जैन धर्म : सुरुवातीला पाश्चिमात्य अभ्यासकांना बौद्ध धर्म व जैन धर्म यांमध्ये अनेक बाबतींत इतके साम्य आढळून आले, की जैन धर्म हा बौद्ध धर्मातून उत्पन्न झालेला असावा, अशी त्यांची चुकीची कल्पना झाली. ही कल्पना अजून समूळ नाहीशी झालेली नाही परंतु ⇨हेर्मान याकोबीने जैन आगमांची प्राचीनता सिद्ध करून जैन धर्म बौद्ध धर्माहून वेगळा असून त्याहून प्राचीन आहे, हे सप्रमाण दाखवून दिले.
जैनांचे चोविसावे तीर्थंकर ⇨वर्धमान महावीर ही ऐतिहासिक व्यक्ती आहे, याबद्दल आता शंका उरलेली नाही. महावीरांपूर्वी होऊन गेलेल्या ⇨पार्श्वनाथांनी उपदेशिलेल्या धर्माचे आचरण स्वतः महावीर व त्यांचे आईवडील करीत होते. बुद्धापूर्वी जैन धर्म अस्तित्वात होता, हे दाखविणारे अनेक उल्लेख बौद्ध व जैन वाङ्मयात आढळतात.
जैन धर्म व बौद्ध धर्म : जैन धर्म आणि बौद्ध धर्मातील साम्यदर्शक गोष्टी अशा आहेत : दोन्ही धर्मांचे प्रवर्तक मगध देशातील क्षत्रिय होते. दोघाही धर्मप्रवर्तकांना जिन, अर्हत्, बुद्ध, सुगत, तथागत इ. समान उपाधींनी संबोधण्यात येत असे. दोन्ही धर्मांचे अनुयायी आपल्या धर्मप्रवर्तकांना ‘देव’समजून व त्या देवांच्या मूर्ती मंदिरात स्थापन त्यांची पूजा करतात चैत्य वा स्तूप उभारून त्यांत त्यांच्या मूर्तींची स्थापना करतात. चोवीस ⇨तीर्थंकर होऊन गेले असे जैन मानतात, तर पंचवीस बुद्ध होऊन गेले असे बौद्ध मानतात. या जगाचा इतिहास सांगताना जैन धर्म आणि बौद्ध यांची कल्पाची व युगाची कल्पना अवाढव्यपणात समान आहे. या दोन धर्मांतील साम्य असे : अहिंसा परमधर्म, यज्ञखंडन, वेदप्रामाण्य व जातिसंस्था मोक्षमार्गात न मानणे कर्मसिद्धांत, भिक्षुसंघ, लोकभाषेत उपदेश, मोक्षाचा सर्व मानवांस अधिकार इत्यादी.
जैन आणि बौद्ध धर्मांतील प्रमुख तत्त्वांमध्ये मौलिक फरकही आहे. बौद्धांची पंचस्कंधांची कल्पना जैन कल्पनेहून भिन्न आहे. जैन पृथ्वीकाय, अप्काय, तेजकाय, वायुकाय व वनस्पतिकाय असे पाच प्रकारचे स्थावर जीव मानतात. बौद्धांमध्ये अशा प्रकारची कल्पना नाही. मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनःपर्ययज्ञान व केवलज्ञान हे ज्ञानप्रकार बौद्धांत नाहीत. बौद्ध ‘निर्वाण’ आणि जैन ‘मुक्ती’ या कल्पना भिन्न आहेत.
श्रमणसंस्कृती : वैदिक काळापासून भारतात यज्ञप्रधान ब्राह्मणी संस्कृतीबरोबरच अहिंसेवर आधरित श्रमणसंस्कृती अस्तित्वात होती, असे वैदिक वाङ्मयावरून दिसते. इंद्रियनिग्रह, परिग्रहत्याग, आत्मशुद्धी व अहिंसा या गोष्टींना महत्त्व देणारी ही श्रमणसंस्कृती होती. बौद्ध व जैन हे श्रमणसंस्कृतीचे अनुयायी होत. अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य व परिग्रहत्याग ही व्रते श्रमणसंस्कृतीत मुख्य मानली होती.
