जिजाबाई : (१६०४ ?–१७ जून १६७४). छत्रपती शिवाजीमहाराजांची आई व शहाजी राजे भोसले यांची थोरली पत्‍नी. विदर्भातील सिंदखेड सरदार घराण्यात जन्‍म. वडील लखूजी जाधव हे निजामशाहीतील मातबर सरदार होते. त्यांच्या चाकरीत असलेल्या मालोजी भोसले यांच्या शहाजी या मुलाशी त्यांचा १६०९ च्या सुमारास त्यांचा दौलताबादच्या किल्‍ल्यात विवाह झाला. या प्रसंगी मुर्थजा निजामशाह हजर होता. पुढे काही कारणाने भोसले व जाधव यात वैमनस्य आले. जिजाबाईला सहा मुले झाली. पैकी दोन वाचली. ती संभाजी व शिवाजी होत. संभाजीला अफजलखानाच्या कपटाने मृत्यू आला. १६३६ पूर्वीच जिजाबाई शहाजीच्या पुण्याच्या जहागिरीत रहावयास आली. तिने पुण्यात लाल महाल, तसेच खेड-शिवापूर येथे एक वाडा बांधला. शहाजीच्या राजकारणाचे व धोरणांचे तिला ज्ञान होते. पुणे प्रांताच्या कारभारात लक्ष घालून तिने अनेक वेळा न्यायनिवाडे केले. त्यामुळे राज्यकारभाराचे मार्गदर्शन शिवाजीस मिळाले. जिजाबाई स्वाभिमानी, करारी आणि स्वतंत्र वृत्तीची होती. शिवाजीचा राज्याभिषेक पाहिल्यानंतर बारा दिवसांनी पाचाड येथे ती मरण पावली.

कुलकर्णी, गो. त्र्यं.