जेंकिन्झच्या कानाचे युद्ध : ग्रेट ब्रिटनचा राजा दुसरा जॉर्ज याच्या राजवटीत हे युद्ध अमेरिकेच्या आग्नेयीकडील स्पेनच्या वसाहतीत झाले. रॉबर्ट वॉलपोल हा पंतप्रधान असताना अमेरिकेत स्पेनच्या पुष्कळ वसाहती होत्या. उत्रेक्तच्या तहाप्रमाणे त्यांच्याशी मर्यादित व्यापार करण्याची मुभा ब्रिटनला मिळाली होती परंतु या सवलतीचा गैरफायदा घेऊन ब्रिटनचे व्यापारी मर्यादेबाहेर व्यापार करू लागले म्हणून इंग्लिश व स्पॅनिश यांच्यामध्ये वारंवार तंटे होत असत. अशा परिस्थितीत, १७३१ मध्ये स्पेनचा कप्तान फॅडिनो याने माझा कान कापला अशी तक्रार ब्रिटिश कप्तान रॉबर्ट जॅकिन्झने पंतप्रधान वॉलपोलकडे गुदरली. या संदर्भातील ब्रिटिश जनतेची हाकाटी व दबाब यांमुळे वॉलपोलने १७३९ मध्ये स्पेनविरुद्ध पुकारले व २२ नोव्हेंबर १९३९ रोजी ब्रिटिश ॲडमिरल व्हर्नन याने पनामा संयोग भूमीवरील पार्तोबेलो ही स्पॅनिश वसाहत बळकाविली. तदनंतर कार्ताजीना वगैरे ठिकाणी ब्रिटिशांना मार खावा लागला. पुढे हे युद्ध ऑस्ट्रियाच्या वारसा युद्धाचा एक भाग झाले.
दीक्षित, हे. वि.