जैनांचे धार्मिक वाङ्मय : जैनांचे वाङ्मय मूलतः प्राकृत भाषेत आहे. महावीरांनी आपल्या धर्माचा उपदेश अर्धमागधी या प्राकृत जनभाषेत केला. श्वेतांबर जैनांचे ४५ आगमग्रंथ अर्धमागधी भाषेतच आहेत. दिगंबर पंथाचे आगमग्रंथ ‘जैन शौरसेनी’ प्राकृत भाषेत आहेत. कालांतराने जैन आचार्यांनी ग्रंथरचनेसाठी संस्कृत भाषेचा अवलंब केला. आचार्य उमास्वातीने लिहिलेला तत्त्वार्थाधिगमसूत्र हा जैनांचा आद्य संस्कृत ग्रंथ होय. आठव्या शतकात आचार्य हरिभद्रसूरीने संस्कृतात टीका लिहिण्याचा पायंडा पाडला. जिनसेन आणि गुणभद्र या दिगंबर आचार्यांनी महापुराण संस्कृतात लिहिले. याशिवाय संस्कृत, प्राकृत व अपभ्रंश या भाषांत जैनांनी विपुल कथावाङ्मय निर्माण केले तसेच आपल्या लौकिक व नैतिक ग्रंथनिर्मितीकरिता जैनांनी तमिळ व कन्नड या भाषांचाही उपयोग केला [→ जैन साहित्य].
पंचपरमेष्ठी : मोक्षमार्ग अनुसरणाऱ्या साधकाचे त्यांच्या प्रगतीला व पदाला अनुसरून पाच प्रकार केलेले आहेत. हे पाचही प्रकारचे साधक संसारी जीवांना मार्गदर्शक आणि आदर्शभूत असल्याने त्यांना जैन धर्मामध्ये ‘पंचपरमेष्ठी’ म्हणतात. साधू, उपाध्याय, आचार्य, अर्हत् आणि सिद्ध हे पंचपरमेष्ठी होत. साधू, भिक्षू, तपस्वी, मुनी, श्रमण यांचा अर्थ वेगवेगळा होत असला, तरी त्यांचा उपयोग समानार्थाने केला जातो. संघात राहून साधू शिक्षण घेत असतो. उपाध्याय हे स्वतः शिकतात आणि शिकवितातही. आचार्य हे संघाचे प्रमुख असतात ते नवीन साधूंना दीक्षा देतात आणि नियमन करतात [→ जैन संघ]. विद्वान व ज्येष्ठ साधूंनाच आचार्यपद दिले जाते. अर्हत् हे केवलज्ञानी व सर्वज्ञ असतात. सिद्ध मुक्तीला पोहोचलेले कृतकृत्य असतात. पंचपरमेष्ठींच्या नावांचे चिंतन पुण्यकारक समजले जाते. त्यांना ज्यात नमस्कार केलेला आहे, तो ‘पंचनमस्कारमंत्र’ जैन धर्मीयांना अतिशय पवित्र असून सर्व पापांचा नाश करणारा आहे.
जैनांचा निरीश्वरवाद : ईश्वराशिवाय धर्म असू शकतो, ही गोष्ट सामान्य माणसाला विचित्र वाटते. कारण ‘धर्म म्हणजे ईश्वरप्रार्थना’, हे समीकरण त्याच्या मनात ठसलेले असते. मराठीत आपण देवधर्म हा समास करून देव व धर्म यांचा संबंध प्रगट करतो परंतु ईश्वर सृष्टिकर्ता आहे, तोच जीवांना त्यांच्या कर्मानुसार चांगली–वाईट फळे देतो, ही कल्पना जैन धर्माला मान्य नाही. सृष्टी ही कोणी केलेली नाही व कोणी तिचा नाशही करीत नाही. प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार आपोआप फळ मिळत असते, अशी विचारसरणी जैन धर्माची आहे. जैन धर्म सृष्टिकर्ता ईश्वर मानीत नसला, तरी पापपुण्य, स्वर्गनरक व बंधमोक्ष मानतो आणि मोक्षप्राप्तीसाठी इंद्रियनिग्रह व्रताचरण, ध्यानधारणा इ. गोष्टी आचरावयास आग्रहाने सांगतो.
असे जरी असले, तरी ‘देव’ किंवा ‘ईश्वर’ नावाची वस्तू जैन धर्मात नाही असे नाही. कर्माचा नाश करून केवलज्ञानप्राप्ती व मोक्षप्राप्ती करून घेतलेला प्रत्येक जीव ‘परमात्मा’च आहे व तो आदर्श व पूज्य असल्याने त्यालाच जैन ईश्वर म्हणतात. त्याच्या गुणांची प्राप्ती होण्यासाठी, त्याला आदर्श म्हणून पुढे ठेऊन, त्याची पूजाअर्चा आणि भक्ती करणेही जैन धर्माला मान्य आहे. भारतवर्षामध्ये सगळीकडे तीर्थंकरांची भव्य मंदिरे प्राचीन काळापासून अस्तित्वात असून मोठ्या वैभवाने त्यांच्या मूर्तींची तेथे पूजा केली जाते. श्रवणबेळगोळ येथे सु. १८ मी. उंचीची मूर्ती असलेल्या गोमटेश्वराचा मार्च १९६७ मध्ये महामस्तकाभिषेक झाला. त्या समारंभाला सु. ६ लाख लोक हजर होते.
