जॉर्जिया – २ : जॉर्जन सोव्हिएट सोशॅलिस्ट रिपब्लिक, जॉर्जियनसाकार्तव्हेलो, रशियन-ग्रूझीया, आर्मेनियन-व्ऱ्हास्तान, तुर्की-गूर्जीस्तान, प्राचीन आयबेरिया. रशियाच्या सोव्हिएट संघराज्यातील एक प्रजासत्ताक. क्षेत्रफळ ६९,७०० चौ. किमी. लोकसंख्या ४८,३०,००० (१९७३). याच्या उत्तरेस रशियन सोव्हिएट फेडरेटेड सोशॅलिस्ट रिपब्लिक, पूर्वेस आझरबैजान, दक्षिणेस आर्मेनिया व तुर्कस्तान आणि पश्चिमेस काळा समुद्र आहे. टिफ्लिस (टि्बलिसी) लोकसंख्या ८,८९,००० (१९७०) ही राजधानी आहे. जॉर्जियात ॲब्कॅझिया आणि आजार (आजारीया) ही स्वायत्त प्रजासत्ताके व दक्षिण ऑसीशन हा प्रांत समाविष्ट आहेत. त्यांची अनुक्रमे सुखूमी, बटूमी आणि त्स्किनव्हसी (स्टल्यिन्यीर) ही प्रमुख शहरे आहेत.
भूवर्णन : उत्तरेस कॉकेशस पर्वताच्या माथ्यापर्यंत उंचावत गेलेला पर्वतप्रदेश, दक्षिणेस दुय्यम (लेसर) कॉकेशस व या दोहोंच्या मध्ये एक सांरचनिक द्रोणीप्रदेश अशी जॉर्जियाची स्थूलमानाने भूरचना आहे. कॉकेशसमध्ये शखरा (५,२०१ मी.), रुस्टाव्ही (४,९६० मी. ), ट्यिटनुल्ट (४,७००मी.), उष्बा (४,६९५ मी. ) ही शिखरे व कॉझबेक (५,०४९ मी.) हा मृत ज्वालामुखी आहे. क्रेस्टोव्ही, दार्याल, क्लुखोर, मॉम्मिझॉन या प्रमुख खिंडींतून उत्तर सीमेपलीकडील प्रदेशांशी दळणवळण होते. कोकेशसच्या बर्फाच्छादित माथ्यावरून आणि उतारांवरून अनेक हिमनद्या व वेगवान प्रवाह खाली येतात. कॉकेशसच्या पूर्व-पश्चिम रांगांशी काटकोन करून डोंगरांच्या अनेक रांगा दक्षिणेकडे येतात. त्यांपैकी सूरामी रांग कॉकेशस व दुय्यम कॉकेशस यांस जोडते व तिच्या १,०६७ मी. उंचीवरील सूरामी खिंडीखालून ४ किमी. बोगद्यातून बाकूकाळा समुद्र लोहमार्ग जातो. जॉर्जियाचा सु. ८५% प्रदेश डोंगराळ आहे. सूरामी रांगेमुळे द्रोणीप्रदेशाचे पश्चिमेकडील रीओनीचे खोरे व पूर्वेकडील कूरा नदीचे खोरे असे दोन भाग होतात. पश्चिमेकडील सखल प्रदेश रीओनी, इनगूर, कडॉर, गूमीस्ता, अबझिप, अजारी-त्स्काली इ. नद्यांनी आणलेल्या गाळाने सुपीक परंतु दलदलीचा झाला आहे. हा कालखीडा प्रदेश प्राचीन काळी कॉल्किस म्हणून प्रसिद्ध होता. आता दलदली भरून काढून प्रदेश शेतीयोग्य बनविला आहे. पूर्वेकडील कूरा नदीचे खोरे अनेक पठारांच्या रूपाने कॅस्पियनपर्यंत उतरत जाते. किनाऱ्याजवळ पाणथळ पट्टी आहे. आराग्वा, अलाझनी, ईओरी, ख्रामी या कूराच्या उपनद्या आहेत. दुय्यम कॉकेशसचे सर्वोच्च शिखर बोल्शॉई अबुल ३,३०१ मी. उंच आहे.
