कासीर : (लाकडी उडल हिं. पाठिया, सिरन क.बंगणा,कळबेगे, होटे गु.शांबर लॅ. ॲल्बिझिया बायनेन्सीस कुल-लेग्युमिनोजी). शिरीष, काळा शिरीष व लुलै ह्यांच्या वंशातील (व मिमोजॉइडी उपकुलातील) हा सदापर्णी व शिंबावंत (शेंगा येणारा) वृक्ष कोकणात व उ.कारवारच्या दाट जंगलात सामान्यपणे आढळतो शिवाय द.महाराष्ट्र, हिमालयाचा उष्णकटिबंधातील भाग, ब्रह्मदेश, श्रीलंका इ. ठिकाणीही याचा प्रसार आहे. याचे शिरीषाशी बरेच साम्य असते तथापि त्यापेक्षा हा बराच मोठा (१८ ते २४ मी. उंच) असून साल करडी, भेगाळ व सुरकुतलेली असते. कोवळे भाग लवदार असतात. पाने संयुक्त आणि मोठी मुख्य देठ १५—३० सेंमी. तळाशी मोठे प्रपिंड (ग्रंथी) दले १२—४० व दलके ४०—८० असून उपपर्णे दीर्घस्थायी (सतत), मोठी, हृदयाकार, पातळ व लवदार असतात [→पान] . फांद्यांच्या शेंड्यांकडे, स्तबकांच्या परिमंजरीवर [→पुष्पबंध] , शिरीषापेक्षा लहान, पिवळट फुले एप्रिल–जूनमध्ये येतात. केसरदले (पुंकेसर) लालसर व शिंबा (शेंग) लहान, १२⋅५—१५ X २—२⋅५ सेंमी., फिकट पिंगट, चपटी व न तडकणारी बीजे ८—१०, गुळगुळीत गडद तपकिरी व अंडाकृती असतात.
याचे लाकूड मऊ व साधारण टिकाऊ असते तथापि फळ्या, खांब, लहान होडगी, चहाच्या पेट्या, फण्या, खेळणी, कातीव वस्तू, किरकोळ सजावटी सामान इत्यादींकरिता वापरतात. खोडातून पाझरणारा डिंक नेपाळात `डॅफ्ने’ नावाच्या कागदाकरिता वापरतात. साधारण कोवळ्या फांद्यांचा चारा गुरांना खाऊ घालतात. ही झाडे चहा व कॉफीच्या मळ्यांत सावलीकरिता लावतात. जमिनीतील नायट्रोजनाच्या पुरवठ्यात यांच्या लागवडीने वाढ होते.
पहा : लेग्युमिनोजी शिरीष.
परांडेकर, शं.आ.