किशोरावस्था : बाल्यावस्था संपून तारुण्यावस्था किंवा प्रौढत्व सुरू होईपर्यंतच्या संक्रमण काळाला `किशोरावस्था’ असे म्हणतात. याच अर्थाने `कौमार’, `कुमारवय’, `पौगंडावस्था’ असे शब्दही वापरतात. `किशोरावस्था’ हा शब्द प्राचीन असून वशब्दकल्पद्वमातील त्याची व्याख्या या अवस्थेला पूर्णपणे लागू पडते. किशोरावस्था ही मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाची अवस्था असून या अवस्थेत घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम जन्मभर टिकून राहतो. या काळात `एकादशवर्षावधिपंचदशवर्षपर्यंतम्‌’ मातापितादींचे नियंत्रण हळूहळू कमी होते. शाळेत, खेळाच्या वेळी व इतर प्रसंगी समवयस्कांशी जास्त निकटचा संबंध येतो. मन संस्कारक्षम असल्यामुळे या वयात मनावर होणारे संस्कार जन्मभर टिकतात. शहरांतून तसेच दळणवळण सुलभ झाल्यामुळे खेड्यांतूनही वृत्तपत्रे, सिनेमा, नाटके, रेडिओ.  इ. साधनांद्वारे हे संस्कार होत असतात. घरातील व बाहेरील शिस्तीच्या बंधनांविरूद्धची प्रतिक्रियाही याच वयात मुलांत दिसते. या अवस्थेतील मुलांची वागणूक कित्येक वेळा उच्छृंखल, तर कित्येक वेळा अगदी समजुतदारपणाची दिसते म्हणून तारुण्यावस्थेच्या उंबरठ्यावरील ही अवस्था अत्यंत महत्त्वाची ठरते.

या अवस्थेची कालमर्यादा काटेकोरपणे सांगणे कठीण आहे. सर्वसामान्यपणे दहाव्या वर्षांपासून तो सोळा ते अठरा वर्षांपर्यंत ती मानण्यात येते. तथापि संमिश्र समाजांबाबत ती बारा-तेरा वर्षांपासून तो एकवीस-बावीस वर्षांपर्यंत असल्याचेही मत सर्वसामान्यपणे प्रतिपादिले जाते.

किशोरावस्थेचा एकूण कालविस्तार सामाजिक-सांस्कृतिक भिन्नतेवर आणि मुलांच्या आईवडिलांशी असलेल्या मनोभावात्मक संबंधांवर अवलंबून असतो. आधुनिक समाजात शिक्षणाची कालमर्यादा बरीच वाढलेली असून ह्या कालखंडात बहुतेक मुले परावलंबी असतात. त्या प्रमाणात त्यांचा किशोरावस्थाकालही वाढतो. लहान मुलाप्रमाणे आई-वडिलांवर अवलंबून असणे आणि परस्परावलंबी पण स्वतंत्र व्यक्तिमत्त्व प्रस्थापित करणे ह्यांच्या मधला काळ म्हणजे किशोरावस्था होय.

किशोरावस्थेत अंतःस्रावी ग्रंथींच्या ज्यांचा स्राव रक्तात सुरळ मिसळतो अशा वाहिनीरहित ग्रंथींच्या कार्यक्षमतेत होणाऱ्या बदलांमुळे स्थित्यंतरे दिसतात. त्यांची विभागणी पुढीलप्रमाणे करता येईल : (१) शारीरिक वाढ, (२) बौद्धिक वाढ, (३) आत्मप्रत्यय, (४) मानसिक व मनोभावात्मक अनुभूती, (५) व्यावसायिक मार्गदर्शन आणि (६) सामाजिक व नैतिक संस्कार.