हवामान : पश्चिम जॉर्जियाचे हवामान आर्द्र, सागरी, उपोष्ण कटिबंधीय तर पूर्व जॉर्जियाचे मध्यम आर्द्र, कोरडे, उपोष्ण कटिबंधीय आहे. कॉकेशस पर्वतामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्यांना जॉर्जियात येण्यास प्रतिबंध होतो. पश्चिम जॉर्जियात १०० ते २०० सेंमी. पाऊस विशेषतः कालखीडा भागात पडतो. हिवाळा सौम्य व उबदार असतो. सु. ७०० मी. उंचीपर्यंत जानेवारी तपमान ०° से.च्या खाली कधी जात नाही व किनाऱ्यावरील भूमध्यसागरी हवामानाच्या प्रदेशात ते ५° से. असते. पूर्व जॉर्जियात सखल भागात पाऊस ४० ते ७० सेंमी. व डोंगराळ भागात याच्या जवळजवळ दुप्पट असतो. आग्नेय भागात सर्वांत कमी पाऊस पडतो. जुलैचे तपमान २५० से. तर जानेवारीचे ०० ते ३० से. असते. उंचीचा परिणाम हवामानावर दिसून येतो. कालखीडा भागात ६०० मी. उंचीपर्यंत उपोष्ण कटिबंधीय, त्याच्यावर सौम्य, आर्द्र, त्याच्याही पेक्षा उंच भागात थंड, आर्द्र हिवाळा आणि शीतल उन्हाळा असतो. २,००० ते २,२०० मी. उंचीपलीकडे आल्प्स पर्वतीय हवामान आढळते. ३,५०० मी. उंचीपलीकडे सतत बर्फाच्छादित हिमप्रदेश असतो. पूर्व जॉर्जियात याच उंचीवर यापेक्षा कमी तपमान आढळते. जॉर्जियात अनेक गंधयुक्त आणि औषधी पाण्याचे झरे आहेत.
वनस्पती व प्राणी : जॉर्जियाचा सु. तृतीयांश प्रदेश वनाच्छादित आहे. उंचीचा परिणाम वनस्पतींवरही झालेला दिसतो. सखल भागात लव्हाळे व गवत, त्यापेक्षा उंच भागात बांबू, पाम, निलगिरी इ. उपोष्णकटिबंधीय वनस्पती त्यापेक्षा उंचावर ओक, चेस्टनट, आल्डर इ. त्यानंतर कॉकेशस फर, स्प्रूस, पाइन, ॲश व सफरचंद आणि पेअर यांसारखी फळझाडे दिसतात. त्यापलीकडे ऱ्होडोडेंड्रॉन, ज्यूनिपर, बर्च व नंतर लेपा कुरणे आढळतात. शेवटी उजाड, बर्फाच्छादित प्रदेश लागतो. जॉर्जियातील प्राणिजीवनही विविध आहे. उंच पर्वतीय भागात रानबोकड, कॉकेशन काळवीट, कुरणांतून बिळवासी प्राणी, पक्ष्यांपैकी कॉकेशन काळा ग्राउज, पर्वतीय व दाढीवाला गरुड आणि नद्या व सरोवरांतून आढळणारे विपुल ट्राउट मासे हे उल्लेखनीय आहेत. अरण्यांत रानडुक्कर, हरिण, तपकिरी अस्वल, लांडगा, खोकड, कोल्हा, लिंक्स, ससा व खार तसेच थ्रश, काळे गिधाड, ससाणा इ. पक्षी आहेत. सखल भागातील नद्यांत व समुद्रांत मत्स्यसंपत्ती विपुल आहे.
