कलकत्ता : पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आणि भारताचे एक मोठे बंदर. लोकसंख्या ३१,४८,७४६ ७४ उपनगरांसह बृहत् कलकत्ता ७०,३१,३८२ (१९७१). बंगालच्या उपसागराच्या उत्तरभागी गंगा नदीच्या हुगळी या मुखप्रवाहाच्या डाव्या तीरावर समुद्रापासून सु. १३८ किमी. आत असून, ते ब्रिटिश अमदानीत १७७३ ते १९११ हिंदुस्थानची व नंतर १९४७ पर्यंत बंगाल इलाख्याची राजधानी होती. आता स्वतंत्र भारतात ती पश्चिम बंगालची राजधानी आहे. बृहत्-कलकत्त्याने १९६० मध्ये सु. २०० चौ. किमी. क्षेत्र व्यापले होते. जुन्या काली मंदिरावरून शहराला हे नाव पडले असावे असा एक तर्क असला, तरी १४९५ मधील एका काव्यात हुगळीच्या तीरावरचे खेडे म्हणून कालिकाटाचा उल्लेख आहे. कमाल सरासरी तपमान २९⋅४० से. व किमान सरासरी २२⋅२० से. असून आर्द्रता प्रमाण ७८% व सरासरी वार्षिक पर्जन्य १५० सेंमी. असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीस व अखेरीस पुष्कळदा येथे जोरदार चक्री वादळे होतात. अशा वादळांनी काही वेळा जबर नुकसान व प्राणहानी झाली आहे. कित्येकदा भूकंपाचे धक्केही येथे बसले आहेत. १८९७ च्या भूकंपाने १,३०० इमारती ढासळल्या होत्या. १९३४ च्या भूकंपामुळेही बरेच नुकसान झाले. १९६१ च्या शिरगणतीत कलकत्त्याची लोकसंख्या २९,२७,२८७ होती. साक्षरतेचे प्रमाण सु. ६०% व काम करणार्यांची संख्या ४२% होती. त्यापैकी कारखान्यांतून व व्यापारात प्रत्येकी चतुर्थांश, वाहतुकीत अष्टमांश व इतर व्यवसाय-उद्योगांत बाकीचे लोक होते. १९७१ मध्ये साक्षर ५७⋅६५ टक्के व कामगार ३२⋅६५ टक्के होते. स्वातंत्र्यपूर्वकालात कलकत्त्यात बाहेरचे लोक स्थानिक लोकांच्या दुप्पट असत, पण फाळणीनंतर पूर्व बंगालमधून आलेले निर्वासित उपनगरांतून स्थायिक झाल्यावर महानगरात बंगाली व इतर साधारण सम प्रमाणात आहेत. येथे बंगाली, हिंदी, ओडिया व इंग्रजी भाषा मुख्यत्वेकरून प्रचलित आहेत.
आजच्या कलकत्त्याची सुरुवात १५३० मध्ये सरस्वती नदीच्या तीरावर सातगाव येथे पोर्तुगीजांनी वखार घातली तेव्हापासून मानता येईल. सोळाव्या शतकात हुगळी या ठिकाणी व्यापारी राहू लागले १६९० मध्ये इंग्रज व्यापारी सुतानाती येथे राहू लागले १६९८ मध्ये त्या खेड्याशिवाय, गोविंदपूर व कालिकाटा ही औरंगजेबाचा मुलगा अझिम याजकडून विकत घेऊन १७०२ साली त्यांनी किल्ला बांधला. १७०७ मध्ये ही वसाहत ईस्ट इंडिया कंपनीकडे आली १७१७ मध्ये बंगालच्या नबाबाचा विरोध असतानाही कंपनीला दिल्लीच्या बादशाहाकडून व्यापारी सवलतीची सनद मिळाली. १७४२ मध्ये मराठ्यांच्या हल्ल्यांच्या भीतीने ‘मराठा डिच’ हा खंदक खणण्यात आला त्या जागीच आता सर्क्युलर रोड आहे. १७५२ मध्ये कलकत्त्याची वस्ती अंदाजे ४ लाख झाली होती अशी नोंद आहे. १७५६ मध्ये कलकत्ता सिराजउद्दौल्याने काबीज केले. तथाकथित अंधार कोठडीत अनेक इंग्रज