शारीरिक वाढ : सु. आठव्या वर्षापर्यंत मुलांमुलींच्या शारीरिक वाढीत फारसा फरक पडत नाही. त्यानंतर मात्र तो प्रकर्षाने पडतो. मुलांची वाढ अकरा ते सोळाव्या वर्षापर्यंत झपाट्याने होते. काही महिन्यांतच त्यांची उंची एकदम वाढते.  दाढी-मिशांची लव फुटू लागते. गुह्य भागावर, काखेत, छातीवर वगैरे ठिकाणीही केस येऊ लागतात. आवाज फुटतो, शुक्रजनन होऊ रेतस्खलनक्षमता येते. मुलींच्या शरीराची वाढ यापेक्षा लवकर म्हणजे आठव्या वर्षांपासूनच होते. त्यांच्या नितंबभागात आणि स्तनभागांत वसा (चरबी) साठू लागून त्यांना गोलाई येते,  स्तनाग्रांची वाढ होते. सु. बारा ते सोळा वर्षांपर्यंतच्या काळात रजोदर्शन होते.

दोघांमध्ये चेहऱ्यावर तारुण्यपिटिका दिसू लागतात. त्या मुलांपेक्षा मुलींत जास्त प्रमाणात दिसतात आणि त्यामुळे चेहरा थोडा आकसल्यासारखा होऊन मुलींमध्ये एक तर्‍हेचा न्यूनगंड उत्पन्न होतो. ही शारीरिक लक्षणे `लैंगिक उपलक्षणे’ या सदरात मोडतात.

वर वर्णन केलेल्या शारीरिक वाढीचा वेग मधूनमधून कमीअधिक होतो. वंश, हवामान, आहार वगैरे कारणांमुळेही शारीरिक वाढ पुढेमागे होते. विशिष्ट वंशात, उष्ण हवामानात तसेच आहारात भरपूर प्रथिने असल्यास, ही वाढ लवकर होते असे म्हणतात.  तरीही एकूण दोन-तीन वर्षांपेक्षा त्यात विशेष फरक पडत नाही.

झपाट्याने घडणाऱ्या या शारीरिक बदलांमुळे मुले गोंधळून जातात. ऋतुप्राप्ती, झोपेत रेतस्खलन इ. वस्तुतः नैसर्गिक गोष्टींमुळे त्यांना अकारण चिंता वाटू लागते व तर्‍हेतर्‍हेचे प्रश्न त्यांना भेडसावतात. ह्या प्रश्नांची योग्य उत्तरे त्यांना मिळाली, तर शारीरिक बदलांबद्‌दलची त्यांची भीती नष्ट होते व हे बदल तारुण्याकडे नेणारे आहेत ह्याची खूणगाठ त्यांना पटते. शारीरिक बदलांचा दुसरा एक परिणाम असा की, स्वतःच्या शरीराबाबत त्यांना विशेष कुतूहल वाटू लागून स्वतःची तुलना ते इतरांशी करू लागतात. सामान्यतः मुलांमध्ये धडाडी, पौरुष, आडदांडपणा ह्या गोष्टींचे कौतुक होते तर मुलींमध्ये डौलदारपणा, नाजुकपणा इ. गोष्टींना महत्त्व दिले जाते. अशा तर्‍हेच्या आदर्शांमध्ये आपण कमी पडतो असे दिसले, तर इतर गुण अंगी असूनही मुलामुलींना खंत वाटू लागते. तसेच नटणे-मुरडणे, चांगला पोशाख, दागदागिने वापरणे वगैरे प्रवृत्तीही याच वेळी जागृत होतात. ही प्रवृत्ती मुलांपेक्षा मुलींमध्ये अधिक आढळते.

  

बौद्धिक वाढ : बुद्धिमत्ता ही उपजत देणगी आहे. त्यामुळे मुळातच ती कमी असेल, तर ती उणीव भरून काढता येत नाही. तरीही शिक्षणाने व परिश्रमाने तिला प्रगल्मता येऊ शकते. शारीरिक वाढ व बौद्धिक विकास हे एकाच वेळी एकाच वेगाने होत नाहीत. शालेय शिक्षणात अनेक नवीन नवीन विषय शिकविले जात असल्यामुळे किशोरांची आवड, ग्रहणशक्ती व बुद्धीची झेप यांबद्‌दल काही निश्चित अंदाज करता येतो. परिस्थितीचे दडपण पडल्यास बौद्धिक विकास मंदावतो. म्हणून असे परिस्थितिजन्य दडपण दूर करण्यास शिक्षक व पालक यांच्यामध्ये विचारविनिमय होणे फार जरूरीचे असते [→ बुद्धिमत्ता].

