कवड्या साप : या बिनविषारी सापाचा कोल्युब्रिडी सर्पकुलाच्या कोल्युब्रिनी या उपकुलात समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव लायकोडॉन ऑलिक्स आहे. हा भारतात आणि श्रीलंकेमध्ये सगळीकडे आढळतो शिवाय अंदमान, मलाया, इंडोचायना आणि फिलिपीन्स बेटांतही तो सापडतो. सपाट प्रदेशांत तो सगळीकडे आढळत असला तरी ६१० मी. पेक्षा जास्त उंचीवर सापडत नाही.
घराभोवतालच्या आवारात किंवा बागेत, खुद्द घरात व गुरांच्या गोठ्यात तो पुष्कळदा दृष्टीस पडतो बाजार वगैरे दाट वस्तीच्या जागीही तो आढळतो. हा साप रात्रिंचर असल्यामुळे दिवसा एखाद्या आडोशाच्या जागी – पडीक भिंतीतल्या भेगा, दगड आणि विटा यांचे ढीग, गोठ्यातील चाऱ्याचे ढिगारे, जमिनीतली बिळे इत्यादींमध्ये-लपून बसतो आणि रात्री भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतो. उंदीर, सरडे, पाली इत्यादींवर हा आपली उपजीविका करतो.
याची लांबी सु. ६०-७५ सेंमी असते. शरीर सडपातळ आणि किंचित चपटे असून शेपूट निमुळते व काहीसे आखूड असते. नमुनेदार कवड्या सापाचा रंग तपकिरी-फिक्कट तपकिरी रंगापासून तो गर्द तपकिरी रंगापर्यंत असतो. क्वचित काळ्या रंगाचा एखादा साप आढळतो. पाठीवर पांढुरक्या किंवा पिवळसर पांढऱ्या रंगाचे आडवे पट्टे असतात. मानेभोवती याच रंगाचे वलय असते. आडवे पट्टे डोक्याजवळ सुरू होतात पुढच्या भागात ते अगदी स्पष्ट असतात, पण मागच्या बाजूकडे क्रमाक्रमाने अस्पष्ट होत जाऊन शेपटीच्या टोकाकडे ते पूर्णपणे नाहीसे होतात. बहुतेक नमुन्यांत पट्ट्यांची संख्या ९ ते १८ असते कधीकधी ही संख्या यांपेक्षाही कमी असू शकते, पण अजिबात पट्टे नाहीत असे सहसा होत नाही. पोटाचा रंग पांढरा किंवा किंचित पिवळसर असतो.
खालच्या व वरच्या जबड्यांवरील पुढचे दात बरेच मोठे असतात. वरचा ओठ पांढरा किंवा त्यावर तपकिरी ठिपके असतात डोळे काळेभोर आणि बाहुली उभी असते.
हा अतिशय चपळ असून झाडांवर व इतर उंच ठिकाणी सहज चढून जातो. हा साप माणसाच्या दृष्टीस पडल्यास बहुधा निसटून जाण्याचा प्रयत्न करतो पण त्याला अडथळा केला किंवा पकडण्याचा प्रयत्न केला, तर तो उग्र स्वरूप धारण करून अत्यंत धीटपणे प्रहार करतो व कडकडून चावतो. पण हा पूर्णपणे बिनविषारी असल्यामुळे याचा दंश घातक नसतो.
या सापाची मादी फेब्रुवारीपासून जुलैपर्यंत केव्हातरी अंडी घालते. एका खेपेला घातलेल्या अंड्यांची संख्या ४ ते ७ असते. अंड्यांतून बाहेर पडणारी पिल्ले १५-१८ सेंमी. लांब असून रंग, शरीरावरील पट्टे इ. बाबतींत हुबेहूब प्रौढांसारखी असतात.
काही लोक या सापाला चुकीने ⇨मण्यार समजतात पण मण्यारीचे पट्टे डोक्याच्या मागे काही अंतरावर सुरू होतात आणि ते शरीराच्या मागच्या भागात ठळक असून शेपटीच्या टोकापर्यंत असतात. शिवाय कवड्या सापाच्या गुदद्वाराचा खवला आणि शेपटीच्या खालचे खवले दुभागलेले असतात, पण मण्यारीत ते सबंध असतात.
कर्वे, ज.नी.