वॉल्टझिया : पुराजीव महाकल्पातील पर्मियन कल्पापासून अलीकडे मध्यजीव महाकल्पातील (सु. २३-९ कोटी वर्षांपूर्वीच्या कालातील) ट्रायसिक कल्पाच्या (सु. २३-२० कोटी वर्षांपूर्वीच्या कालाच्या) शेवटापर्यंत आढळणारा एक विलुप्त शंकुमंत वंश. कॉनिफेरेलीझ गणातील ऍरॉकॅरिएसी (ऍरॉकॅरिया) व पायनेसी (पाइन) या दोन्ही कुलांतील जातींशी या वंशाचे साम्य आढळते, तथापि यांचा समावेश वॉल्टझिएसी या स्वतंत्र कुलात करण्यात आला आहे. शरीराकृती, पानांचा आकार व सर्पिल मांडणी आणि काष्ठरचना इ. लक्षणांत ऍरॉकॅरिएसीशी साम्य आहे. मध्यजीव महाकल्पात हे कुल दोन्ही गोलार्धात भरपूर पसरलेले होते. पण हल्ली फक्त दक्षिण गोलार्धात आढळते. वॉल्टझियाच्या शंकूतील शल्क पायनेसी कुलातल्या काही जातींप्रमाणे असतात. परंतु शंकु-शल्कावर तीन बीजे धारण करण्याचे वॉल्टझियाचे लक्षण सर्व विद्यमान शंकुमतांत कोणत्याही जातीत आढळत नाही. ब्रिटिश ट्रायासिक वनस्पतींची माहिती १९१० मध्ये एल्. जे. विल्सन यांनी प्रसिद्ध केली तीमध्ये ब्रोम्सग्रोव्ह खालच्या क्यूपर थरात वॉल्टझिया हेटेरोफिलाचा व एक्किसीटाइट्स यांच्या दोन जातींचा [“एक्किसीटेलीझ] उल्लेख आहे.

 

पहा : ऍरॉकॅरिया आभाळ कौरी गिंकोएलीझ जूनिपर थुजा देवदार पाइन पुरावनस्पतिविज्ञान पोडोकार्प फर रेडवुड लार्च वनस्पति प्रकटबीज उपविभाग सीडार सीडार स्प्रूस हेमलॉक.

 

परांडेकर, शं. आ.

 

संदर्भ : 1. Andrews, H. N. Studies in Palaeobotany, New York, 1967.

2. Arnold, C. A. An Introduction to Palaeobotony, New York, 1947.

3. Neaverson, E. Stratigraphical Palaeobotny, Oxford, 1962.