इतिहास व राज्यव्यवस्था : अलेक्झांडरने पर्शियन साम्राज्याचा पाडाव केल्यानंतर इ.स.पू. चौथ्या शतकात जॉर्जिया राज्य प्रस्थापित झाले. इ. स. पू. एक मध्ये जॉर्जिया रोमन वर्चस्वाखाली गेला. सेल्जूक आणि तुर्कांच्या पहिल्या स्वारीनंतर जॉर्जियाचे स्वातंत्र्य संपुष्टात आले. धर्मयुद्धात तुर्कांचे लक्ष दुसरीकडे वेधले गेले. चौथ्या शतकात ख्रिस्ती धर्माचा प्रसार झाला. सातव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत जॉर्जियात अरब प्रबल होते. त्या वेळी इस्लामचा प्रसार झाला. ११२२ मध्ये दुसऱ्या डेव्हिडने टिफ्लिस मुक्त केले. डेव्हिड व नंतर राणी तामारा यांच्या कारकीर्दी भरभराटीच्या झाल्या. एका शतकानंतर चंगीझखानच्या स्वाऱ्या सुरू झाल्या. १२३६ मध्ये मोगलांनी देश जिंकला. चौदाव्या शतकात जॉर्जियात स्वातंत्र्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला. पण १३८६ मध्ये तैमुरलंगाने टिफ्लिसमध्ये घुसून लूटमार केली. नंतर जॉर्जिया अनेक संस्थानांत विभागला गेला. तूर्क व पर्शियन यांच्या भांडणात जॉर्जियात ही स्थिती सतराव्या शतकापर्यंत टिकली. १६३९ मध्ये कार्टालिया व कारवेटिया हे पर्शियाच्या वर्चस्वाखालील भाग सोडून बाकीचा जॉर्जिया तुर्की अंमलाखाली गेला. १७७२ मध्ये रशियन जॉर्जियाच्या हद्दीवर दिसू लागले. १८०२ साली कारवेटियाच्या दुसऱ्या दूरँक्लीच्या मृत्यूनंतर कार्टालिया आणि कारवेटिया रशियन साम्राज्यात विलीन झाले. १८७८ पर्यंत सर्व जॉर्जिया रशियात सामील करण्यात आला.
इलिया चावचाव्हाडझे आणि जॉर्ज झेरेटली यांच्या नेतृत्वाखाली एकोणिसाव्या शतकात जॉर्जियात राष्ट्रवादी चळवळ सुरू झाली. १८९३ मध्ये ‘मसामी डासी ’ नावाची एक समाज स्वातंत्र्यवादी चळवळ सुरू झाली. या संघटनेत १८९८ मध्ये तयार झालेल्या डाव्या गटाचा आय्.व्ही. जूगाश्व्हीली (स्टालिन) एक प्रमुख कार्यकर्ता होता. फेब्रुवारी १९१७ मधील क्रांतीनंतर आकाकी चेलेन केलीच्या नेतृत्वाखाली जॉर्जिया, आर्मेनिया व आझरबैजान यांचे संयुक्त राज्य स्थापन होऊन त्यांनी स्वतंत्रपणे जर्मनीबरोबर तह केला. १९२८ च्या जर्मन पाडावानंतर हे संयुक्त राज्य मोडले. १९२० साली स्थापन झालेल्या मेन्शेव्हीक झोर्डानियाच्या सरकारला दोस्त राष्ट्रे व रशियाची मान्यता मिळाली. फेब्रुवारी १९२१ मध्ये तुर्की व रशियन हस्तक्षेप सुरू झाला. १९२१ च्या तुर्क–रशिया तहाने जॉर्जियाच्या सीमा निश्चित झाल्या आणि जॉर्जिया सोव्हिएट प्रांत बनला. डिसेंबर १९२२ मध्ये सर्गो आर्रझोनिकीद्झे व जोसेफ स्टालिन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पुढाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली व समाजवादी प्रजासत्ताक स्थापन करण्यात येऊन ते ट्रान्स-कॉकेशियन सोव्हिएट फेडरेटेड सोशॅलिस्ट रिपब्लिक्सला जोडण्यात आले. १९२४ साली चोलोकाशिव्हलीच्या नेतृत्वाखाली लाल सैन्याविरुद्ध करण्यात आलेल्या बंडाचा बिमोड करण्यात आला. १९३० नंतर करण्यात आलेल्या शुद्धीकरणाच्या मोहिमेत सोव्हिएट जॉर्जियाचे बरेच प्रसिद्ध नेते बळी पडले. डिसेंबर १९३६ मध्ये ट्रान्स-कॉकेशियन फेडरेशन मोडून जॉर्जियन सोव्हिएट प्रजासत्ताक हे रशियन संघराज्यातील एक प्रजासत्ताक बनले.
सुप्रीम सोव्हिएटवर १९७१ मध्ये ४०० डेप्युटी निवडले गेले. त्यांपैकी १४१ स्त्रिया व २६४ कम्युनिस्ट होते. जिल्ह्यांच्या ग्रामीण व नागरी भागांच्या व दक्षिण आसीशियाच्या सोव्हिएटच्या निवडणुकांत ४९,१३१ डेप्युटींपैकी ४७% (२३,१०९) स्त्रिया, ५६·४% (२७,६८८) अपक्ष व ६६·६% (३२,७२६) औद्योगिक कामगार व सामुदायिक शेतकरी होते. न्यायदानासाठी सर्वोच्च न्यायालय व विभागीय आणि नागरी जनपद न्यायालये अशी व्यवस्था आहे.
