ज्येष्ठ : हिंदू कालगणनेप्रमाणे तिसरा महिना. याच्या पौर्णिमेस चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात अगर आसपास असतो, म्हणून याचे नाव ज्येष्ठ पडले. या महिन्यात सूर्याची मिथून संक्रांत असते. याच्या शुद्ध प्रतिपदेला हनुमान व श्री रामचंद्र यांची भेट झाली आणि शुद्ध दशमीला रामांनी सेतूवर रामेश्वर या ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. शुद्ध दशमीलाच हस्त नक्षत्री गंगावतरण झाले म्हणून प्रतिपदा ते दशमी दशहरा उत्सव करतात. वटसावित्री हे व्रत पौर्णिमेला करतात. या पौराणिक घटनांखेरीज राणा प्रताप जन्मतिथी शुद्ध तृतीया, निर्जला एकादशी, संभाजी महाराज जन्मतिथी शुद्ध द्वादशी, शिवराज्याभिषेक त्रयोदशी, कबीर जन्मतिथी पौर्णिमा, स्वामी विवेकानंदांचा वद्य षष्ठी हा निर्याण दिन इ. हे या महिन्यातील महत्त्वाचे दिवस होत. 

ठाकूर, अ. ना.