किर्केगॉर, सरेन : (५ मे १८१३—११ नोव्हेंबर १८५५). हा डॅनिश धर्मविषयक तत्त्वचिंतक, डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे एका सधन कुटुंबात जन्मला व त्याचे सर्व आयुष्य तेथेच गेले. १८४० साली त्याने धर्मशास्त्रातील पारंगतता प्राप्त केली आणि पुढील वर्षी ऑन द कन्सेप्ट ऑफ आयरनी हा प्रबंध लिहून संशोधन – पदवी मिळविली. वडिलांनी पुष्कळ संपत्ती मागे ठेवली असल्यामुळे पदव्यांच्या बळावर त्याने नोकरी मिळविण्याचा प्रयत्न केला नाही.
आधुनिक तत्त्वज्ञानातील अस्तित्ववाद या विचारधारेचा तो आद्य प्रवर्तक मानला जातो. त्याचे सगळे तत्त्वचिंतन त्याच्या धार्मिक अनुभवांतून स्फुरलेले आहे. केवळ तात्त्विक समस्यांवरील निबंध असे त्याच्या लिखाणाचे स्वरूप नाही. कथा, कादंबरी उत्तरे देण्याच्या माध्यमांतून तसेच वैयक्तिक जीवनातील प्रश्नांची उत्तरे देण्याच्या प्रयत्नांतूनही त्याच्या तत्त्वज्ञानाने आकार घेतलेला आहे. त्या सर्वांतून त्याने धार्मिक मूल्यांचेच प्रतिपादन व पुरस्कार केला आहे. धर्मजीवनाचा वारसा अंशतः त्याच्या वडिलांकडून आला होता. आयुष्यात घडलेल्या काही प्रसंगांमुळे ख्रिस्ती धर्मातील पापकल्पनेचा पगडा त्याच्या मनावर फार बसला होता. मृत्यूपूर्वी आपल्या पापांचा पाढा मुलांपुढे वाचून त्याचे प्रायश्चित्त मुलास घ्यावे लागेल असे त्याने सांगितले होते. पापाची ही कल्पना सरेनच्या मनात खोल घर करून राहिली. याच सुमारास (१८४०) रेजीना ओल्सेन या १८ वर्षांच्या कुलीन व सुंदर तरूणीशी त्याचा प्रेमसंबंध जुळून येऊन वाङ्निश्चयही झाला होता पण आपल्या जीवनात घडलेल्या परिवर्तनामुळे तिचे आयुष्य दुःखी होईल असे लक्षात येऊन, त्याने ठरलेले लग्न मोडले. जीवनातील असल्या घटनांनी त्याच्या अंतर्मनात जी वादळे उठली, वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे देण्याचा त्याने जो निकराने प्रयत्न केला, त्यांना त्याच्या प्रतिभेमुळे वैश्विक स्वरूप मिळून, अस्तित्ववादी विचारपद्धतीचा पाया घातला गेला.
जीवनातील सत्य हे व्यक्तीच्या स्वतःच्या अस्तित्वाच्या तीव्र प्रत्ययात आहे, असे किर्केगॉरचे म्हणणे आहे. येथे ‘सत्य’ या अर्थ ज्याच्या आधाराने आणि ज्याच्यासाठी आपण जगतो ते, असा घ्यावयाचा. जेव्हा सर्व बुरखे फेकून देऊन व्यक्ती स्वतःच्या स्वत्वाशी अत्यंत इमानदारी राखून जगते, तेव्हा स्वतःच्या अस्तित्वाचा प्रत्यय येतो. एखाद्या बाह्य विषयाचा प्रत्यय घ्यावा तसा हा प्रत्यय नसतो. अस्तित्व हे स्वसंवेद्य आहे. विषय या रीतीने त्याचे ज्ञान करून घेऊ गेल्यास, सत्य उडून जाते आणि आभास उरतो. स्वतःने स्वतःशी असणे, एकलेपणाने असणे, म्हणजे अस्तित्व. आत्मनिरतता हेच परमसत्य होय.