कृषी : जॉर्जियात शेतीस अनुकूल असे तीन विभाग आहेत. काळ्या समुद्राच्या किनाऱ्यास लागून असणाऱ्या समशीतोष्ण व दमट हवेच्या प्रदेशात चहा, तुंग वृक्ष, लिंबाच्या जातीची फळझाडे, निलगिरी, बांबू आणि उच्च प्रतीची तंबाखू पिकविली जाते. दुसरा विभाग कुटाइस भागातील इमरेशिया हा प्रदेश असून या ठिकाणी द्राक्षांचे मळे व रेशीम तयार होते. तिसरा प्रदेश कखेटिया हा अलझानी उपनदीला लागून असून हा प्रदेश फळांच्या बागा व मद्यार्क यांकरिता प्रसिद्ध आहे. जॉर्जियाच्या अनेक भागांत जंगले असून त्यांत निरनिराळ्या जातींचे इमारती लाकूड देणारे वृक्ष आढळून येतात. तेथे लाकूडतोड मोठ्या प्रमाणावर चालते.
जॉर्जियात शेतीयोग्य जमीन थोडीच आहे. देशात गहू व मका पिकत असला, तरी अन्नधान्यांची गरज इतर सोव्हिएट राज्यांतून आयात करूनच भागवावी लागते. तथापि जॉर्जियात धनदायी व मजुरांस काम देणारी पिके भरपूर होतात. सोव्हिएट पद्धतीनुसार पारंपरिक शेतीपद्धतीस खूपच बदल घडून आला आहे. २६५ शासकीय व १,८०५ सामुदायिक शेते (१९७२), भरपूर भांडवल, जंतुनाशके, आधुनिक शेती अवजारे (१९,४०० ट्रॅक्टर, १,४०० मळणीयंत्रे), रासायनिक खते, वनसंवर्धन यांनी देशाचे स्वरूपच बदलले आहे. कोल्चिस भागात १,१५,००० हे. नवीन जमीन प्राप्त केलेली आहे, ३,६०,००० हे. ओलिताखाली आहे व १,४५,९०० हे. दलदलीतील पाण्याचा निचरा झाला आहे.
चहा हे महत्त्वाचे पीक असून सु. ६३,९०० हे. क्षेत्रात १९७० मध्ये अडीच लक्ष टन उत्पादन झाले. सु. १०,१५० हेक्टरांत १ लाख टन लिंबे, संत्री, मोसंबी इत्यादींचे पीक आले. जॉर्जियात द्राक्षवेलांच्या सु. पाचशे जाती शेकडो वर्षांत जोपासल्या गेल्या आहेत आणि सु. १,११,००० हे. द्राक्षमळ्यांपासून पाच लक्ष टन उत्पादन झाले. फळबागांचे क्षेत्र सव्वा लाख हेक्टरांहून अधिक असून उत्पादन चार लाख टन आहे. साखरबीट व तंबाखू ही इतर व्यापारी पिके असून जिरॅनियम, गुलाब आणि जस्मिन यांपासून सुवासिक तेले काढतात. उपनगरांतून भाजीपाला, कलिंगडे इत्यादींची लागवड वाढली आहे.
उन्हाळी व हिवाळी कुरणांसाठी गुरांचे स्थलांतर करतात. १९७३ च्या आरंभी १५ लक्ष गुरे ६,९४,००० डुकरे २० लक्ष शेळ्यामेंढ्या होत्या, कुक्कुटपालन, मधुमक्षिका व रेशीम किडासंवर्धन होत आहे. १९७० मध्ये एक लाख टन मांस, पाच लाख टन दूध व चाळीस कोटी अंडी असे उत्पादन झाले.