गुदमरून मेल्याची घटना त्याच वेळची. पुढच्याच वर्षी क्लाइव्हने कलकत्ता परत जिंकून घेतले आणि प्लासीच्या लढाईनंतर मीरजाफ्फरने चोवीस परगण्यांची जमीनदारी आणि भरपूर नुकसानभरपाई यांबरोबर भोवतालच्या खेड्यांसह कलकत्त्याची देणगी कंपनीला बहाल केली. १७७३ मध्ये नवीन जागेवर फोर्ट विल्यम किल्ला बांधून पुरा झाला. कलकत्त्याला १७२७ पासून नगरपालिका होती, तथापि १७८२ मधील मॅकिंटॉशच्या प्रवासवर्णनात भयंकर घाणेरडे शहर असा याचा उल्लेख आहे. कंपनीच्या राज्यकर्त्यांनी वेळोवेळी कसोशीने प्रयत्न करून शहर सुधारण्याचा प्रयत्न केला. पण एकोणिसाव्या शतकाअखेर किपलिंगच्या वर्णनात देखील शहराच्या दुर्गंधीचा निर्देश आहे. शहराचा अवाढव्य विस्तार, सपाटी, सर्व बाजूंनी जलप्रवाहांचा वेढा, वाहतुकीची धांदल, लोकांची दाटी आणि औद्योगिकीकरणाचा वेग या कारणांनी शहर स्वच्छ ठेवणे दुर्धर काम होते. महानगरपालिका १८९९ पासून आहे. मुख्य शहराखेरीज हुगळीच्या पश्चिम तीरावरील हौरा (हावडा) (लोकसंख्या ७,३७,८७७ १९७१) आणि दक्षिण उपनगर गट या वस्तींचा भार नगराच्या सामान्य सुखसोईंवर अपरिहार्यपणे पडत असल्यामुळे कलकत्त्याची नगरव्यवस्था ही एक नेहमीची समस्या आहे. बंदर म्हणून कलकत्त्याचे महत्त्व कायम आहे. देशाच्या व्यापाराचे निम्मे परकीय चलन येथील निर्यातीत मिळते व या बंदराचे उत्पन्न भारतात सर्वाधिक आहे असा कलकत्त्याचा दावा आहे. विस्तीर्ण नदीकिनारा, पुष्कळशा गोद्या, धक्के, गुदामे, सागरप्रवेशाच्या सोई, यंत्रसाम्रगीचा पुरवठा, जमिनीवरून येऊन मिळणारे लोहमार्ग व सडका, विमानतळ, नद्या व कालव्यांतून जलवाहतूक इ. घटकांमुळे कलकत्त्याला दक्षिण आशियाचे मुख्य बंदर हे स्थान प्राप्त झाले आहे. हावडा स्थानकातून दक्षिण, पश्चिम व उत्तर भारताशी आणि सीआलढा स्थानकातून उत्तर बंगाल आणि पूर्वभारताशी कलकत्ता लोहमार्गांनी जोडलेले आहे. मोठमोठ्या सडका येथून भारताच्या चारी दिशांना जातात. डमडम येथील सुसज्ज विमानतळामुळे वायुमार्गाचेही हे एक आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे केंद्र झाले आहे. उद्योगधंद्यांपैकी ताग, कापड, कागद, लोखंडी काम, आगपेट्या, यंत्रसामग्री, वीज-उपकरणे, मोटारी, रबर अशा विविध मालांचे कारखाने कलकत्त्यात व सभोवार आहेत. आयात-निर्यातीची ही एक मोठी बाजारपेठ आहे. येथून गोणपाट, गोण्या, तागाच्या इतर वस्तू, अंबाडी, चहा, जवस, कोळसा, बीड, लोखंड व मँगॅनीज धातुके, अभ्रक, गालिचे, कातडी व चामडी निर्यात होतात मीठ, अन्नधान्ये, पेट्रोलियम, लोखंड व पोलाद, यंत्रे, सिमेंट व इतर अनेक पदार्थ आयात होतात. देशाच्या अर्थकारणाशी संबंध असलेल्या मोठ्या घडामोडी येथे चालतात. बर्याच देशी व परदेशी व्यापारी कंपन्यांच्या भारतातील मुख्य कचेर्या या शहरी आहेत. ‘बेंगॉल चेंबर ऑफ कॉमर्स’ व इतर अनेक व्यापारी संघ व संस्था येथे आहेत.