आत्मप्रत्यय : समवयस्कांच्या संगतीमुळे व त्यांच्याशी चाललेल्या स्पर्धेमुळे किशोराला स्वसामर्थ्यांचा प्रत्यय येतो. जास्त मन लावून काम केल्यास यश मिळते, असे दिसल्यास आत्मविश्वास वाढतो. याचा अप्रत्यक्ष परिणाम म्हणजे मातापित्यांचे नियंत्रण त्यांना नकोसे वाटू लागते.

मुलांना मुलींचे व मुलींना मुलांचे आकर्षण वाटू लागून त्यांची मैत्री होऊ शकते.  म्हणून याच वेळी त्यांना योग्य ते मार्गदर्शन व जरूर ते लैंगिक शिक्षण देणे इष्ट असते.  या दृष्टीने किशोरांवर लक्ष ठेवणे फार आगत्याचे असले, तरी `आपल्या स्वातंत्र्यावर नियंत्रण येते’ असे त्यांना वाटू देता कामा नये. किन्से यांच्या अहवालानुसार मुलींमध्ये लैंगिक समागमाची प्रेरणा तीव्र आणि केंद्रित नसते सौम्य व विखुरलेली असते. लैंगिक ताण नाहीसा करण्याच्या मार्गावर सामाजिक स्वरूपाचे निर्बंध असतात तसेच स्वतः व्यक्तीचेही मानसिक स्वरूपाचे काही निर्बंध असतात [→ लैंगिक शिक्षण].

मानसिक व मनोभावात्मक अनुभूती : आपल्याला प्रौढाप्रमाणे वागणूक मिळावी असे मुलांना या अवस्थेत वाटते, पण त्याबरोबरच इतरांनी आपली काळजी घ्यावी असेही वाटते. ह्या दोन परस्परविरूद्ध मनोभावांमधील आंदोलनांमुळे कधी त्यांचे वर्तन बेछूट होते, तर कधी ती कृतकृत्यांचा पश्चाताप करू लागतात. ह्या संघर्षातून मार्ग काढताना बरेचजण एकाकी राहू लागतात. सुज्ञ पालक त्यांची ही स्वातंत्र्याची गरज ओळखतात व त्याबरोबरच त्यांच्यावर योग्य ते नियंत्रणही ठेवू शकतात. मुलांनाही अनिर्बंध स्वातंत्र्य भयावह वाटत असतेच. कारण आईवडिलांच्या संरक्षणछत्राची त्यांना आत्मविश्वास नसतो. आपल्याबद्‌दल इतरांचे मत चांगले असावे असेही त्यांना वाटते.  वडील मंडळींचे मुलांशी सौहार्दयुक्त संबंध असले, तर तारुण्याकडे त्यांची वाटचाल बऱ्याच अंशी सुकर होते.

हे वय संस्कारक्षम असल्यामुळे या वेळी आदर्श व्यक्तींची चरित्रे, देशभक्तीसारखी भावना प्रज्वलित करणारे व सद्‌गुणांचा संस्कार घडविणारे वाङ्‌मय किशोरांना सहज उपलब्ध करून दिले पाहिजे. याच वयात वाईट संगत लागल्यास वाईट सवयी आणि व्यसने लागण्याचा संभव असतो, म्हणून त्यासंबंधीही लक्ष देऊन योग्य सवयी लावणे हे शिक्षक-पालकांचे कर्तव्य ठरते.


