किंकर्तव्यमीमांसा : (कॅझ्यूइस्ट्री). नीतिशास्त्रातील तत्त्वांची चिकित्सा करून आयुष्यातील विशिष्ट प्रसंगी कृतीसंबंधी काही निर्णय ठरविण्याची पद्धती अथवा तंत्र म्हणजे किंकर्तव्यमीमांसा.

सुजाण यूरोपीय लोकमानसात या मीमांसेबद्दल काहीसा तिरस्कार अनेकदा आढळून येतो. त्याचे कारण ऐतिहासिक आहे. रोमन कॅथलिक धर्मगुरूंनी आणि विशेषत: त्यांतील जेझुइट पंथीयांनी या तंत्राचा दुरुपयोग केला. क्षम्य पापे आणि अक्षम्य पापे असे जे पापांचे प्रकार ख्रिस्ती धर्मात केले आहेत, त्यांतील अक्षम्य पापे परिस्थित्यनुसार क्षम्य वर्गात ढकलण्यासाठी खूप शाब्दिक लटपट केली गेली एकदा ती क्षम्य ठरली, की पापनिवेदन स्वीकारतेवेळी धर्मगुरूंमार्फत त्यांचे क्षालन करणे शक्य होई परिणामत: नीतिबंधने शिथिल झाली कोणत्याही गोष्टीचे समर्थन करता येऊ लागले, अशी अनेकांची समजूत आहे.

या मीमांसेचा दुरुपयोग केला जाण्याची शक्यता असली, तरी एवढ्यावरून नैतिक प्रमेयांची चिकित्सा करून विशिष्ट प्रसंगी मानवी कृतीच्या योग्यायोग्यतेचा निर्णय करण्यात तत्त्वत: काही चूक आहे, असे ठरत नाही. या संदर्भात दोन प्रश्न उपस्थित होतात : (१) जीवनातील विशिष्ट प्रसंगी विविध नैतिक उपपत्तींपासून मार्गदर्शन मिळविणे शक्य आहे काय ? (२) नीतिशास्त्राचा या तऱ्हेने उपयोग होऊ शकला, तरी तसा तो करून घेणे इष्ट आहे काय ? नैतिक दृष्ट्या समर्थनीय आहे काय ?