दगड ज्याप्रमाणे अमुक अमुक गुणधर्मांनी युक्त असा कुठलाही एक पदार्थ, त्याप्रमाणे या ठिकाणाचा ‘स्व’ अथवा आत्मा अथवा व्यक्ती म्हणजे अमुक अमुक गुणधर्मांनी युक्त असलेला कोणी तरी एक, असा अर्थ नव्हे. व्यक्तित्वाला सामान्याच्या सदरात घालता येणार नाही. इतिहासाच्या प्रवाहातील नामरूपहीन, पण अस्तित्वाच्या आशयाने भारलेला तो एक बिंदू असतो. व्यक्तिचे अस्तित्व हे कशासाठी तरी निर्धाराने जगण्यात म्हणजे बांधीलकीने युक्त (कमिटमेंट) असते. दर क्षणी व्यक्ती आपल्या उभ्या आयुष्याची निवड स्वतंत्रपणे करीत असते. या स्वातंत्र्यामुळे तिच्यावर प्रचंड जबाबदारी येऊन पडलेली असते. त्यातून वैश्विक स्वरूपाचे भय वा विभीषणा (ड्रेड) आणि चिंताकुलता किंवा परिवेदना (आंग्स्ट) ह्याही अस्तित्वाच्या अनुभवाचा भाग होऊन बसतात.
एका बाजूस स्वतःच्या अस्तित्वाचा अव्याख्येय अनुभव व दुसऱ्या बाजूस तोच `स्व’ अमुक अमुक धर्मांनी युक्त असलेला एक ज्ञानविषय म्हणून भासणे, यांतून जो तणाव निर्माण होतो त्यातून जीवनातील मूलभूत व्यस्तता वा मृषात्व (ऍब्सर्डिटी) निर्माण होते. कालातीत ईश्वर ख्रिस्तरूपाने अमुक काळी जन्माला येणे, हे त्या मूलभूत व्यस्ततेचेच एक रूप आहे. आपल्या सर्जनशील अस्तित्वाची जाणीव तीव्रतर होऊ लागली, म्हणजे जीवनातील व्यस्तता अधिकाधिक भेडसावते व त्यातून खऱ्या धर्मभावनेचा उदय होतो. विज्ञानातील ज्ञान हे विषयनिष्ठ असल्याने त्यातून धार्मिक मूल्यांचा प्रत्यय येणारच नाही. धर्मजीवन हे आत्यंतिकपणे आत्मनिरत असते. धार्मिक चेतावणी व्यक्तित्वाची प्रेरक असून, तिच्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि परिपोष होतो.
किर्केगॉरचे लेखन डॅनिशमध्ये असून त्याच्या महत्त्वाच्या ग्रंथांची इंग्रजी भाषांतरेही झालेली आहेत. ईदर ऑर (१८४३), स्टेजेस ऑन लाइस वे (१८४५) या दोन तात्त्विक कादंबऱ्यात एकापरीने त्याने व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचे टप्पे निरनिराळया पात्रांद्वारे वर्णिले आहेत. प्रेम, नीती आणि धर्म यांना सामोरे गेले असता, निरनिराळया तऱ्हेच्या व्यक्तींच्या प्रतिक्रिया त्यांत पहावयास मिळतात. व्यक्तिमत्त्वाचे त्याने तीन मुख्य प्रकार कल्पिले आहेत : (१) स्त्रियांना फूस लावणारा जॉन. हा सौंदर्यान्वेषी वृत्तीचा प्रतिनिधी होय. तो सर्वस्वी आत्मकेंद्री असून कर्तव्य ही गोष्टच जाणत नाही. तो अनेक स्त्रियांचा उपभोग घेतो आणि प्रत्येक क्षणाचे सुख चाखू पाहतो. (२) न्यायाधीश व्हिल्हेल्म हा नैतिक वृत्तीचा प्रतिनिधी आहे. त्याला विवाह, मैत्री, जीवनातील कष्ट ही सर्व पाहिजे असतात. कर्तव्यभावनेने तो भारलेला आहे. (३) तिसऱ्या म्हणजे धार्मिक वृत्तीचा प्रतिनिधी क्किदाम होय. परमेश्वराने भोवती निर्माण केलेल्या परिस्थितीमुळे त्याच्या हातून लौकिक दृष्ट्या पाप घडले, पण त्यामुळे ईश्वराच्या दृष्टीने आपण खरोखर अपराधी ठरतो की काय, या सतत कालावधीत