कर्मचारी प्रशासन : कोणत्याही व्यावसायिक संघटनेत कर्मचारी, पर्यवेक्षक व व्यवस्थापक हे महत्त्वाचे घटक असून त्यांचे परस्परसंबंध चांगले व दर्जेदार असणे आवश्यक असते. व्यवसायांत नियुक्त झालेले कर्मचारी प्रशिक्षित व पुरोगामी असल्यास आणि व्यवस्थापक हे शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून व्यवस्थापन करणारे असल्यास हे संबंध अधिक दृढ होऊ शकतात. एकमेकांशी मानवी दष्टिकोनांतून संबंध वाढविणे व दर्जेदार व्यवस्थापनाची निर्मिती करणे, हाच कर्मचारी प्रशासनाचा उद्देश असतो.
कर्मचार्यांची भरती, निवड, नियुक्ती, वेतन, स्वास्थ्य, बढती वगैरे सर्व बाबी शास्त्रशुद्ध पद्धतीने करणे, हाच कर्मचारी प्रशासनाचा अभ्यास-विषय होय.
प्रशिक्षित कर्मचारी हा व्यवसायातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कर्मचारी हे प्रशिक्षणामुळे अधिक कार्यक्षमतेने व प्रभावीपणे उपयुक्त कार्य करू शकतात. आधुनिक काळात ज्ञानाच्या सीमा एकासारख्या वाढत असल्याने व निरनिराळी शास्त्रे अधिक प्रगत होत असल्यामुळे ‘कर्मचारी प्रशासन’ हे व्यवस्थापनशास्त्राचा एक महत्त्वाचा अविभाज्य भाग बनले आहे.
श्रमव्यवस्थापन किंवा कर्मचारी प्रशासन यामुळे कर्मचारी केवळ कार्यक्षम व सुखी बनत नाही, तर प्रत्येक कर्मचार्यास श्रमशक्तीचा सुयोग्य वापर करावा ही दृष्टी मिळून संपूर्ण व्यवस्थापनासच सुसंघटितपणा प्राप्त होतो. कर्मचार्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा संपूर्ण विकास करणे व त्यातून व्यवसायाची जास्तीत जास्त प्रगती साधणे, कर्मचारी प्रशिक्षित करणे व त्यांच्याकडून कार्य शास्त्रशुद्ध व यशस्वीपणे पूर्ण करून घेणे ही कर्मचारी प्रशासनाची प्रमुख कार्ये असल्याने, या शास्त्राचे आज फार महत्त्व वाढले आहे.
रोजगार कार्यालयांची निर्मिती, शास्त्रशुद्ध पद्धतीने कर्मचार्यांची नियुक्ती, वाजवी वेतन, प्रशिक्षित व सुदृढ बनण्यासाठी व्यावसायिक सोयी व एकूण कामगार-जीवनास स्थैर्य या कर्मचार्यांच्या दृष्टीने असणार्या महत्त्वाच्या सर्व बाबी कर्मचारी प्रशासनात अंतर्भूत होतात आणि त्यामुळे या शास्त्राच्या अवलंबनाने व्यवसायात अधिक कार्यक्षम बनण्यास प्रेरणा मिळत राहते.
कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आखलेली धोरणे, त्यांच्या विकासासाठी तयार केलेल्या योजना व त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी अवलंबिलेली तंत्रे जर शास्त्रशुद्ध असतील, तर कर्मचारी प्रशासनाचा अधिक प्रभाव पडू शकेल आणि मानवी व्यवहार सुव्यवस्थित होण्यास या शास्त्राची मदत होऊ शकेल. मालक व व्यवस्थापक उत्पादकतेवर भर देताना कर्मचारी प्रशासन शास्त्रशुद्ध पद्धतीने अवलंबतील, तर त्यांना व्यवस्थापनात श्रमिकांचा उत्कृष्ट सहयोग मिळू शकेल व त्यातून व्यवसायांचा खराखुरा फायदा होऊ शकेल हे आधुनिक काळात सिद्ध झाले आहे.
व्यवसायांतील प्रत्येक कर्मचार्याला त्याच्या श्रमशक्तीचा व सामर्थ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी संधी प्राप्त करून देणे, सर्व कर्मचार्यांत सामूहिकतेची व एकोप्याची भावना निर्माण करणे व व्यवसायांतील उपक्रमशीलता वाढीस लावून उत्पादन वाढविण्यास मदत करणे, हे तीन मूलभूत विचार कर्मचारी प्रशासनात करावयाचे असतात. या दृष्टीने अधिकाधिक संशोधन होणे आवश्यक आहे. भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेत खाजगी आणि सार्वजनिक व्यवसायांत या दृष्टीने कर्मचारी प्रशासनविषयक समस्यांवर मूलभूत संशोधन करण्याची गरज आहे. अशा संशोधनाचा विशेष प्रभावीपणे उपयोग करून औद्योगिक व व्यावसायिक संबंध सुसंवादी ठेवण्याचे कार्य होणे अगत्याचे आहे.
गोसावी, मो.स.