उद्योग : उद्योगधंद्यांस आवश्यक असलेली खनिजे व शक्तिसाधने यांबाबत जॉर्जिया समृद्ध आहे. वेगवान नद्यांमुळे जॉर्जियाची वार्षिक जलविद्युत् उत्पादनक्षमता १·५ कोटी किवॉ.ची असून १३६ अब्ज किवॉ.ता. सुप्तशक्ती उपलब्ध आहे. रीओनी, इनगूर, कडॉर व ब्झाइब या पश्चिमेकडील नद्यांकडून ७५% व कूरा, अराग्वा, अलाझनी व ख्रामी यांपासून बाकीची शक्ती मिळण्याजोगी आहे. व्ही. आय्. लेनिन झ्येमअफचला, रीओनी, सुखूमी ही केंद्रे चालू झाली असून इनगूर प्रकल्प पूर्ण होत आला आहे. टिबलिसी केंद्राचे उत्पादन दहा लक्ष किवॉ. असून १९७२ मधील एकूण वीज उत्पादन १,००० किवॉ.ता. झाले. यात कोळशावर आणि नैसर्गिक वायूवर उत्पादिलेली वीज समाविष्ट आहे. त्क्व्हरचेसी, अखाल्त्सिके व त्किबूली येथे कोळशाच्या खाणी आहेत. वार्षिक उत्पादन तेवीस लाख टन आहे. जागतिक उत्पादन केंद्रांशी स्पर्धा करणारा उत्तम मँगॅनीजचा साठा व उत्पादन चीअतूर खाणींचे आहे. १९७१ मध्ये सोळा लाख टन उत्पादन झाले. क्झेटी येथे खनिज तेल सापडते. यांशिवाय लोखंड व इतर धातुके, बॅराइट, अग्निविरोधक व इतर माती, शेल, अँगेट, संगमरवर, संगजिरा, सिमेंट, ॲलाबॅस्टर, बांधकामाचा दगड, अर्सेनिक, मॉलिब्डिनम, टंगस्टन, पारा यांचेही उत्पादन होते. थोडे सोनेही सापडते.
रुस्टाव्ही व झेस्टफॉन्यी येथे धातुशुद्धीकरणाचे आणि कुटाइसी येथे मोटारींचे कारखाने आहेत. विजेची रेल्वे एंजिने, जड वाहने, लेथ व काटेकोर उपकरणे, चहाची पाने गोळा करण्याची व गारांपासून पिकांचे संरक्षण करण्याची यंत्रे, खते, औषधे, कृत्रिम धागे व माल, बांधकामासाठी काँक्रीटचा तयार माल, कापूस, लोकर व रेशीम यांचे कापड व कपडे, चहा, मद्ये, तंबाखूचे पदार्थ इ. अनेकविध उत्पादन आता जॉर्जियात होते. १९७० मध्ये २९,००० टन चहा, बारा लक्ष पिंपे मद्ये, एक कोटी बाटल्या शँपेन, २२·५ कोटी डबे अन्नपदार्थ, पंधरा अब्ज सिगारेटी, १९७२ मध्ये ७·१ लक्ष टन लोखंड, तेरा लक्ष टन पोलाद, १०·५ लक्ष टन धातूंचे पत्रे, पंधरा लक्ष टन सिमेंट, ५·६ लक्ष टन खते, ५·६४ कोटी मी. सुती कापड, ४·०६ कोटी मी. रेशमी कापड, १·११ कोटी पादत्राणे, १६,६०० टन साखर या आकड्यांवरून भारतातील आसाम राज्यापेक्षा त्रिपुराएवढ्या क्षेत्रफळाने कमीच असलेल्या जॉर्जियाची औद्यागिक प्रगती लक्षात येईल. १९७२ मध्ये १५·८ लक्ष औद्योगिक व व्यवस्थापकीय कामगार होते. त्यांशिवाय राष्ट्रीय अर्थकारणाचे उच्च शिक्षण घेतलेले दोन लाखांहून अधिक तज्ञ होते.
दळणवळण व वाहतूक :जॉर्जियात १९७२ मध्ये १,४२९ किमी. लोहमार्ग होते. बाटूमी बंदरापासून टिफ्लिसमार्गे कॅस्पियनवरील बाकूपर्यंत जाणारा मुख्य मार्ग पुढे इराणमध्ये ताब्रीज व ॲनातोलियामधील अर्झमासपर्यंत जातो. निरनिराळ्या खाणी प्रदेशांकडे, बरझॉमी येथील झऱ्यांकडे, बाकुरियानी या आरोग्यधामाकडे व अनेक शहरांकडे त्याचे फाटे गेले आहेत. अरवल सेनाकी ते सुखूमीमार्गे तूआप्से–क्रॅस्नोदार क्रायपर्यंतही लोहमार्ग आहे. तथापि मुख्य वाहतूक सडकांवरूनच होते. १९७२ मध्ये २१,००० किमी. मोटारीयोग्य रस्त्यांपैकी १६,९०० किमी. पक्के रस्ते होते.
