कॉन्स्टेबल, जॉन : (११ जून १७७६–३१ मार्च १८३७). एक प्रसिद्ध इंग्रज निसर्गचित्रकार. ईस्ट बर्गहोल्ट, सफक येथे जन्म. लंडनच्या रॉयल अकॅडमीत शिक्षण. तदनंतर तेथेच स्थायिक. सफकच्या निसर्गदृश्यांनी आपणास चित्रकार बनवले असे त्याने नमूद केले आहे.
१८०२ मध्ये त्याने सफकविषयक चित्रांचे पहिले प्रदर्शन भरवले. हॅम्पस्टेड येथे त्याने ढगांच्या विविध आकारांचा खास अभ्यास केला व ते त्याच्या निसर्गचित्रांचे एक लक्षणीय वैशिष्ट्य ठरले. त्याच्या हे वेन (१८२१) या चित्रास ‘पॅरिस सालॉन’ प्रदर्शनात पारितोषिक लाभले. दलाक्र्वा या प्रख्यात फ्रेंच चित्रकारासही त्याच्या चित्रतंत्राचे काही अंशी अनुकरण करण्याचा मोह आवरला नाही. त्याच्या चित्रांचा प्रभाव ‘बार्बिझाँ’ संप्रदायावर व अप्रत्यक्षतः एकोणिसाव्या शतकातील फ्रेंच निसर्गचित्रणावर पडला. तसेच त्याच्या आणि त्याचा समकालीन चित्रकार टर्नर याच्या शैलीमुळे तेथे दृक्प्रत्ययवादाची बीजे पेरली गेली. निसर्गचित्रणाच्या त्याच्या नैसर्गिक शैलीमुळे अठराव्या शतकातील नवअभिजाततावादाचे कृत्रिम संकेत मागे पडून स्वच्छंदतावादास जोरदार चालना मिळाली. कॉन्स्टेबलने निसर्गचित्रण ही निसर्गविज्ञानाचीच एक शाखा मानली जावी, असे प्रतिपादन केले. विसाव्या शतकाच्या प्रारंभी त्याची चित्रे आणि कलासिद्धांत यांवर, त्यांचा कल छायाचित्रणात्मक वास्तवतेकडे आहे, अशा स्वरूपाची बरीच टीका झाली. कॉन्स्टेबलच्या प्रख्यात चित्रांत द कॉर्नफील्ड (१८२६), हॅम्पस्टेड हीथ (१८२८), सॉल्झबरी कॅथीड्रल फ्रॉम द मेडोज (१८३१), वॉटर्लू ब्रिजफ्रॉम व्हाइटहॉल स्टेअर्स (१८३२), द व्हॅली फार्म (१८३५) इ. उल्लेखनीय आहेत. त्याला रॉयल अकॅडमी या संस्थेचे संपूर्ण सदस्यत्व १८२९ मध्ये मिळाले. लंडन येथे त्याचे निधन झाले. कॉन्स्टेबलचा पत्रव्यवहार सात खंडांत प्रसिद्ध झाला आहे (१८६२–६७).
संदर्भ : Reynolds, Graham, Constable, The Painter, New York, 1965
इनामदार, श्री. दे.
“