किशनगढ : राजस्थान राज्याच्या अजमीर जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळ आणि किशनगढ चित्रशैलीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण. लोकसंख्या ३७,४०५ (१९७१). हे पूर्वीच्या किशनगढ संस्थानच्या राजधानीचे ठिकाण होय. १६११ मध्ये किशनसिंगाने शहर वसविले आणि त्याच्या नावावरूनच शहरास हे नाव मिळाले. अजमीरच्या २९ किमी. ईशान्येस हे असून ज्वारी, बार्ली, तेलबिया, कापूस, कापड यांचा व्यापार या ठिकाणी चालतो. शहरात साबण, कापड, गरम कापड, सतरंज्या आणि शाली इत्यादींचे उद्योग आहेत. शहराच्या आसमंतात संगमरवर, अभ्रक आणि बांधकामाचा दगड यांच्या खाणी आहेत.
शाह, र. रू.