लोक व समाजजीवन : जॉर्जियन लोक इ. स. पू. आठ-नऊ शतकांपासून ट्रान्स-कॉकेशिया या भागात राहिलेले आहेत. त्यांची संस्कृतीही प्राचीन आहे. पुढे त्यांचा इतर अनेक लोकांशी संबंध आला. सध्या येथील लोकांपैकी ६६·८% लोक हे प्राचीन सुसंस्कृत जॉर्जियन, ९·७%, आर्मेनियन, ८·५% रशियन, ४·६% आझरबैजानी, ३·२% आसीशियन, १·७% अब्खाझियन व बाकीचे इतर आहेत. सु. ९०% लोक १,००० मी. पेक्षा कमी उंचीच्या प्रदेशात राहतात. त्या भागात लोकवस्तीची सरासरी घनता दर चौ. किमी . १११·५ आहे. सु. ४६% लोक नागरी वस्तीत राहतात व नगरांकडील ओघ वाढता आहे. ग्रामीण समजले जाणारे पुष्कळसे लोकही नागरी औद्यागिक उत्पादनाशी संबंधित उद्योगात गुंतलेले आहेत. चहा, फळे वगैरेंच्या मळ्यांत काम करणारे ग्रामीण कामगार पुष्कळच आहेत.
शिक्षण : रशियात सामील होण्यापूर्वी जॉर्जियातील ७५% लोक निरक्षर होते. १९७२–७३ मध्ये ४,५०२ प्राथमिक व माध्यमिक शाळांतून १०,५४,००० विद्यार्थी १०० तकनिकी महाविद्यालयांतून ५२,८०० विद्यार्थी १८ उच्च शिक्षणसंस्थांतून ८६,००० विद्यार्थी होते. टिफ्लिस विद्यापीठात १६,३०० विद्यार्थी होते. शहरांतून ११ वर्षांचा रूढ शिक्षणक्रम आहे. अबास्टूमान्यी येथे खगोलीय भौतिकी वेधशाळा आहे. रशियाच्या विज्ञान अकादमीची शाखा व जॉर्जियाची विज्ञान अकादमी आहे. तिच्याशी ४१ संस्था व ४,५४३ शास्त्रीय काम करणारे संलग्न आहेत. १९४ संशोधन शाळांतून २२,३६८ लोक काम करतात.
आरोग्य : आरोग्यसेवांच्या दृष्टीने जॉर्जियाचा क्रम जगात पुष्कळच वरचा आहे. दर १०,००० लोकांस ३६ डॉक्टर आहेत. १९७२ मध्ये एकूण १८,२०० डॉक्टर व रुग्णालयांत ४४,९०० खाटा होत्या. औषधी पाण्याचे झरे, काळ्या समुद्राकाठची उबदार हवा, डोंगराळ भागांतील सृष्टिसौंदर्य व स्वच्छ शुद्ध हवा आणि अनेक आरोग्यधामे यांमुळे सोव्हिएट संघराज्यात जॉर्जियाला आरोग्यदृष्ट्या मोठे महत्त्व आहे.
भाषा व साहित्य : जॉर्जियन भाषेतील लिखित साहित्याची परंपरा उपलब्ध साहित्याधारे इ. स. च्या पाचव्या शतकापर्यंत भिडविता येते. चौथ्या शतकात जॉर्जियाचे ख्रिस्तीकरण झाल्यानंतर ख्रिस्ती धर्माचा जॉर्जियनमध्ये प्रचार-उपदेश करण्यासाठी जॉर्जियन वर्णमालेच्या निर्मितीची निकडही निर्णायक ठरली. आरंभीच्या जॉर्जियन साहित्यावर ख्रिस्ती धर्माचा पगडा दिसतो.
ख्रिस्ती धर्माच्या प्रभावामुळे जॉर्जियनमध्ये लौकिक स्वरूपाची कविता विकसित होण्यास वेळ लागला. १०८९–१२३४ ह्या कालखंडात अनेक नामांकित कवी होऊन गेले. हा कालखंड जॉर्जियन साहित्याचा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो.
