमी होत आहे.
झँबियातील बहुतेक लोक जडप्राणवादी आहेत. सु. ३०% ख्रिस्ती असून त्यांपैकी ६०% कॅथलिक व २०% प्रॉटेस्टंट आहेत.
शिक्षण : अशिक्षितांची शेकडेवारी ५० पेक्षा अधिक आहे. मात्र अलीकडे शिक्षणाचा प्रसार वाढत असून प्राथमिक शिक्षणाच्या सोयी सगळीकडे उपलब्ध होत आहेत. माध्यमिक शिक्षणाच्या सोयीदेखील वाढल्या आहेत. १९६६ साली स्थापन झालेले झँबिया विद्यापीठ उच्च शिक्षणाच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. १९७१ मध्ये २,५९८ प्राथमिक शाळांतून ७,२९,८०१ विद्यार्थी, त्यांतील ३,२७,४७० मुली व १९७० मध्ये १४,०५२ प्राथमिक शिक्षक होते. ११४ माध्यमिक व व्यावसायिक शाळांतून ५६,००० विद्यार्थी आणि २,४६५ शिक्षक (१९७०) होते. ९ प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांत २,२३९ विद्यार्थी व एका माध्यमिक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयात १८० विद्यार्थी होते. १९७२ मध्ये झँबिया विद्यापीठात १,७०० पूर्ण वेळचे व २५० पत्रव्यवहारी विद्यार्थी होते. प्रौढ शिक्षणाचा वेग वाढत आहे. कुशल कामगारांच्या उपलब्धीसाठी तांत्रिक शिक्षणावर भर देण्यात येत आहे.
झँबियातील लोकसंख्या वाढीचा वेग वर्षास सु. ३ टक्के असून १९६५–६९ मध्ये जननसंख्या हजारी ४९·८ व मृत्युसंख्या हजारी २०·७ होती. १ वर्षाखालील बालमृत्यू १९ टक्के होते व सरासरी स्त्रीपुरुष प्रमाण १,००० स्त्रियांस ९६० पुरुष असे होते. सु. ४० टक्के लोक रेल्वेच्या दोहो बाजूस ४० किमी.पर्यंत रुंदीच्या पट्ट्यात राहतात.
आरोग्य : हिवताप, क्षय, अंकुशकृमी (हुकवर्म), कुष्ठरोग, बिल्हारझिया सिससारखा दुबळेपणा आणणारा रोग इत्यादींची लागण शहरांतून कमी झाली आहे. देवी व विषमज्वर आटोक्यात आले आहेत.श्वसनेंद्रियांचे व आतड्याचे रोग आणि अपघात यांमुळे रुग्णालये भरून जातात. वैद्यकीय व शुश्रूषाशिक्षण, मानसोपचार, विमानाने वैद्यकीय सेवा इ. वाढत आहेत. १९६९ मध्ये ६ खास रोगांची केंद्रीय रुग्णालये, २२ शासकीय आणि २६ मिशनरी सर्वसाधारण व जिल्हा रुग्णालये, खाण कंपन्यांची १० रुग्णालये आणि शासन व मिशने यांनी चालविलेली २२ कुष्ठरोग केंद्रे होती. ग्रामीण व नागरी आरोग्य केंद्रे ४५६ व औद्योगिक दवाखाने २६ होते. तसेच ३६२ डॉक्टर, ३२ दंतवैद्य, १,१४५ परिचारिका होत्या.
समाजकल्याण : शासन व खाजगी संस्था मिळून बालसंगोपन आणि आणीबाणीसेवा इ. पाहतात. पंचावन्नाव्या वर्षी निवृत्त झाल्यानंतरच्या सोयीसाठी भविष्यनिर्वाह निधी आहे. त्याचा लाभ सु. ३·५ लक्ष कामगारांस होतो. तथापि बालगुन्हेगारी, दत्तक, निर्वासित, वृद्ध, अपंग यांची जबाबदारी पुष्कळशी परंपरागत कुटुंबसंस्थेतच असते. नागरीकरणामुळे ती हळूहळू शासनास स्वीकारावी लागत आहे. घरांची टंचाई दूर करण्याचे प्रयत्न चालू आहेत. घर बांधू इच्छिणाऱ्या कमी प्राप्तीच्या लोकांना सोयींनी युक्त जागा देण्याचा प्रयत्न केला जातो.
३,६२,००० लोक १९७१ मध्ये पगार किंवा मजुरी मिळविणारे होते. शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न २०३ डॉलर, तर खाणकामगाराचे १,८२० डॉलर आणि गोऱ्या खाणकामगारांचे ५,८३८ डॉलर इतकी विषमता आहे.
झँबियाच्या दोन विकासयोजना १९७५ पर्यंत पुऱ्या झाल्या आहेत. त्यानंतर पंचवार्षिक योजना चालू आहे.
कला-क्रीडा : झँबियाची कला लाकडावरील कोरीवकाम, मातीची भांडी, टोपल्या विणणे, घरे रंगविणे यांत दिसून येते. संगीत व नृत्य यांचा उपयोग होळी समारंभाचे वेळी होतो. आता तो करमणुकीसाठी व शहरांतूनही होतो. पाश्चात्त्य वाद्ये, संगीत, नृत्य यांचाही प्रभाव पडत आहे. शासकीय स्तरावर सांस्कृतिक अभिवृद्धीचे प्रयत्न होत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक उत्सव, प्रदर्शने, परिषदा यांत भाग घेण्यास उत्तेजन दिले जाते. परंपरांची जपणूक केली जाते. लोकसाहित्य आणि झँबियाच्या दृष्टिकोनाची पाठ्यपुस्तके यांकडे लक्ष दिले जात आहे. ठिकठिकाणी वस्तुसंग्रहालये उघडण्यात आली आहेत. पारंपरिक व पाश्चात्त्य क्रिडा-प्रकारांत झँबियाचे युवक वाढत्या संख्येने भाग घेत आहेत.
पर्यटन : लूसाका, लिव्हिंग्स्टन, काबवे, एन्दोला, कीटवे, चिंगोला ही झँबियातील प्रमुख शहरे आहेत. १९७२ मध्ये ६१,६३८ पर्यटक झँबियात येऊन गेले. व्हिक्टोरिया धबधबा, करिबा धरण व सरोवर, काफूए नॅशनल पार्कमध्ये व ल्वांग्वा अभयारण्यामध्ये प्राण्यांचे नैसर्गिक जीवन पहाणे व एका नवोदित राष्ट्राच्या विकासाचे निरीक्षण करणे, ही पर्यटकांची आकर्षणे आहेत. त्यांच्या सोयीसाठी अत्याधुनिक विश्रामगृहे, खेळांच्या व आरामाच्या सोयी उपलब्ध आहेत.
संदर्भ : 1. Cole, J. P. Geography of World Affairs, Harmondsworth, 1974.
2. Stamp, L. D. Africa : A Study in Tropical Development, New York, 1967.
फडके, वि. शं. कुमठेकर, ज. ब.
“