जिऑइड : पृथ्वीसारखी आकृती असलेला पदार्थ या अर्थाचा हा शब्द अलीकडे इंग्रजीत पृथ्वीची आकृती कशी आहे, तेच सांगण्यासाठी पुष्कळदा वापरतात. प्रत्येक बिंदूजवळ गुरुत्वाकर्षणाच्या दिशेशी काटकोन करणारा पृष्ठभाग असलेला, पृथ्वीच्या गोलसदृश आकृतीशी बहुतांशी जुळणारा भूमितीय घनपदार्थ, असाही त्याचा अर्थ आहे. चंद्रसूर्याचे आकर्षण, वारे, बदलता वायुभार, बदलते तपमान, बदलता जडपणा यांचे परिणाम न झालेला महासागराचा पृष्ठभाग तसेच जमिनीखालील खडक अगदी सच्छिद्र आणि जलभेद्य असून गुरुत्वाकर्षणाखेरीज इतर कोणतीही प्रेरणा जिच्यावर कार्य करीत नाही अशी  त्याखालील जलरेषा (Water table) असेल, तर तिचा पृष्ठभाग हे आणि जिऑइडचा पृष्ठभाग एकच होतील. महासागरांतील पाण्याची सरासरी पातळी भूमिखंडांतून पुढे तशीच पसरत गेली आहे असे मानले, तर त्या पातळीशी जुळणारा काल्पनिक पृष्ठभाग असलेला एक पदार्थ अशी जिऑइडची थोडक्यात कल्पना देता येईल.

कुमठेकर, ज. ब.