जोशी, वीर वामनराव : (१८ मार्च१८८१–३ जून १९५६). मराठी पत्रकारआणि नाटककार. पूर्ण नाव वामन गोपाळ जोशी. त्यांचा जन्म अमरावतीचा. १८९९ मध्ये मॅट्रिक झाले. काही काळ नोकरी केली परंतु देशभक्तीची प्रेरणा निर्णायक ठरून धडाडीने राजकारणात पडले. राष्ट्रमत ह्या दैनिकात देशभक्त गंगाधरराव देशपांडे ह्यांचे प्रमुख सहकारी म्हणून त्यांनी काम केले. लोकमान्य टिळकांच्या जहाल राजकारणाचा ते पुरस्कार करू लागले. १९०८ मध्ये राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना दीड वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली. १९२० नंतर महात्मा गांधींच्या राजकारणात ते सहभागी झाले. असहकारितेच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल आणि सत्याग्रह केल्याबद्दल त्यांना अनुक्रमे दीड व दोन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षा झाल्या (१९२३ १९३०). लोकजागृतीसाठी त्यांनी स्वतंत्र हिंदुस्थान हे साप्ताहिक चालविले होते. त्यांची वाणी आणि लेखणी ओजस्वी होती. ‘वीर वामनराव जोशी’ ह्या नावानेच त्यांना जनता ओळखत असे.
त्यांनी काही नाटकेही लिहिली आहेत. त्यांपैकी खुबसुरत बला ह्या उर्दू नाटकावर आधारित राक्षसी महत्त्वाकांक्षा ( १९१४) व रणदुंदुभि (१९२७) ही नाटके प्रसिद्ध आहेत. त्यांतील काही पदे–उदा., ‘मी नवबाला’ (राक्षसी महत्त्वाकांक्षा ) आणि ‘परवशतापाश दैवे’ रणदुंदुभि )- अत्यंत लोकप्रिय झाली. त्यांची ही नाटके थोडीफार भडक असली, तरी जनतेच्या मनावर राष्ट्रभक्तीचा संदेश जोरकसपणे ठसविणारी असल्यामुळे विशेष गाजली. अमरावती येथे ते निधन पावले.
मालशे, स. गं.