कर्मवाद : भारतातील चार्वाक वा लोकायतदर्शनाशिवाय सर्व दर्शनांनी कर्मवादाचा पुरस्कार केलेला आहे. ‘करावे तसे भरावे’ इ. वाक्प्रचार कर्मवाद सामान्य रीतीने समाजाच्या अगदी खालील थरापर्यंत कसा पोहोचलेला आहे, ही गोष्ट सिद्ध करतात. आपले सुखदुःख आपल्या कर्माचे फल आहे, हे बहुतेकांना पटल्यासारखे दिसते. ईश्वरसुद्धा कर्मानुसारच फल देतो, असे ईश्वरवादी सांगतात. ईश्वरच सर्व काही करतो, असे म्हणण्यात काही विसंगती दिसते. जगात जे अमंगल आहे, दुष्ट आहे, त्याज्य आहे, पाप आहे त्याची जबाबदारी ईश्वरावर नाही तर कोणावर ? जगातील विषमतेचा खुलासा कसा करावयाचा ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ⇨कर्मवाद पुष्कळ समाधानकार रीतीने देऊ शकतो. म्हणूनच तो इतका लोकरूढ झालेला आहे.
कर्मवाद सर्व धर्मांना मान्य असला आणि त्यांनी त्याचा पुरस्कार केला असला, तरी त्याची चर्चा जैन धर्माने जितक्या सूक्ष्म रीतीने व विस्तारपूर्वक केलेली आहे, तशी चर्चा अन्यत्र आढळत नाही. जैन कर्मवाद आपल्या कर्माची संपूर्ण जबाबदारी व्यक्तीवर टाकतो व तेथे सृष्टिकर्त्या ईश्वराला मुळीच स्थान नाही. या विषयावर अनेक ग्रंथ आहेत. शिवाय प्रत्येक महत्त्वाच्या ग्रंथात त्या विषयाची चर्चा आहेच.महाबंध नावाचा ४०,००० श्लोकांचा प्राचीन ग्रंथ नुसत्या कर्मबंधाचे वर्णन करतो. कर्मसिद्धांत हा जैन धर्माचा पाया आहे.
अहिंसामूलक धर्म : जैन नीतिशास्त्र जैन तत्त्वज्ञानावर आधारलेले आहे. कर्मनाशाशिवाय मुक्ती नाही. म्हणून जैनांनी कर्मनाश करण्याच्या दृष्टीने नीतीची आखणी केलेली आहे. गृहस्थधर्म आणि साधुधर्म हे त्या नीतीचेच दोन भाग आहेत. हे दोन्ही धर्म एका दिशेनेच जातात. गृहस्थधर्म हा सौम्य केलेला साधुधर्म आहे. साधूला सर्व प्रकारच्या हिंसेचा त्याग करावा लागतो, तर गृहस्थाला स्थूलमानाने हिंसेचा त्याग करावयाचा असतो. तो आपल्या निर्वाहासाठी एखादा योग्य उद्योग करू शकतो आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या अगर देशाच्या रक्षणासाठी शस्त्रही धारण करू शकतो. साधू असत्य भाषण सर्व प्रकारांनी वर्ज्य करतो परंतु गृहस्थ सत्याचे तरतमभाव करू शकतो अचौर्यव्रत करणाऱ्या साधूला कोणतीही वस्तू दिल्याशिवाय घेता येणार नाही. गृहस्थाच्या बाबतीत पुष्कळ सवलत आहे. त्याला चोरी करता येणार नाही पण मित्राच्या घरातील स्वतःच्या मालकीची वस्तू त्याला न विचारता आणता येईल. साधूला कडक रीतीने ब्रह्मचर्य पाळावे लागते पण गृहस्थाचे या बाबतीतले व्रत आहे ‘स्वदारसंतोष’. साधूला कोणताही परिग्रह म्हणजे घरदार, सामान, नोकरी, जमीनजुमला इ. ठेवता येणारी नाही पण गृहस्थाला विशिष्ट मर्यादेपर्यंत हे सर्व ठेवता येईल. लोभाचा त्याग हा अपरिग्रहामध्ये महत्त्वाचा भाग आहे आणि लोभाचा त्याग म्हणजे पुन्हा अहिंसा आलीच. सूर्यास्तानंतर न जेवणे, पाणी गाळून पिणे, मदिरात्याग, मितभाषण, जीवजंतू तोंडात जाऊ नयेत म्हणून मुखपट्टी बांधणे इत्यादी. साधूच्या आणि गृहस्थाच्या सर्व नियमांचा विचार केला, तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात अहिंसाच सांगितली आहे, असे दिसून येईल [→ अहिंसा].
