जॉत्तो दी बोंदोने : (सु. १२६७–८ जानेवारी १३३७). प्रख्यात इटालियन चित्रकार व वास्तुकार. फ्लॉरेन्सनजीक व्हेस्पिन्यानो येथे जन्म. त्याचे चरित्र व विशेषतः काही कलाकृती यांविषयी निश्चित माहिती उपलब्ध नसल्याने त्यांविषयी अभ्यासकांत बरेच मतभेद आहेत.जोव्हान्नी चीमाबूए याच्या हाताखाली त्याचे कलाध्ययन झाले असावे (सु. १२८०–९०). १२९० ते १२९९ च्या दरम्यान त्याने असीझी येथील सान फ्रांचेस्को चर्चमधील वरच्या भागात सेंट फ्रान्सिसच्या जीवनातील आख्यायिका रंगविल्या. या कालावधीतच त्याने रोम येथे जाऊन तेथील अभिजात कलाकृतींचा प्रत्यक्ष अभ्यास केला. त्याची महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणजे सु. १३०६ ते १३१२ या काळात पॅड्युआ येथील आरेना चॅपेलमध्ये रंगविलेली भित्तिलेपचित्रे. त्यांत खिस्त व कुमारी माता यांच्या जीवनातील प्रसंग तसेच अंतिम निवाड्याचे दृश्य यांचा अंतर्भाव होतो. त्याने फ्लॉरेन्स येथील सांता क्रोचे चर्चमध्येही भित्तिलेपचित्रे रंगविली (सु. १३२०–२५). १३२९–३३ या काळात तो नेपल्समध्ये रॉबर्ट ऑफ ॲन्जू या राजाच्या दरबारी होता. तेथे त्याने अनेक भित्तिचित्रे काढली पण ती उपलब्ध नाहीत. १३३४ मध्ये फ्लॉरेन्सचा नगरवास्तुविशारद व तेथील कॅथीड्रलचा प्रमुख वास्तुशिल्पी म्हणून त्याची नियुक्ती झाली. या पदावर असतानाच त्याने फ्लॉरेन्स कॅथीड्रलच्या भव्य घंटाघराचा (जॉत्तोस टॉवर) वास्तुकल्प केला पण त्याचे बांधकाम त्याच्या हयातीत पूर्ण झाले नाही. १३३५–३६ मध्ये ड्यूक आद्झोन व्हिस्कोन्ती याच्या अनुज्ञेने तो भित्तिलेपचित्रे रंगविण्यासाठी मिलानला गेला होता. फ्लॉरेन्स येथे त्याचे निधन झाले.  

जॉत्तोने तत्कालीन बायझंटिन परंपरेतील साचेबंद चित्रण झुगारून दिले व आपल्या व्यक्तिप्रतिमांना अधिक सघन, त्रिमितीय व नैसर्गिक रूप दिले. गुंतागुंतीच्या मानवी भावविश्वाचा अतिशय समर्थपणे त्याने आविष्कार केला. त्याने रंगविलेल्या दृश्यांतील व्यक्तींच्या परस्परसंबंधित हालचाली सहज व स्वाभाविक असून त्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद, दुःख, असूया आदी भावांचे चित्रण अतिशय हृद्य व जिवंत वाटते. चित्राकृतीतील भावनिक आशय नेमकेपणाने प्रकट करण्याचे तसेच त्यातील लौकिक व  आध्यात्मिक वास्तवता सूचित करण्याचे त्याचे सामर्थ्य असाधारण आहे. उदा., पॅड्यूआ येथील आरेना चॅपेलमधील द लॅमेंटेशन (पहा : मराठी विश्वकोश : २, चित्रपत्र ४१) या भित्तिलेपचित्रातील सर्व चित्रघटक ख्रिस्तवधाच्या कारुण्याच्या आशयाभोवती एकवटलेले आहेत. आकारिक भव्यता व साधेपणा, प्रभावी कथाचित्रण, मानवी भावभावनांचे नाट्यपूर्ण व समर्थ आविष्करण, चित्रणाच्या तपशिलांतील नेमकेपणा व मोजकेपणा ही जॉत्तोच्या कलेची ठळक वैशिष्ट्ये होत. इटालियन चित्रकलेतील महान प्रबोधनयुगाचा तो आद्य प्रवर्तक मानला जातो [→ इटलीतील कला]. दान्ते, पीत्रार्क, बोकाचीओ आदींनी त्याच्या कलासामर्थ्याविषयी गौरवोद्‌गार काढले आहेत.

संदर्भ : 1. Eimer, Sarel, The World of Giotto, New York, 1967.

    2. Martindale, Andrew Baccheschi, Edi, The Complete Paintings of Giotto, London, 1969.

इनामदार, श्री. दे