जेंतीले, जोव्हान्नी : (३० मे १८७५–१५ एप्रिल १९४४). प्रसिद्ध इटालियन तत्त्वज्ञ व शिक्षणशास्त्रज्ञ. जन्म सिसिलीत कॉसतेल्व्हेत्रानो येथे. इटालियन साहित्याचा विद्यार्थी म्हणून त्याने पिसा विद्यापीठात काही काळ शिक्षण घेतले पण नंतर तो तत्त्वाज्ञानाकडे वळला. जर्मन चिद्वादाचा, विशेषतः हेगेलच्या चिद्वादाचा, त्याच्यावर विशेष प्रभाव होता. त्याने पदवीसाठी लिहिलेला प्रबंध Rosmini e Gioberti  (१८९८) हा असून त्यात इटलीतील कॅथलिक विचारवंत आणि जर्मन चिद्वादी विचारवंत यांच्यातील वैचारिक संबंध व साम्ये दाखविली आहेत. ⇨ बेनीदेत्तो क्रोचे  (१८६६–१९५२) याच्यासोबत La Critica  या नियतकालिकाचे १९०३ ते २२ ह्या काळात त्याने संपादन केले. क्रोचेची व त्याची मैत्री सु. वीस वर्षे टिकून होती. वयाने तो क्रोचेपेक्षा नऊ वर्षांनी लहान असला, तरी क्रोचेच्या सुरुवातीच्या तत्वज्ञानावर त्याचा प्रभाव पडला. १९०७–१४ ह्या काळात पालेर्मो विद्यापीठात तो तत्वज्ञानाच्या इतिहासाचा प्राध्यापक होता. १९१४–१९१८ ह्या काळात पिसा विद्यापीठात जाझा अध्यासनावर तो प्राध्यापक म्हणून होता. १९१८ मध्ये रोम विद्यापीठात तो तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून गेला.

क्रोचे आणि जेंतीले यांच्यात पुढे फॅसिझमबाबत मतभेद झाले. १९२२–२४ ह्या काळात जेंतीलेने फॅसिस्ट मुसोलिनीच्या पहिल्या मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री म्हणून काम केले. इटलीतील सर्व शालेय शिक्षणात त्याने सुधारणा घडवून आणल्या व शिक्षणाची पुनर्रचना केली. शिक्षणावर त्याने लिहिलेल्या दोन महत्त्वपूर्ण ग्रंथांत त्याची शिक्षणविषयक मते व विचार संगृहीत आहेत. १९२४ मध्ये मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तो ‘नॅशनल फॅसिस्ट इन्स्टिट्यूट ऑफ कल्चर’ ह्या संस्थेचा अध्यक्ष झाला. फॅसिस्ट तत्त्वज्ञानाचा त्याने स्वेच्छेने शेवटपर्यंत प्रचार केला. ‘फॅसिस्ट ग्रँड कौन्सिल’चाही तो सभासद होता. इतरही अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकाराच्या जागांवर तो होता. १९२५–४३ ह्या काळात एन्सायक्लोपीडिया इटालिआनाचा तो मार्गदर्शक संपादक होता. १९४३ मध्ये मुसोलिनीचा पाडाव झाल्यावर तो निवृत्त झाला. फ्लॉरेन्स येथे फॅसिस्टविरोधी लोकांकडून तो मारला गेला.

जेंतीलेने लिहिलेले प्रमुख ग्रंथ पुढीलप्रमाणे : La filosofia di Marx  (१८९९, म. शी मार्क्सच्या तत्त्वज्ञानाची समीक्षा), Il concetto scientifico della pedagogia  (१९००, इं. शी. द कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन), Sommario di pedagogia come scienza filosofica  (२ खंड , १९१३–१४, इं. शी समरी ऑफ एज्युकेशनल थिअरी), Teoria generale dello spirito come atto puro  (१९१६, इं. भा. द थिअरी ऑफ माइंड ॲज प्यूअर ॲक्ट, १९२२), Sistema di logica come teoria del conoscere  (१९१७, इं. शी. सिस्टिम ऑफ लॉजिक ॲज थिअरी ऑफ नोइंग), La riforma dell’ educazione (१९२०, इं. भा. रिफॉर्म ऑफ एज्युकेशन, १९२२), I problemi della scolastica (१९२२), II fascismo al governo della scuola (१९२४), Fascismo e cultura  (१९२८), Introducione alla filosofia (१९३३) इत्यादी.

तत्त्वज्ञान : जेतीले हा बऱ्याच बाबतींत क्रोचेच्या तात्त्विक मतांशी सहमत आहे. क्रोचेचा कृतिप्रधान (ॲक्टिव्हिस्टिक) चिद्वाद वा चिद् क्रियावाद व व्यक्तिवादी (इंडिव्हिजुआलिस्टिक) चिद्वाद, इतिहास व तत्त्वज्ञान यांच्या ऐक्यावर त्याने दिलेला भर आणि सत् हे मूर्त व निर्धारित असते. हा त्याचा सिद्धांत या सर्व गोष्टी जेंतीलेस मान्य आहेत. तथापि त्याच्या मते क्रोचेच्या विचारांत विसंगती, एक आंतरिक संघर्ष दिसून येतो. अनुभव एकात्म पण त्याचे व्यक्तीकरण अनेकविध असते. ह्या मतात एकते-अनेकतेमध्ये जो संघर्ष आढळतो तो नाहीसा करण्यासाठी जेंतीलेने ‘एका’वर अधिक भर दिला आहे. अनेकतेपेक्षा एकता अधिक मूलगामी आहे, हे त्याचे प्रतिपादन कांट व हेगेल यांच्या मतांशी जुळणारे आहे.