किर्केगॉरने आणखी चार महत्त्वाची पुस्तके प्रसिद्ध केली. रिपिटिशन (१८४३) आणि फिअर अँड ट्रेब्लिंग (१८४३) या पुस्तकांतून आपत्तींमागून आपत्ती धाडून देवाने ज्याची सत्त्वपरीक्षा पाहिली तो जॉब व श्रद्धावंतांचा मेरूमणी अब्राहम या बायबलमधील दोन व्यक्तींचे स्वभावविश्लेषण अतिशय स्पष्टपणे केलेले आहे. कन्सेप्ट ऑफ ड्रेड (१८४४) या पुस्तकात आदम आणि त्याच्या नंतरचा प्रत्येक मानव यांच्या जीवनातील पापांशी होणाऱ्या संग्रामाचे सुरेख विश्र्लेषण आहे. या पुस्तकातील मानसशास्त्रीय मर्मदृष्टीमुळे तत्त्वज्ञानाच्या प्रांतात नव्या वाटा फुटल्या. फिलॉसॉफिकल फ्रॅग्मेंटिफिक (१८४४) व १८४६ मध्ये प्रसिद्ध झालेला त्याचा कन्क्लूडिंग अन्साइंटिफिक पोस्टस्क्रिप्ट यांमध्ये परमेश्वर ख्रिस्तरूपाने शरीर धारण करतो, या विरोधाभासामुळे व्याकूळ झालेल्या श्रद्धावान माणसाचे चित्रण आहे. मानवरूपातील परमेश्वराचा स्वीकार करण्यास जी श्रद्धा लागते ती चिरंतन कल्याणास आवश्यक आहे, असे प्रतिपादन तेथे आहे. ख्रिस्ताच्या धर्माचा किर्केगॉर एकनिष्ठ पाईक असला, तरी तत्कालीन शिथिल, अप्रामाणिक आणि प्रत्येक मताशी जुळवून घेऊ पाहणाऱ्या ख्रिस्ती धर्मावर त्याने कठोर हल्ले केले. तीव्र दुःखानुभूती हा ख्रिस्ती धर्माचा आवश्यक भाग आहे आणि म्हणून तो हुतात्म्यांचा धर्म आहे, असा प्रचार १८४६ ते ५१ पर्यंत लिहिलेल्या आपल्या पुढील पुस्तकांत त्याने केला आहे : एडिफाइंग डिस्कोर्सेस (१८४७), द सिकनेस अन्टू डेथ (१८४९), द स्कूल ऑफ क्रिश्चॅनिटी आणि फॉर ॲन एक्झॅमिनेशन ऑफ कॉन्शन्स. पंधराव्या शतकातील ख्रिस्ती धर्म आणि स्वतः येशूने पुरस्कारलेला धर्म यांच्यामध्ये प्रचंड दरी आहे, असा उद्घोष करून तो समकालीनांच्या प्रतिक्रियेची वाट पहात राहिला. पण प्रतिक्रिया अशी काहीच झाली नाही. डेन्मार्कमधील धर्मोपदेशक मख्खपणे. शांत राहिले. म्हणून चिडून किर्केगॉरने तात्त्विक चर्चा सोडून ‘प्रॉटेस्टंट धर्मप्रचारक सत्याला ग्वाही न राहता केवळ पोटभरू धंदेवाईक झाले आहेत’, असा प्रचार अनेक पुस्तिकांतून आणि द मोमेंट या आपल्या नियतकालिकातून केला. या झगडयात तो खूप दमून गेला.
किर्केगॉरची बरीचशी पुस्तके आणि वर्तमानपत्रातील उतारे इंग्रजी, जर्मन आणि फ्रेंच या भाषांतून भाषांतरित झाली आहेत. कोपनहेगनमधील ‘किर्केगॉर सोसायटी’मार्फत निघणाऱ्या खास समालोचन पत्रिकेत किर्केगॉरसंबंधी इतरत्र जे जे लिखाण प्रसिद्ध होत असते, त्याचा अद्ययावत आढावा घेलेला असतो.
पहा : अस्तित्ववाद.
संदर्भ : 1. Bretall, R. A Kierkegaard Anthology, Princeton, 1946.
2. Geismar, E. O. Lectures on the Religious Thought of S. Kierkegaard, Minneapolis, 1937.
3. Jolivet, R. Introduction to Kierkegaard, London, 1950.
4. Lowrie, W. A Short Life of Kierkegaard, Princeton, 1942.
यानसेन, एफ्. जे. बिलेस्कॉव्ह (इं.); दीक्षित, मीनाक्षी (म.); जोशी, ना. वि.