जोष मलीहाबादी : (५ डिसेंबर १८९८ – ). प्रसिद्ध उर्दू कवी. जन्म उत्तर प्रदेशातील मलीहाबाद येथे. मूळ नाव शब्बीर हसन खाँ तथापि ‘जोष’ मलीहाबादी ह्या टोपणनावानेही ते प्रसिद्ध आहेत. अरबी आणि फार्सीचा त्यांनी घरीच अभ्यास केला. शिक्षण लखनौ व आग्रा येथे सिनियर केंब्रिजपर्यंत. रवींद्रनाथ टागोर यांच्याबरोबर काही काळ ते कलकत्ता येथेही होते. वयाच्या नवव्या वर्षापासूनच त्यांनी गझललेखनास प्रारंभ केला व १९१२–१३ च्या दरम्यान अजीझ लखनवी यांचे शिष्यत्व पतकरले. १९१४ पासून सलीम पानिपती यांच्या प्रभावाखाली नज्मलेखन (काव्यलेखन) सुरू करून त्यांनी कालांतराने रुबायालेखनातही प्रावीण्य मिलविले.
मलीहाबाद व लखनौ सोडून हैदराबाद येथे त्यांनी अनुवाद विभागात वाङ्मयनिरीक्षक म्हणून काम केले (१९२४–३४). हैदराबादमधील त्यांचे आयुष्य अत्यंत भरभराटीत गेले पण पुढे निजामाचा त्यांच्याबद्दल गैरसमज होऊन हैदराबादमधून त्यांना हद्दपार करण्यात आले. त्यानंतर दिल्लीला कलीम या मासिकाचे त्यांनी संपादन केले (१९३६). दिल्लीच्या वास्तव्यात त्यांनी अत्यंत भावोत्कट व सौंदर्यपूर्ण शैलीत काही गद्यलेखनही केले. दिल्लीहून ते लखनौला गेले आणि तेथे त्यांनी ‘ईस्ट इंडिया के फरझिंदोसे खिताब’ ही आपली प्रसिद्ध क्रांतिकारक कविता लिहिली (१९३९). या वेळेपासूनच ‘शायर-ए-इन्किलाब’ म्हणून त्यांची सर्वत्र कीर्ती झाली. त्यांनी ‘शालीमार टॉकीज’साठी गीतसंवादलेखनही केले. काही काळ मुंबई येथेही त्यांचे वास्तव्य होते. मुंबईहून दिल्ली येथे जाऊन भारत सरकारच्या आजकल या मासिकाचे त्यांनी संपादन केले (१९४८). त्यांच्या उदारमतवादी, जातिधर्मनिरपेक्ष व साम्राज्यविरोधी दृष्टिकोणामुळे पंडित नेहरूंसारख्या पुढाऱ्यांतही त्यांना मानाचे स्थान होते. १९५५ मध्ये ते पाकिस्तानमध्ये गेले. पाकिस्तानात कराची येथील ‘तरक्की-ए-उर्दू बोर्डा’त त्यांनी सु. अडीच वर्षे काम केले.
ते साम्यवादी आणि पुरोगामी विचारांचे लेखक आहेत. मातृभूमीबद्दलचे त्यांचे प्रेम आणि ब्रिटिश साम्राज्यासंबंधीचा द्वेष त्यांच्या शोला व शबनमसारख्या संग्रहात व्यक्त झाला आहे. असहकारितेच्या चळवळीमुळे ‘जिदॉ का गीत’ ही प्रभावी कविता लिहिण्याची त्यांना प्रेरणा मिळाली. ‘मक्तले कानपुर’ या कवितेत कानपुरातील जातीय विद्वेषाचा त्यांनी धिक्कार केला आहे. स्वतः नास्तिक असूनदेखील सर्व धार्मिक नेत्यांचा ते आदर करतात आणि स्वतःला ईश्वराऐवजी मानवावर निष्ठा ठेवणारा म्हणवून घेतात (यादों की बरात ). जोष यांनी आपल्या कवितालेखनाचा श्रीगणेशा आध्यात्मिकतेने केला. रुह-ए-आदम (१९२०) हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह आध्यात्मिक उच्चतेचा आदर्श होय परंतु जोष यांनी या धर्तीचे कवितालेखन पुढे लौकरच सोडले आणि ते धर्मनिरपेक्ष, बुद्धीवादी कविता लिहू लागले. त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली ती बुद्धीवादी आणि धर्मनिरपेक्ष कवी म्हणूनच. आपल्या ‘हुसैन व इन्किलाब’ या कवितेत करबलाच्या शोकांतिकेला ते एक नवेच वळण देतात. नीत्शे हा त्यांचा आदर्श आहे. उमर खय्याम व हाफिज यांच्या भोगवादी तत्त्वज्ञानावर त्यांची निष्ठा आहे. आपल्या आत्मचरित्रात स्वतःच्या अठरा प्रेमप्रकरणांसंबंधी ते स्पष्टपणे आणि निर्भीडपणे लिहितात. प्रीतीप्रमाणेच निसर्गही त्यांचा आवडता विषय. त्यांची शैली रूपकांनी आणि ओजोगुणाने नटलेली आहे. ते शब्दप्रभू आहेत. या शब्दवैभवामुळेच केव्हा केव्हा त्यांना सुंदर शब्दांचेच आकर्षण अधिक वाटते आणि त्यामुळे त्यांच्या कवितांत कधी कधी पाल्हाळ व पुनरुक्ती येऊ पाहते. असे असले, तरी आपल्या क्रांतिकारक कवितालेखनाने समकालीनांमध्ये स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान त्यांनी निर्माण केले आहे, यात शंका नाही. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या लेखणीने लढणारा आघाडीवरचा एक निर्भीड स्वातंत्र्यसेनानी म्हणून त्यांचे सदैव स्मरण केले जाईल.
त्यांच्या गद्यलेखनातूनसुद्धा त्यांचे भाषाप्रभुत्व दृग्गोचर होते. प्रसंगाप्रमाणेच व्यक्तिचित्रांची वैशिष्ट्येही ते समर्थपणे रेखाटतात. यादों की बरात हे त्यांचे आत्मचरित्र भारतीय जनतेच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनाचे व विशेषतः मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गातील खानदानी मुसलमानांचे एक अभिजात चित्रण मानावे लागेल.
समकालीनांनीही त्यांच्याविषयी आदराने लिहिले असून कराची येथील अफकार या नियतकालिकाने १९६१ मध्ये त्यांच्या पासष्टाव्या वाढदिवसानिमित एक खास ‘जोष विशेषांक’ ही प्रसिद्ध केला. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ देऊन त्यांचा गौरव केला.
त्यांचे गद्यग्रंथ पुढीलप्रमाणे : मकालाते जर्रीन (म्हणींचा संग्रह, १९२१), औराके सहर (म्हणींचा संग्रह, १९२१), इशाराऽत (निबंध, १९४२) आणि यादों की बरात (आत्मचरित्र, १९७०). त्यांचे काव्यसंग्रह पुढीलप्रमाणे : रूहे अदब (१९२१), नख्शो निगार (१९३६), शोला व शबनम (१९३६), फिक्रो निशात (१९३७), जुनुनो हिकमत (१९३७), हरफो हिकायत (१९३८), आयातो नगमात (९१४१), सुरुदो खुरोश (१९४३), अर्शो फर्श (१९४४), रामिशो रंग (१९४५), सुंबलो सलासिल (१९४७), सैफो सुबू (१९४७),समुमो सबा (१९५४), इलहामो अफकार (१९६६), हरफे–आखीर (संकल्पित) इत्यादी.
नईमुद्दीन, सैय्यद