शैक्षणिक क्षेत्रात कलकत्ता आघाडीला आहे. दोन विद्यापीठे, अनेक महाविद्यालये, विज्ञान, वैद्यक, अभियांत्रिकी, संशोधन संस्था, त्या त्या विषयांच्या प्रशिक्षणसंस्था, कलाकेंद्रे, वॉरन हेस्टिंग्जने स्थापन केलेले संस्कृत कॉलेज व अरबी-फार्सी मदरसा, कृषि-उद्यान, दोनशे वर्षांपूर्वी स्थापन झालेले सिबपूरचे वनस्पतिशास्त्रीय उद्यान (देशातील सर्वांत विशाल वटवृक्षाबद्दल प्रसिद्ध), अलीपूरचे प्राणिसंग्रहालय व वेधशाळा, सर विल्यम जोन्सने स्थापन केलेली ‘एशियाटिक सोसायटी’, भारताचे भूशास्त्रीय सर्वेक्षण केंद्र, राष्ट्रीय ग्रंथालय, महेंद्रलाल सरकार यांनी स्थापन केलेली ‘इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’, जगदीशचंद्र बोस यांची ‘बोस इन्स्टिट्यूट’, जादूघर अथवा भारतातील आद्य श्रेणीचे ‘इंडियन म्यूझीयम’, ‘मार्बल पॅलेस’ कलासंग्रह, व्हिक्टोरिया स्मारकातील शिल्पांची, चित्रांची कलावीथी अशा अनेकविध विद्या-शास्त्र-संस्कृतिपोषक संस्थांनी कलकत्ता संपन्न आहे.
प्रेक्षणीय गोष्टींत हावडा ब्रिज हा हुगळी नदीवरील एकाच कमानीचा भव्य लोखंडी पूल, फोर्ट विल्यम किल्ला, त्याच्या भोवतालचे विस्तीर्ण मैदान, मैदानाच्या कडेला ईडन बागेतील क्रिकेट-फुटबॉल क्रीडांगणे सभोवार प्रशस्त राजमार्गावर राजभवन, वरिष्ठ न्यायालय, नगरभवन, रायटर्स बिल्डिंग, टेलिफोन एक्स्चेंज इत्यादींच्या भव्य इमारती, ४६ मी. उंचीचे ऑक्टर्लोनी स्मारक, मोठमोठी होटेल्स, डलहौसी चौक, चौरंगी हेगमार्केट, कालीघाट विभागात ३५० वर्षांपूर्वीचे काली मंदिर, बद्रिरास बागेतील नक्षीने मढवलेले जैन मंदिर या स्थळांचा उल्लेख करता येईल. शहरात पुष्कळ ठिकाणी खुली पटांगणे व लहान लहान तलाव आहेत. हावडा, कासीपूर, चित्तपूर, माणिकताला, गार्डन रीच, दक्षिणेश्वर अशा उपनगरांना जाण्यास रेल्वे, ट्रॅम, बस इ. वाहनांच्या सोयी आहेत. हुगळीच्या पश्चिम तीरावर बेलूर मठ व तारकेश्वर, रूपनारायण नदीवर बौद्ध इतिहासातील प्रसिद्ध तामलूक नगराचे अवशेष, हुगळी सागराला मिळते तेथील डायमंड बंदर व नदीमुखासमोरचे सागर बेट ही स्थाने रमणीय आहेत.
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात कलकत्त्याने महत्त्वाचा वाटा उचललेला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही येथील वातावरण पुष्कळदा अस्थिर व स्फोट झालेले आहे. देशाच्या सीमेजवळील स्थानामुळे या परिस्थितीत अनेकदा भरच पडलेली आहे.
ओक, शा.नि.
“