व्यावसायिक मार्गदर्शन : किशोरावस्थतेतील विकासावरून मुलांनी पुढील जीवनात कोणता व्यवसाय पतकरणे हितावह ठरेल, याबद्‌दल कल्पना येऊ शकते आणि म्हणूनच त्यादृष्टीने किशोरांना त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करणे जरूर असते. त्याची आवड, त्याला कोणत्या विषयांत विशेष गोडी आहे, हस्तकौशल्य कोणत्या बाबतीत दिसते वगैरे गोष्टी विचारात घेऊन योग्य ते मार्गदर्शन करावे. पण यांसंबंधी कोणतीही घाई न करता मुलाला नुसती दिशा दाखवून त्याला प्रत्यक्ष अनुभवाने काय जमते तोच व्यवसाय निवडणे योग्य होय. याकरिता पालक-शिक्षकांनी विचारविनिमय करून किशोराला मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक असते.

सामाजिक व नैतिक संस्कार : किशोरावस्थेत मुलांची वागणूक कित्येक वेळा बेजबाबदारपणाची वाटते पण पुढे मात्र सर्व कामे मन लावून व आस्थेने ती करीत असतात. म्हणून अशा बेजबाबदार दिसणाऱ्या वागणुकीसंबंधी त्यांच्याशी चर्चा करून त्यांना चूक पटवून द्यावी, त्याकरिता शिक्षा करणे योग्य नाही. बारीकसारीक गोष्टींकडे दुर्लक्ष करून महत्त्वाच्या बाबतींत मात्र निर्धाराने कठोर भूमिका ध्यावी. या वयात सर्वांत जास्त परिणामकारक गोष्ट म्हणजे खुद्द शिक्षकाची व पालकाची वागणूक. ती नैतिक व सामाजिक दृष्ट्या योग्य असेल, तर तिचा जितका सदुपयोग होईल तितका दुसऱ्या कशाचाही होत नाही म्हणून किशोरासमोर आपल्या स्वतःच्या सामाजिक आणि नैतिक वागणुकीचा आदर्श ठेवणे, हेच अधिक परिणामकारक ठरते.

किशोरावस्थेचा कालखंड मुलामुलींच्या जीवनात झंझावाताचा, अस्थिरतेचा व संघर्षाचा समजला जातो. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने, अंतर्मुख चिंतन, आत्मटीका व आत्मवर्चस्व, अविश्वास, अनुकरणप्रियता, नाटकीपणा, विसंगत वर्तन, स्थलकालाचे भान नसणे, मनोभावांची लवचिकता अशी किशोरावस्थेची काही खास वैशिष्ट्ये ग्रॅन्व्हिल स्टॅन्ली हॉल यांनी नमूद केली आहेत. मर्गारेट मीड यांच्या संशोधनानुसार ही वर्तनवैशिष्ट्ये व तदंगभूत संघर्ष विशिष्ट सामाजिक संस्कृतीतून उद्‌भवतात केवळ शारीरिक बदलांमधून ते संघर्ष अपरिहार्यतः निर्माण होतात, असे समजणे चूक होय. आपल्याकडून काय अपेक्षित आहे, ह्याची स्पष्ट जाणीव ज्या समाजातील किशोरांना असते आणि तारुण्याकडे संक्रमण होत असताना ज्यांना एकाकीपणा जाणवत नाही, त्या समाजातील मुलांना किशोरावस्थेचा ताण फारसा जाणवत नाही.  आधुनिक समाजातील मुलांना तो जाणवतो कारण एकाच वेळी त्यांना समाजाचे जबाबदार घटक समजले जाते आणि त्याबरोबरच त्यांच्या अननुभवीपणाचाही उल्लेख केला जात असतो. अस्थिर सामाजिक दर्जातून त्यांच्या जीवनात अनेक संघर्ष व अनेक समस्या निर्माण होतात.

संदर्भ : 1.Ausubel, D.P.Theory and Problems of Adolescent Development, Philadelphia, 1954.

2. Jersild, A.T.The Psychology of Adolescence,New York, 1963.

3. Kuhlen, R.G. The Psychology of Adolescent Development, New York, 1961.

4. Muuss, R.E. Theories of Adolescence, New York, 1962.

ढमढेरे, वा. रा. पंडित, र. वि.