कॉक्लॅं, (बन्वा) काँस्तां : (२३ जानेवारी १८४१ – २७ जानेवारी १९०९). प्रसिद्ध फ्रेंच नट. कॉक्लॅं एने या नावानेही ओळखला जातो. जन्म बोलोन येथे. कॉमेडी फ्राँके या नाट्यसंस्थेत १८६० ते १८८६ या काळात तो होता. रास्तांच्या सिरानो द बर्जेराक् (१८९८) या नाटकातील सिरानोची भूमिका त्याच्या नावाशी कायमची संलग्न झालेली आहे. सेअरा बर्नहार्ट या प्रसिद्ध नटीबरोबर त्याने अनेक नाट्यप्रयोगांत भूमिका केल्या.

 

कॉक्लॅं हा भव्य बांध्याचा, भेदक नजरेचा, सहजगत्या बदलणाऱ्या चेहऱ्याचा आणि गंभीर व आरोहावरोहयुक्त आवाजाचा बहुढंगी नट असून मोल्येर व अन्य नाटककारांच्या नाटकांतील अभिजात विनोदी भूमिका वठविण्यात त्याचा हातखंडा असे. आधुनिक नाटकांतील अक्कडबाज विलासी तरुणांच्या भूमिकाही तो अत्यंत प्रभावी रीतीने वठवीत असे.

 

अभिनय आणि रंगभूमी यांविषयी त्याने लिहिलेल्या पुस्तकांपैकी L’ Art et Le Comedien (१८८०), Les Comediens, par un Comedian (१८८२) ही विशेष उल्लेखनीय होत.

 

काळे, के. ना.