काही तत्त्वचिंतक पहिल्या प्रश्नास नकारार्थी उत्तर देतात. एफ्. एच्. ब्रॅड्ली याचे असे म्हणणे आहे, की तर्कशास्त्राच्या परिशीलनाने ज्याप्रमाणे युक्तिवाद करण्यातील कौशल्य प्राप्त होणार नाही, त्याप्रमाणे नीतिशास्त्राचाही व्यावहारिक उपयोग होणार नाही. शास्त्र म्हटल्यावर त्यात मूलभूत सामान्य प्रश्नांची चर्चा असते. विशिष्ट प्रसंगी योग्य ती कृती करण्याचे कौशल्य, ही त्याहून सर्वस्वी अलग गोष्ट आहे तत्त्वचर्चेपासून ते निष्पन्न होणार नाही. ब्रॅड्लीचा हा आक्षेप बिनतोड नाही. व्यावहारिक उपयोगिता हे तात्त्विक चर्चेचे साक्षात फल नसले, तरी अवांतर फल आहेच. तार्किक सुसंगती म्हणजे काय, याचा ऊहापोह करणाऱ्या व्यक्तीकडून स्वत:च्या युक्तिवादात ती संगती आपापत:च थोडीबहुत पाळली जाईल. नीतिशास्त्र तर साक्षात आचारासंबंधीचे शास्त्र. त्यामुळे दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग होणे सहजच शक्य आहे. किंकर्तव्यमीमांसेसंबंधी दुसरा एक आक्षेप असा, की आयुष्यातील कसोटीच्या प्रसंगी अडचण भासते, ती नैतिक साध्य कोणते याविषयी नसून, त्याच्या साधनासंबंधी असते. कोणते साधन उपयुक्त ठरेल, हा प्रश्न नीतिशास्त्राचा नसून भौतिक शास्त्राचा किंवा व्यावहारिक असतो. त्यासंबंधी योग्य तो सल्ला त्या त्या क्षेत्रातील तज्ञांकडून मिळविणे योग्यच होईल. आरोग्य हे नैतिक साध्य ठरल्यास, ते कसे मिळवावयाचे हा प्रश्न वैद्यकशास्त्राच्या कक्षेतील ठरतो. या आक्षेपास उत्तर असे, की नैतिक दृष्ट्या साध्य व साधन ही एकमेकांपासून अलग नसतात. बहुतेक वेळा साधन हे साध्याचे घटक असते. आपल्या कोणत्याही कृतीने मूल्यांचा (साध्यांचा) एक आकृतिबंध तयार होत असतो. असल्या अनेक आकृतिबंधांपैकी कोणत्या एकाची निवड करावी, हा प्रश्न नैतिकच आहे. याच अभिप्रायाने जी. ई. मुर या तत्त्वचिंतकाने म्हटले आहे, की किंकर्तव्यमीमांसेची तपशीलवार मांडणी करणे, हे नीतिशास्त्राचे अंतिम उद्दिष्ट असले पाहिजे. या मीमांसेसंबंधी तिसरा आक्षेप असा घेतला जातो, की व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग अत्यंत विशिष्ट, अत्यंत विलक्षण असा असतो. तंतोतंत तसाच प्रसंग त्या व्यक्तीच्या अथवा इतरांच्या आयुष्यात कधीच येत नाही. विशिष्ट प्रसंगी योग्य कृती कोणती आणि अयोग्य कोणती, हे नैतिक मर्मदृष्टीने अथवा अंत:प्रज्ञेने ठरविता येईल. पण अशा प्रकारच्या निर्णयातून सामान्यत: उपयोगी पडणारे नियम, म्हणजे किंकर्तव्यमीमांसा, निर्माण करता येणार नाही. एका प्रसंगी जी कृती योग्य, ती सकृद्दर्शनी तशाच दिसणाऱ्या दुसऱ्या प्रसंगीही योग्य ठरेलच असे नाही. या आक्षेपास असे उत्तर दिले जाते, की जरी जीवनातील कोणताही एक प्रसंग सर्वस्वी दुसऱ्या एखाद्या प्रसंगासारखाच असत नाही, तरी महत्त्वाच्या बाबतीत पुरेसे साम्य असणारे दोन प्रसंग असू शकतात. कोणत्याही रोगाची एखाद्या व्यक्तीला होणारी भावना ही तोच रोग दुसऱ्या व्यक्तीला झाला, तरी तंतोतंत सारखी असत नाही. तरीसुद्धा रोगनिवारणाचे सर्वसामान्य नियम वैद्यकशास्त्रात असतातच.

अशा रीतीने किंकर्तव्यमीमांसा ही एक शक्य गोष्ट आहे असे दाखविता आले, तरी वर उपस्थित केलेला दुसरा प्रश्न म्हणजे हर घटकेला किंकर्तव्यमीमांसेकडून मार्गदर्शन मिळवून जीवनात मार्गक्रमण करणे इष्ट आहे काय, हा बाकी राहतोच. ब्रॅड्लीने त्यालाही नकारार्थी उत्तर दिले आहे. दर खेपेस आपली कृती नैतिक आहे की अनैतिक आहे, अशा विचारांचा घोळ घालत बसण्यात मनाचा रोगटपणा आहे, असे त्याचे म्हणणे आहे. बहिर्मुख होऊन वस्तुनिष्ठ व्यापक ध्येयांचा पाठलाग करण्यातच नीतीची निरोगिता आहे. एकसारखे अंतर्मुख होऊन ‘मी पाप तर करीत नाही ना’, अशी शंका घेऊन कुढत बसण्यात पुरुषार्थ नाही. किंकर्तव्यमीमांसा नीतीला नि:सत्त्व बनवते. या आक्षेपात तथ्य आहे पण ऐकांतिकपणे तो स्वीकारता येत नाही. स्थूल मानाने पाहता निरोगी सहजप्रेरणा हीच आयुष्यात मार्गदर्शक असावी. पण ती खरोखर निरोगी राहण्यासाठी अधून मधून तिला किंकर्तव्यमीमांसेची टोचणी असणे इष्ट ठरते.

पहा : नीतिशास्त्र.

दीक्षित, श्री. ह.