जिनीव्हा युद्धसंकेत : १८६४ ते १९४९ या काळात, युद्धांत व युद्धकाळांत सैनिकांना व नागरिकांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीला आळा घालण्यासाठी आणि युद्धाच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी करण्यासाठी जे जे आंतरराष्ट्रीय तह-संकेत झाले, त्यांस जिनीव्हा संकेत म्हणतात.
ऐतिहासिक दृष्ट्या पाहता धार्मिक संस्थांनी युद्धाच्या दुष्परिणामांना आळा घालण्याचे प्रयत्न केलेले दिसतात. महाभारतीय युद्धात युद्धविषयक काही संकेत पाळण्यात आले होते. ( भीष्मवर्ष–१/२६–३४ ). एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात सैनिक व असैनिक यांवर युद्धांचे झालेले दुष्परिणाम व त्यांतील निर्घृणता पाहून, स्विझर्लंडचे एक दानशूर हेन्री ड्यूनँट यांनी १८६३ पासून ⇨रेडक्रॉस संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला. १८६४ मध्ये जिनीव्हा येथे आंतरराष्ट्रीय पातळीवर विचारविनियम होऊन पहिला आंतरराष्ट्रीय तह करण्यात आला. जखमी सैनिकांची शुश्रूषा या अर्थाने हा तह ओळखला जातो. शुश्रूषा करणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना या तहामुळे अभयदान मिळाले. त्याचप्रमाणे सैनिकांना व तत्संबंधितांना ओळखण्याचे कार्य रेडक्रॉस संस्थेने करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. १९०६ साली या तहात सुधारणा करण्यात आल्या. १८९९ व १९०७ सालच्या हेग कराराप्रमाणे पहिल्या तहाच्या तरतुदी सागरी युद्धाला लागू करण्यात आल्या. १९२९ साली तिसरा तह होऊन त्यात युद्धबंद्यांना माणुसकीने वागवावे, त्यांच्याबद्दलची माहिती पुरवावी आणि युद्धबंद्यांच्या छावण्यांना तटस्थ राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी भेट द्यावी इ. तरतुदी करण्यात आल्या. दुसऱ्या महायुद्धात आलेल्या विपरीत अनुभवांवरून १९४९ मध्ये चौथा जिनीव्हा संकेत संमत करण्यात आला. त्यान्वये पुढील पाच गोष्टींना नियमबद्ध स्वरूप देण्यात आले. (१) युद्धांतील जखमी आजारी सैनिकांच्या परिस्थितीत सुधारणा, (२) सागरावर असणाऱ्या जखमी आजारी व जहाजफुटीमुळे निराश्रित झालेल्या सैनिकांच्या परिस्थितीत सुधारणा, (३) युद्धबंद्यांना माणुसकीची वागणूक, युद्धबंद्यांना पुरेसा आहार देणे, त्यांना अतिश्रमाचे किंवा धोक्याचे काम न देणे, पत्रव्यवहाराची परवानगी देणे व त्यांचा छळ न करणे इत्यादी, (४) सैनिकांबरोबर युद्धक्षेत्रावर असलेल्या अधिकृत बिगरलष्करी व्यक्तींना संरक्षण देणे, (५) शत्रुराष्ट्रांतील नागरिकांना हद्दपार करणे, ओलीस ठेवणे, लष्करी कामे करावयास त्यांना भाग पाडणे, त्यांचा छळ करणे, सामूहिक शिक्षा देणे वा सूड घेणे, त्यांच्या मालमत्तेचा विध्वंस करणे, वंशधर्मलिंग, राष्ट्रीयता आणि राजकीय मते इ. कारणांवरून त्यांना विषम वागणूक देणे, खून करणे, वैद्यकीय प्रयोगांसाठी त्यांचा उपयोग करणे इ. गोष्टींवर बंदी घालण्यात आली.
या करारात गनिमी युद्धांतील बंद्यांना द्यावयाच्या वागणुकीविषयीही तरतुदी करण्यात आल्या आहेत. गनीम जर युद्धविषयक न्यायाप्रमाणे लढला असेल, तर त्यास वरील तरतुदी लागू पडतात परंतु गनिमी युद्धतंत्र पारंपरिक युद्धतंत्रापेक्षा वेगळे असल्यामुळे जिनीव्हा संकेत त्यांना कितपत लागू होतील, हे सांगणे कठीण आहे.
दीक्षित, हे. वि.