सतरावे आणि अठरावे ही दोन शतके म्हणजे जॉर्जियन साहित्याचे ‘रौप्ययुग’. ह्या कालखंडात जॉर्जियन काव्याचा लक्षणीय विकास घडून आला.
अठराव्या शतकात जॉर्जियन इतिहासाचे ग्रंथ संपादून प्रसिद्ध करण्यात आले तसेच काही चांगल्या बोधकथा (फेबल्सही) लिहिल्या गेल्या.
एकोणिसाव्या शतकात जॉर्जियन कवितेवर रशियन कवितेची छाप पडू लागली. फ्रेंच काव्याची काही वैशिष्ट्येही जॉर्जियन काव्यात आली. ह्याच शतकात जॉर्जियन साहित्यात स्वच्छंदतावादही अवतरला. जिऑर्जी एरिस्थावी याच्या प्रयत्नांनी जॉर्जियन सुखात्मिकेचा विकास घडून आला.
मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव १८९० नंतरच्या काही वर्षांत काही साहित्यकृतींतून उमटू लागला. विसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात फ्रेंच प्रतीकवादाने प्रभावित झालेले काही कवी उदयास आले.
जॉर्जियाला १९१७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले व जॉर्जियन साहित्याच्या विकासाला पोषक परिस्थिती निर्माण झाली. १९२१ नंतरच्या जॉर्जियन साहित्यावर साम्यवादाचा प्रभाव पडलेला आहे [→ जॉर्जियन भाषा जॉर्जियन साहित्य].
कला : जॉर्जियातील कलेची सुरुवातही ख्रिस्त जन्मापूर्वी २,००० वर्षे झाली. त्यात सोने, चांदी व ब्राँझ यांपासून बनविलेले दागिने यांचा समावेश होतो. त्यानंतर दगडातील कोरीवकाम व हस्तिदंतातील कोरीवकाम या कला उदयास आल्या. अकराव्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंत मीनाकाम भरभराटीस आले. एकोणिसाव्या शतकानंतर मात्र येथील कलेवर रशियन कलेची छाप प्रामुख्याने पडलेली आढळून येते. येथे असलेल्या पुरातन अवशेषांवरून येथील वास्तुशिल्प ख्रिस्त जन्मापूर्वी १,००० वर्षांपूर्वीचे असावे असे दिसते. इ. स. चौथ्या व पाचव्या शतकांत अनेक दगडी चर्च बांधले गेले. सातव्या शतकात झकेरी, व्हन यांसारखी मध्यभागी घुमट असणारी देवळे प्रसिद्धीस आली. बाराव्या व तेराव्या शतकांत दगडांऐवजी विटांचा वापर करून अनेक किल्ले, पूल आणि एकसंधी बांधकाम केले गेले. कलेप्रमाणेच वास्तुशिल्पावरदेखील एकोणिसाव्या शतकानंतर रशियन वास्तुशिल्पाचा प्रभाव पडलेला दिसतो.
जॉर्जियन संगीत उच्च दर्जाचे आहे. सतराव्या शतकापर्यंत ह्या संगीतात फार थोडी सुधारणा झाली. अठराव्या शतकात मात्र जुन्या जॉर्जियन संगीतात बराच मोठा बदल घडून आला. पहिले संगीतगृह टिफ्लिस येथे १८५२ मध्ये बांधण्यात आले. झखारी पॅलियाश्व्हीली आणि मेलिटन बालान्चिव्हद्झे हे नाणावलेले संगीतकार होत. तसेच पिर्सोमॅनिद्झे, ताबिद्झे, सर्जी कोबुलाद्झे हे प्रसिद्ध चित्रकार होत.
वाखटांग चाबूकिआन हा राष्ट्रीय संघनृत्याचा प्रणेता होय. येव्हजेनी वाखटांगॉव्ह व इतरांच्या वास्तव नाट्यसृष्टीचा प्रभाव रशियाबाहेरही पडला.
टिफ्लिस, कुटाइसी, बाटूमी, सुखूमी, रुस्टाव्ही, पॉटी आणि गॉरी ही येथील महत्त्वाची शहरे होत. कलावैभव, निसर्गसौंदर्य, आरोग्यकेंद्रे इत्यादींसाठी प्रवासी जॉर्जियाकडे लोटतात.
वर्तक, स. ह. कुमठेकर, ज. ब.
“