जाहक : इन्सेक्टिव्होरा (कीटकभक्षी) गणाच्या एरिनॅसीइडी कुलातील हे प्राणी आहेत. ते आफ्रिका, यूरोप व आशिया या खंडांत आणि जावा, सुमात्रा, बोर्निओ व फिलिपीन्स द्वीपसमूहातील मिंदानाओ बेट येथे आढळतात. जंगली व झुडपाळ प्रदेश, विस्तीर्ण माळराने आणि वाळवंटी प्रदेश यांत ते राहतात. यांचे सात वंश आणि सु. पंधरा जाती आहेत.
या प्राण्याचे मुस्कट लांब व निमुळते असते. डोळे आणि कान तीक्ष्ण असतात. शरीर मजबूत पण बेडौल असते. शेपूट आखूड असते. पाय गिड्डे असतात पायांना पाच बोटे असून त्यांवर नखर (नख्या) असतात. पाठ आणि पार्श्व (बाजूचा ) भाग यांवर कंटकांचे (काट्यांचे) दाट आवरण असते. डोके व पाय अंगाखाली आखडून घेतल्यावर शरीरावरील काटेरी आवरण त्यांना पूर्णपणे झाकून टाकते आणि अशा प्रकारे शरीराचा काटेरी चेंडू बनून या प्राण्याचे चांगल्या प्रकारे संरक्षण होते.
भारतात या प्राण्यांच्या दोन जाती आढळतात : एक लांब कानांचा जाहक आणि दुसरा फिक्कट जाहक. लांब कानांच्या जाहकाचे शास्त्रीय नाव हेमिएकिनस ऑरिटस कॉलॅरिस हे असून तो कच्छ, राजस्थान, सिंध, पंजाब यांच्या शुष्क वाळवंटी प्रदेशांत आढळतो. फिक्कट जाहकाचे शास्त्रीय नाव पॅराएकिनस मायक्रोपस न्यूडिव्हेंट्रिस असे आहे व तो द. भारताच्या सपाट प्रदेशात राहणारा आहे.
लांब कानांच्या जाहकाच्या शरीराची (डोक्यासहित) लांबी १५–१८ सेंमी. असून शेपूट सु. २·५ सेंमी. असते. याचे डोके व खालचा भाग यांवर गडद तपकिरी किंवा जवळजवळ काळ्या रंगाची फर असते. शुष्क मैदाने आणि वाळवंटे यांत राहणारा असल्यामुळे वाळूत बिळे करून त्यांत, काटेरी झुडपांखाली किंवा गवताच्या झुबक्याखाली तो दिवसा आसरा घेतो. तिन्हीसांजांच्या सुमारास भक्ष्य मिळविण्याकरिता बाहेर पडतो आणि उजाडण्याच्या सुमारास आपल्या आश्रयस्थानी परततो. किडे, कृमी, पिकळ्या, सरडे, उंदीर, घुशी आणि पक्ष्यांची अंडी यांवर ते उदरनिर्वाह करतात. फळे आणि झाडाझुडपांची मुळेही ते कधीकधी खातात. या जातीचे प्राणी अन्न-पाण्याशिवाय दहा आठवडे राहू शकतात. ते आपल्या दुडक्या चालीने बऱ्याच दूरवर भटकत जातात, पण संकटाची किंचित चाहूल लागताच ते शरीराची चेंडूप्रमाणे गुंडाळी करून निश्चल पडून राहतात. याला हातात धरण्याचा प्रयत्न केल्यास तो एका झटक्यात पाठ उंच करून काटे आपल्या बोटात घुसवतो व एकसारखा गुरगुरत राहून नापसंती व्यक्त करतो.
राजस्थानातील वाळवंटात राहणाऱ्या जाहकाचे बीळ सु. ५० सेंमी. लांब असते. सामान्यतः जाहक वर्षभर एकाच बिळात राहतो. एका बिळात एकच प्राणी राहतो, पण विणीच्या काळात मादी आपल्या बिळाचे आतले टोक ऐसपैस करून पिलांना राहण्याकरिता जागा करते. ही जाती हिवाळा निष्क्रियतेत घालविते. इतर जाहकांप्रमाणेच हा सुद्धा शरीराची गुंडाळी करून झोपतो. या जातीच्या प्रजोत्पादनाचा काळ जुलै–सप्टेंबर असतो. मादी वर्षातून एकदाच विते आणि तिला १–४ पिल्ले होतात. जन्माच्या वेळी ती आंधळी असतात व त्यांच्या अंगावरील काटे मऊ व लवचिक असतात, पण लवकरच ते कठीण होतात.
फिक्कट जाहक जवळजवळ लांब कानांच्या जाहकाएवढाच असतो, पण डोके आणि शरीराचा खालचा भाग यांवरची त्याची फर पांढरट किंवा फिक्कट रंगाची असते. याच्या सगळ्या सवयी लांब कानांच्या जाहकासारख्याच असतात.
कर्वे, ज. नी. यार्दी, ह. व्यं.
“