इतिहास व प्रसार : महावीर तीर्थंकरांच्या वेळी जैन धर्माचा प्रसार जरी भारताच्या पूर्वेकडील देशांमध्ये झालेला होता, तरी नंतरच्या शतकांमध्ये जैन धर्माचा गुरुत्वकेंद्र पश्चिम दिशेला सरकत गेला आणि काही काळ तरी तो गुजरातचा राजधर्म बनला. चंद्रगुप्त राज्य करीत असताना बिहार प्रांतात भयंकर दुष्काळ पडला होता. त्या वेळी जैन संघाचे प्रमुख आचार्य ⇨भद्रबाहू आपल्या काही अनुयायांसह दक्षिणेत म्हैसूरकडे गेले आणि तिकडे त्यांनी जैन धर्माचा प्रसार केला. यामुळे द. भारतामध्ये दिंगबर पंथीय जैनांची संख्या इतर प्रांतापेक्षा अधिक आहे.
महाराष्ट्रात व कर्नाटकात आढळून येणाऱ्या जुन्या मंदिरांवरून व शिलालेखांवरून असे दिसून येईल, की या भागांमध्ये जैन धर्माला राजाश्रय होता व जैन धर्मीयांची संख्याही पुष्कळ होती. इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून जवळ जवळ एक हजार वर्षे गंग वंशीय राजे दक्षिणेत राज्य करीत होते. जैन धर्माचा हा सुवर्णकाळ होय. या काळत समंतभद्र, पूज्यपाद आणि ⇨अकलंकदेव यांनी दक्षिणेत जैन धर्माचा प्रसार केला. गंगराज चौथा राछमल्ल याचा सेनापती चामुंडराय याने नेमिनाथाचे मंदिर बांधविले व प्रसिद्ध ⇨ गोमटेश्वराच्या मूर्तीची स्थापना केली. राष्ट्रकूट वंशात उत्पन्न झालेला पहिला अमोघवर्ष (सु. ८०८–८०) या राजाने आदिपुराणकर्ते ⇨आचार्य जिनसेन यांचे शिष्यत्व पतकरले होते. चालुक्य वंशातील राजांनीसुद्धा जैन धर्माला चांगला आश्रय दिलेला होता. काहींनी जिनमंदिरे बांधविली आणि जैन कवींना राजाश्रय दिला.
यानंतरच्या काळात दक्षिणेमध्ये जैन धर्माला उतरती कळा लागली. जैन धर्मीयांमध्ये अनेक पंथ, उपपंथ, जाती, पोटजाती निर्माण झाल्या.
सद्यःस्थिती : जैन धर्मीयांची संख्या १९०१ च्या जनगणनेप्रमाणे १३,३४,१४० होती १९७१ च्या जनगणनेप्रमाणे ती २६,०४,६४६ झाली आहे.
वैयक्तिक धर्माचरणाच्या बाबतीत जैन समाज अगदी काटेकोरपणे वागणारा आहे पण त्यांची सामाजिक वागणूक, सण, सार्वजनिक उत्सव इ. गोष्टी हिंदूंप्रमाणेच आहेत. गणपती, सत्यानारायण, दत्त इ. हिंदू देवतांना ते भजतात. त्यांच्या जन्म-विवाहादी संस्कारांचे पौरोहित्य हिंदू ब्राह्मणांकडूनच प्रायः केले जाते. इतकेच नव्हे, तर जैन मंदिरांतील पुजारीही (भोजक) पुष्कळदा ब्राह्मणच असतात. जैन मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा दिल्याचा उल्लेख खारवेल या जैन पंथी कलिंगराजाच्या शिलालेखात येतो. त्याने राजसूय यज्ञ केल्याचेही त्यात म्हटले आहे.
व्यापार, विद्यार्जन या निमित्ताने जैन मनुष्य जेथे जाईल तेथील लौकिक रीतिरिवाज तो अनुसरतो. ज्ञानलालसा, सत्य, दान, शील, सद्भाव इ. गोष्टींवर जैनांचा भर असल्यामुळे त्यांच्यात साक्षरताप्रसार बराच झाला असून गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. कारखाने, उद्योगधंदे, व्यापार, विद्या व सभ्यता यांमुळे जैनांनी भारतीय समाजात आपले वैशिष्ट्य टिकवून प्रभाव पाडला आहे.
पहा : जैनांचे धर्मपंथ दिगंबर पंथ श्वेतांबर पंथ.
संदर्भ :
१. जैन, हीरालाल, भारतीय संस्कृति में जैन धर्म का योगदान, भोपाळ, १९६२,
२. दिवाकर, सुमेरुचंद्र, जैन शासन, बनारस, १९५०.
३. शास्त्री, कैलाशचंद्र, जैन धर्म, १९५५.
पाटील, भ. दे.
“