त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने क्रोचेची ‘चित-कृती’ किंवा ‘चैतन्याची कृती’ (स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी) ही संकल्पना अधिक मूलभूतपणे मांडली. कृती आणि वस्तुस्थिती (ॲक्ट अँड फॅक्ट) यांतील फरकावर जोर देऊन सत्, हे कृतिरूप, प्रक्रियारूप आहे, असे तो मानतो. एकते-अनेकतेमधील विरोध टाळण्यासाठी, व्यक्तिनिष्ठ व वस्तुनिष्ठ दोन्ही गोष्टींच्या अतीत असे तत्त्व स्वीकारणे आवश्यक आहे आणि ते तत्त्व म्हणजेच मन, आत्मा अथवा आत्मजाणीवपूर्ण तत्त्व (मांइल, सोल, सेल्फकॉन्शसनेस). आत्मजाणिवेत ज्ञाता व ज्ञेय हा भेद मावळतो व म्हणून ती सर्वश्रेष्ठ व शुद्ध कृती आहे. हीच अंतिम सद्वस्तू होय. तेव्हा जेंतीलेचा नवीन व महत्त्वाचा विचार म्हणजेच आत्मा हे द्रव्य (सब्स्टन्स) नसून प्रक्रिया किंवा कृती (प्रोसेस वा ॲक्ट) आहे. वैश्विक अनुभवाची ज्ञाता-ज्ञेयातीत एकता म्हणजेच आत्मा किंवा आत्मजाणीव. या अंतिम एकतेचे स्वरूप ‘अनेकांचे अनंत एकीकरण’ व ‘एकाचे अनंत अनेकीकरण’ ह्या दुहेरी प्रक्रियेत सामावलेले असते. अशा तऱ्हेने अनंत, एकात्म, शुद्ध, क्रियारूप व गतिमान असे मन (आत्मा) हेच अंतिम सत् होय अंतिम सत् असे असते, असे मानल्यानेच विश्वाचा उलगडा करता येतो. 

कला, धर्म, इतिहास व तत्त्वज्ञान यांच्यासंबंधी त्याची स्वतंत्र मते आहेत कला ही व्यक्तिनिष्ठ असते व धर्म हा वस्तुनिष्ठ असतो, असे तो मानतो. कारण वैश्विक आत्मजाणिवेच्या व्यक्तिनिष्ठ अंगाशी कला व वस्तुनिष्ठ अंगाशी धर्म संबंधित असतात. पण केवळ व्यक्तिनिष्ठता वा केवळ वस्तुनिष्ठता ही एकांगी असल्याने कला व धर्म एकांगी आहेत. त्याचा सुरेख संगम तत्त्वज्ञानात होतो. द्वंद्ववादाच्या (डायलेक्टिक्स) परिभाषेत हे मांडले, तर शुद्ध व्यक्तिनिष्ठता, शुद्ध वस्तुनिष्ठता व दोहोंचा समन्वय असलेले एकात्म शुद्धिक्रियात्मक मन अशी तीन तत्त्वे असतात, असे म्हणावे लागेल. कला, धर्म व तत्त्वज्ञान अनुक्रमे वरील तत्त्वांशी संबंधित आहेत. क्रोचेप्रमाणेच जेंतीले हा तत्त्वज्ञान व इतिहास यांचे ऐक्य प्रतिपादतो. वैश्विक आत्मजाणिवेचे अनेकत्वातील एकत्व स्थलकालाधीन असल्याने तत्त्वचिंतन मूर्त व ऐतिहासिक असते. तत्त्वज्ञान हे आत्मजाणिवेचे सर्वश्रेष्ठ रूप असल्याने ते केवळ ज्ञानात्मक नसून सत्‌स्वरूपच आहे. राज्यशास्त्रात त्याने राज्यसंस्थेचे नैतिक श्रेष्ठत्व प्रतिपादून व्यक्तींना गौण लेखले आहे. त्याच्या राजकीय तत्त्वज्ञानात फॅसिझमचे तात्त्विक समर्थन आढळते, त्यामुळे त्यास फॅसिझमचा समर्थक मानले जाते. 

जेंतीलेच्या तत्त्वज्ञानास ‘क्रियात्म चिद्वाद’ (ॲक्च्युअल आयडियालिझम) असे यथार्थ नाव आहे. हेगेलने प्रभावित केलेल्या विचारवंतांत दोन पंथ दिसतात : एक पंथ म्हणजे ब्रॅड्ली, बोझांकेट इ. तत्त्ववेत्त्यांचा. हे तत्त्ववेत्ते परिवर्तन, उत्क्रांती, काल इ. संकल्पना गौण व आभासात्मक आहेत, असे मानतात आणि अंतिम सत् हे स्थिर, अचल आहे असे प्रतिपादन करतात. दुसरा पंथ सत् हे गतिमान व क्रियात्मक आहे, असे मानतात. ह्या पंथात क्रोचे आणि रॉइस यांच्याप्रमाणे जेंतीलेही मोडतो. ‘केवल सत्’ ह्या संकल्पनेचा ‘गतिमानता’, ‘परिवर्तन’ इ. मूलभूत संकल्पनांशी मेळ घालण्याचा प्रयत्न केल्याचे श्रेय त्याचे आहे.

संदर्भ : 1. Harris, H. S. The Social Philosophy of Giovanni Gentile, Urbana, Illiois, 1960.

    2. Holmes. R. W. The Idealism of Giovanni Gentile, New York, 1937.

    3. Romanell. P. The Philosophy of  Giovanni Gentile, New York, 1938.

    4. Thompson, M. M. Educational Philosophy of  Giovanni Gentile, Los Angeles, 1934.

                                                                                  

दामले, प्र. रा.